सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; मदतीसाठी आलेल्यांनीच केला घात

सावंतवाडीच्या राजधानीपर्यंत कोल्हापूरचे सैन्य पोहोचले होते, त्यांना शह देण्याचे प्रयत्न अपुरे पडत होते.
सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; मदतीसाठी आलेल्यांनीच केला घात
Updated on

कोल्हापूरकरांना शह देण्यासाठी सावंतवाडी संस्थानने निपाणी येथील सरदार शिदोजीराव निंबाळकर सरलष्कर उर्फ आपासाहेब निपाणकर यांची मदत घेतली; मात्र त्यांनी सावंतवाडीकरांना मदत केल्यानंतर या राज्यावर आपलाच अंमल बसवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सावंतवाडीकरांसमोर नवा पेच तयार झाला.

सावंतवाडीच्या राजधानीपर्यंत कोल्हापूरचे सैन्य पोहोचले होते. त्यांना शह देण्याचे प्रयत्न अपुरे पडत होते. अशावेळी बाहेरून कोणाचीतरी मदत मिळणे आवश्यक होते. याकाळात लक्ष्मीबाई पेडणे येथे जावून थांबल्या होत्या. लक्ष्मीबाईंनी आपल्या माहेरी म्हणजे ग्वाल्हेरला जावून शिंदे घराण्याकडून या कठीण प्रसंगी मदत घेण्याचे ठरवले. त्या स्वतः पेडण्याहून ग्वाल्हेरकडे जायला निघाल्या. यासाठी त्यांनी सावंतवाडी संस्थानच्या एका बाजूने जाणाऱ्या तळकट येथील घाटमार्गाचा अवलंब केला. तेथून त्या निपाणीपर्यंत पोहोचल्या.

निपाणीतील तत्कालीन पराक्रमी सरदार शिदोजीराव निंबाळकर सरलष्कर उर्फ आपासाहेब निपाणकर यांना लक्ष्मीबाई येत असल्याचे समजले. त्यांनी त्यांची भेट घेतली. हे निपाणकर खूप पराक्रमी होते; मात्र अत्यंत उग्रकर्मा म्हणूनही ओळखले जायचे. कोल्हापूरच्या छत्रपतींशी त्यांचे फारसे पटायचे नाही. त्या संदर्भात एक कथाही सांगितली जाते. एकदा कोल्हापूरच्या राजवाड्यात निपाणकर हे राजांच्या भेटीला जात होते. यावेळी एका चौकात त्यांच्या अंगावर वाघ सोडून देण्यात आला. निपाणकर यांच्या सोबत काही लोक होते. त्यांनी त्यांना पुढे वाघ असल्याचे सांगितले. यावेळी निपाणकर यांनी आता आपण मागे फिरणार नाही, असे सांगून ते वाघ असलेल्या ठिकाणी गेले.

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; मदतीसाठी आलेल्यांनीच केला घात
रत्नागिरीत महावितरणची थकबाकी वाढतीच; रक्कम 58 कोटींवर

वाघ अंगावर येताच त्यांनी त्याचे पुढचे दोन्ही पाय पकडून त्याला वर उचलून उभे केले. सोबतच्या लोकांनी तलवारीने त्याला ठार केले. यानंतर निपाणकर राजांना जाऊन भेटले. तर या निपाणकर यांनी लक्ष्मीबाईंना आपण सावंतवाडीला पूर्ण मदत देण्याची ग्वाही दिली. तुम्ही ग्वाल्हेरला जावू नका. सावंतवाडी संस्थानच्या शत्रूचा आम्ही बंदोबस्त करून देतो, असे त्यांना सांगून काही फौज त्यांच्याबरोबर गेली आणि त्यांना सावंतवाडीत पाठवले. तेथे आल्यावर लक्ष्मीबाईंनी भाऊसाहेबांनाही रेडीहून परत आणले. निपाणकरांनी आबाजी सुबराव राणे यांच्या नेत्रृत्वाखाली १ हजार सैनिकांची कुमक सावंतवाडीकरांच्या मदतीला पाठवली. या सैनिकात बहुसंख्य अरब होते. याशिवाय व्यंकटराव जांभुटकर यांच्याकडून चारशे मराठा सैनिक सावंतवाडीच्या मदतीला आले. याचवेळी निपाणकर यांनी आणखी एक डाव आखला. आपले काही सैनिक कोल्हापूरवर चाल करायला पाठवले. त्यांचे चिकोडी आणि मनोळी हे भाग या सैनिकांनी घेतले. याचा चांगलाच परिणाम झाला.

निपाणकरांची कोल्हापूरवर स्वारी झाली हे समजताच छत्रपती कोल्हापूरच्या संरक्षणासाठी सावंतवाडीजवळचा तळ उठवून कोल्हापूरकडे परतले. यामुळे फारशी मोठी लढाई न करता सावंतवाडीवर आलेले कोल्हापूरकांचे संकट टळले. यानंतर मात्र वेगळ्याच घडामोडी घडल्या. निपाणकरांचा सरदार आबाजी राणे याने आपल्या धन्यासाठी सावंतवाडीवर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केला. यासाठी लक्ष्मीबाई आणि त्यांचा दत्तक मुलगा भाऊसाहेब या दोघांनी कैद केले.

