Sindhudurg: सिंधुदुर्गात 68 पैकी 37 जागा जिंकत भाजप आघाडीला वरचढ

शिवसेनेस काहीसा दिलासाः भाजपची एकूण जागांवर आघाडी
Sindhudurg Nagar Panchayat Election
Sindhudurg Nagar Panchayat ElectionEsakal
Updated on

वैभववाडी : जिल्ह्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठा आणि आगामी निवडणुक झलक दिसणाऱ्या चार नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी गेली पाच वर्ष सत्ता उपभोगणारे प्रस्थापित राजकीय पक्ष आणि कारभाऱ्यांना जोरदार झटका दिला आहे. जिल्हा बँकेत (District Bank) दारूण पराभव झालेल्या शिवसेनेसाठी (Shivsena)हा निकाल संजीवनी ठरणार आहे. भाजपने (BJP)दोन ठिकाणी सत्ता गमावली असली तरी ६८ पैकी ३७ जागा जिंकत आकडेवारीत भाजप महाविकास आघाडीला वरचढ ठरला आहे.

जिल्ह्यातील वाभवे-वैभववाडी, कसई-दोडामार्ग, कुडाळ आणि देवगड-जामसंडे या चार नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane), पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, आमदार दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, अतुल रावराणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. नगरपंचायत निवडणुक जरी स्थानिक मुद्द्यावर लढविली जात असली तरी त्याला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे वलय निर्माण झाले होते. त्यामुळे या निवडणुकीला खूप महत्व प्राप्त झाले होते. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुक होत असल्यामुळे ओबीसी मतदारांचा कौल कसा असणार? या मुद्दयांकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष होते.

निवडणुक झालेल्या चारही नगरपंचायती पाच वर्षापुर्वी स्थापित झाल्या होत्या. चार पैकी तीन नगरपंचायतीवर केंद्रीयमंत्री राणेंचे वर्चस्व होते तर दोडामार्गमध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता होती. चार पैकी दोन नगरपंचायती या कणकवली विधानसभा मतदारसंघातील होत्या. त्यामुळे आमदार नितेश राणेंची प्रतिष्ठा या दोन नगरपंचायतीमध्ये पणाला लागली होती. आज झालेल्या मतमोजणी अंती देवगड-जामसंडेमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, वाभवे वैभववाडीत भाजप, कुडाळात त्रिशंकु, दोडामार्गात भाजप असे राजकीय बलाबल दिसून येत आहे. चार नगरपंचायतीच्या एकुण ६८ जागांपैकी भाजप -३७, शिवसेना- २२, राष्ट्रवादी काँग्रेस -२, काँग्रेस - २, आरपीआय २ आणि अपक्षांनी चार जागावर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत मतदारांनी गेली पाच वर्षे सत्ता उपभोगणारे राजकीय पक्ष आणि प्रस्थापिक कारभाऱ्यांना नाकारले आहे.

Sindhudurg Nagar Panchayat Election
नितेश राणेंच्या मतदारसंघात भाजपला धक्का देत आघाडीने रोवला झेंडा

देवगड - जामसंडेत भाजपला धक्का

भाजप भक्कम स्थितीत असलेल्या देवगड-जामसंडे नगरपंचायतीत भाजपला पराभव स्विकारावा लागला. हा भाजप आणि आमदार राणेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या नगरपंचायतीची जबाबदारी शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांच्याकडे होती. त्यांनी या निवडणुकीत आपले सर्व कौशल्य पणाला लावीत महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. प्रत्येक नगरपंचायतीमध्ये प्रस्थापितांना नाकारल्याचे चित्र आहे. वैभववाडीत पाच वर्ष सत्ता उपभोगून शिवसेनेत गेलेल्या पदाधिकाऱ्यांना मतदारांनी झिडकारले आहे. येथे आमदार राणेंची रणनितीचा विजय झाला आहे. कुडाळ आणि दोडामार्गामध्ये प्रस्थापितांविरोधात जनतेने कौल दिला आहे.

हा निवडणुक निकाल जिल्हा बँक निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या शिवसेनेचे काही अंशी मनोबल वाढविण्यास कारणीभुत ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी भाजपला काही ठिकाणी मारक ठरली आहे. भाजपला दोन ठिकाणची सत्ता गमावावी लागली असली तरी महाविकास आघाडीला भाजप स्वबळावर भारी पडल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. दोडामार्गमध्ये भाजपने निर्वीवाद वर्चस्व मिळवित आमदार दिपक केसरकरांना धक्का दिला आहे. कुडाळात काँग्रेसने दोन जागा जिंकत आपले अस्तित्व सिध्द केले आहे; मात्र अन्य ठिकाणी काँग्रेसचा भोपळा देखील फुटला नाही. देवगड आणि दोडामार्गमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एक एक जागा जिंकली. काँग्रेस, राष्ट्रवादीपेक्षा अपक्षांनी जागा मिळविल्या आहेत. त्यामुळे या दोनही पक्षांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

जिल्हा बँकेनंतर जिल्हयात चौफेर उधळणाऱ्या भाजपच्या वारूला नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाने काहीसा ब्रेक लागला आहे. नगरपंचायत निवडणुकीचा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कुणी स्वबळावर निवडणुक लढवावी?, कुणी कुणाशी आघाडी करावी? हे या निवडणुक निकालाचा अभ्यास करून राजकीय पक्षांना निर्णय घ्यावे लागणार आहेत. कुडाळ, देवगडची सत्ता गमावणाऱ्या भाजपला पुढील काळात आत्मचिंतन करावे लागणार आहे.

जुन्या-नव्यांच्या मनोमिलनाचे काय?

नारायण राणेंचे समर्थक आणि भाजप अशी ताकद असताना देवगड आणि कुडाळमध्ये सत्ता गमवावी लागली. वैभववाडीत प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर काठावरचे यश मिळाले. त्यामुळे नव्या-जुन्या कार्यकर्त्याचे खरोखरच मनोमिलन झाले आहे का ? असा प्रश्न या निवडणुक निकालानंतर उपस्थित केला जात आहे.

पक्षीय बलाबल

एकुण जागा 68

भाजप-37, शिवसेना-22, राष्ट्रवादी काँग्रेस-2, काँग्रेस-2, आरपीआय-1, अपक्ष-4

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.