लक्ष्मीबाई मोठ्या शिताफीने या कैदेतून सुटून पेडण्यात गेल्या. तेथे पेडणे महालातील देसाई असलेले नागेश महादेव प्रभू यांच्याकडे त्या आश्रयाला गेल्या. याकाळात फोंड सावंत वालावलमध्ये होते. भाऊसाहेबांना घेऊन रामचंद्रराव खानविलकर पुन्हा रेडीत गेले. यानंतर आबाजी राणे याने भाऊसाहेबांना सुरक्षेचे अभिवचन दिले. त्यामुळे बाहेर गेलेले सर्वजण परत राजवाड्यात आले; मात्र आबाजी हा आपला अंमल सोडेना. त्याने यशवंतगड, वेंगुर्ले, निवती व इतर किल्ले आपल्या ताब्यात घेतले. याच दरम्यान आणखी एक दुर्दैवी घटना घडली. ७ ऑक्टोबर १८०८ मध्ये भाऊसाहेब हे झोपले असताना त्यांच्यावर अज्ञाताने हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला कोणी घडवला याबाबत अनेक शक्याशक्यता वर्तवल्या जातात; मात्र याबाबत ठोस असे काहीच समजत नाही.

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; मदतीसाठी आलेल्यांनीच केला घात
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उदयापासून 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण

भाऊसाहेबांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा गादीचा वारसदार नेमण्याचा विषय पुढे आला. यात फोंड सावंत यांच्यात ज्येष्ठ पत्नी पार्वतीबाई या सक्रीय झाल्या. पार्वतीबाई या कागलमधील सुबराव घाटगे कागलकर यांच्या भाची होत्या. हे सुबराव आणि आपासाहेब निपाणकर यांचे नाते होते. त्यामुळे सुबराव निपाणीतच राहायचे. त्यांनी आणि निपाणकर यांनी पार्वतीबाईंचा मुलगा खेम सावंत यांना गादीवर बसवायचे नियोजन केले; मात्र फोंड सावंत यांना कैद करण्याचा कटही रचला गेला. यानुसार सुबराव घाटगे हे निपाणकरांचे मावस भाऊ मानसिंगराव पाटणकर आणि चारशे ते पाचशे सैनिक घेऊन सावंतवाडीत आले. त्यांनी खेम सावंत यांना लक्ष्मीबाई यांच्या मांडीवर बसवून दत्तक दिले. यानंतर सुबराव घाटगे चार-आठ दिवसांत माघारी फिरले.

पाटणकर हे सैन्यासह वालावलमध्ये फोंड सावंत यांना भेटण्यासाठी म्हणून गेले; मात्र तेथे फोंड सावंत असलेल्या ठिकाणाला त्यांनी वेढा दिला. यावेळी फोंड सावंत शिताफीने तेथून निसटले. काळसे, कलमठ, नांदगाव, खारेपाटण असा पल्ला पार करत महाडला जावून पोहोचले. पाटणकर यांनी त्यांचा राजापूरपर्यंत पाठलाग केला; मात्र ते सापडले नाहीत. यानंतर पाटणकर सिदगडाकडे गेले. तेथे काही काळ राहून कोल्हापूरला परतले. इकडे या अस्थिरतेच्या काळात लक्ष्मीबाई राज्यकारभार चालवत होत्या. त्यांची बहुतेक कारकीर्द अशीच लढाया आणि क्लेशकारक गोष्टींमध्ये गेली. आबाजी राणे यानेही त्यांचा द्रव्यासाठी छळ केला. यातच १८०८ मध्ये त्यांचे निधन झाले.

सावंतवाडीकर आणि देशप्रभू

निपाणकरांच्या सैन्याने कैद केले तेव्हा लक्ष्मीबाई पेडणे येथे नागेश प्रभू यांच्याकडे आश्रयाला गेल्या. हे प्रभू घराणे म्हणजे पूर्वापार पेडणे महालाचे देसाई. त्यांना पहिल्यांदा विजापूरच्या बादशहाकडून देशप्रभू असा किताब मिळाला. सावंतवाडीकरांशी या घराण्याचे नेहमीच चांगले संबंध राहिले. सावंतवाडीवर संकट आल्यास आश्रयासाठी विश्‍वासाचे ठिकाण म्हणून सावंतवाडीकर पेडण्यातील या देशप्रभू घराण्याकडे पहायचे. हे देशप्रभू घराणे खानदानी म्हणून आजूबाजूच्या प्रांतात प्रसिद्ध होते. सावंतवाडीकरांना फोंडा, उसप, मणेरी, तेरेखोल आदी ठिकाणी झालेल्या लढायांमध्ये त्यांनी चांगली मदत केली. हे घराणे दानशूर म्हणूनही त्याकाळातही प्रसिद्ध होते. त्यांना पोर्तुगीज राजाकडून ‘व्हायकौंट’ तर कोल्हापूरच्या छत्रपतींकडून ‘रावराजे’, असे किताब मिळाले होते.

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; मदतीसाठी आलेल्यांनीच केला घात
...तर ओबीसींचं आरक्षण गेलंच नसतं - फडणवीस

तळकट घाटीतील पुर्वीचा रस्ता

कोल्हापूरकरांना शह देण्यासाठी ग्वाल्हेर येथे मदत मागायला जाण्यासाठी लक्ष्मीबाई यांनी तळकट घाटीच्या मार्गाचा वापर केल्याचा उल्लेख आढळतो. संस्थानकाळात या भागातून जाणाऱ्या मार्गाचा कोल्हापूर, चंदगडसह बेळगावला जाण्यासाठी वापर केला जायचा; मात्र हा रस्ता तुलनेत अवघड होता. तळकटमधून जाणाऱ्या शेवऱ्याची घाटी या रस्त्याचे थोडेफार अवशेष आजही आहेत. हा मार्ग पुर्वी बैलगाडी जाईल, असा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.