सावंतवाडी (Savantwadi) संस्थानच्या इतिहासात पंचम खेमराज उर्फ बापूसाहेब महाराज यांचे कार्य सुवर्णाक्षरात लिहीले गेले. ब्रिटिशांकडून त्यांनी स्वतंत्र कारभार मिळवत संस्थानामध्ये अनेक सुधारणावादी धोरणे राबवली. यामुळेच ते पुण्यश्लोक म्हणून आजही ओळखले जातात. रावसाहेब उर्फ श्रीराम सावंत यांच्या नंतर ते गादीवर आले. त्यांचे कार्य या सदरामध्ये सविस्तर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.
रावसाहेब उर्फ श्रीराम सावंत सावंतवाडी संस्थानच्या गादीवर येण्यापूर्वी २० ऑगस्टो १८९७ला बापूसाहेबांचा जन्म झाला. या आधी रावसाहेब व जानकीबाई या दाम्पत्याला तीन मुली झाल्या होत्या. बापूसाहेबांच्या जन्मानंतर रावसाहेबांना राज्यपद मिळाल्यामुळे ती एक कौतुकाची भावना प्रजेमध्ये होती. शिवाय बापूसाहेबांचा चेहरा खूप तेजस्वी होता. त्यामुळे त्यांच्या रुपाने भविष्यात संस्थानला एक चांगला राजा मिळेल, अशी भावना आधीपासूनच तयार झाली होती.
बापूसाहेब पाच वर्षांचे होण्याआधीच त्यांच्या आई जानकीबाई यांचे निधन झाले. याकाळात रावसाहेब राजे असले तरी ते नामधारीच होते. इंग्रजांकडे पूर्ण सत्ता होती. अशावेळी पुढचा राजा कर्तबगार असेल आणि इंग्रजांचा प्रभाव कमी करेल अशी आशा प्रजेमध्ये होती. यातच बापूसाहेब आईविना पोरके झाल्यामुळे प्रजेमध्ये हळहळ निर्माण झाली. लोकांच्या अपेक्षा मात्र बापूसाहेबांभोवती केंद्रीत झाल्या.
इंग्रजांनाही बापूसाहेब यांनी चांगले नेतृत्व करावे असे वाटत होते. तत्कालीन पोलिटीकल एजंट यांनी बापूसाहेबांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यायला सुरूवात केली. २४ ऑक्टोबर १९०३ ला त्यांना शिक्षणासाठी खडकी (पुणे) येथील मिस एल. सी. मॅक्सन यांच्या ताब्यात देण्यात आले. त्या चांगल्या शिक्षक, केअरटेकर होत्या. प्रामुख्याने राजकुमारांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जायची. बापूसाहेब यांच्यासोबत अक्कलकोटचे राजकुमार फत्तेसिंहराव भोसले हेही त्यांच्याकडे होते. फत्तेसिंह हे बापूसाहेबांपेक्षा अडीचवर्षांनी मोठे होते.
मिस मॅक्सन यांनी बापूसाहेबांना आईप्रमाणे मायेची पाखर दिली. कसल्याही कठीण प्रसंगाला तोंड देण्याची हिम्मत दिली. फत्तेसिंहराव यांच्याशी बापूसाहेबांचे मैत्रीचे बंध मजबूत होत गेले. असे असले तरी इतक्या कमी वेळेत बापूसाहेबांना एका इंग्रज बाईकडे शिक्षणासाठी पाठवल्यामुळे सावंतवाडीकर प्रजेमध्ये काहीशी नाराजीची भावना होती. त्याकाळात असे वाटणे साहजीकच असावे. कारण सावंतवाडीकरांना दिर्घकाळ ब्रिटीश अमलाचा विट आला होता. त्यांना स्वतःचा राजा हवा होता. लहानपणापासून ब्रिटीशांकडे शिक्षण घेतल्याने त्याचा प्रभाव बापूसाहेबांवर दिसण्याची भिती प्रजेला वाटत असावी. असे असले तरी मिस मॅक्सन या अतिशय चांगल्या केअरटेकर होत्या.
आपले विद्यार्थी राजघराण्यातील आहेत याची जाणीव ठेवून त्यांनी त्यांना योग्य वळण आणि शिक्षण द्यायला सुरूवात केली. घोडदौड, शिकार, मर्दानी खेळ आदी शिकवण्याकडे त्यांचे विशेष लक्ष असायचे. गायन, वादन, ललीत कला याचेही शिक्षण त्या देवू लागल्या. अवघ्या पाच वर्षात बापूसाहेब पियानो वाजवण्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. ललीत कला, मर्दानी खेळ यातही त्यांनी ठसा उमटवला. रा. पाटील आणि कावतकर हे शिक्षक त्यांना मराठी शिकवायचे. इंग्रजीचेही शिक्षण त्यांना दिले जात असे. त्याचा परिणाम म्हणून बापूसाहेब घोड्यावरून रपेट, शिकार यात निपुण झाले. टेनिस, क्रिकेट, हॉलीबॉल, हॉकी यातही ते हौसेने भाग घ्यायचे. सर्वांशी मिळून मिसळून राहण्याबरोबरच त्यांच्यामध्ये कमी वयात कमालीचा समजूतदारपणा आला होता. बौध्दीक प्रगतीबरोबरच त्यांची प्रकृतीही सुदृढ झाली होती.
बापूसाहेब मिस मॅक्सन यांच्या देखरेखीखाली राहत असलेल्या खडकी भागात ब्रिटीश लष्कराचा कॅम्प होता. त्यामुळे तेथे कायमच लष्करी वातावरण असायचे. घोडदौड, कवायती, तोफखाने, लष्करी हालचाली बापूसाहेबांना कायमच पहायला मिळायच्या. याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. काही वर्षे मिस मॅक्सन यांच्या देखरेखीखाली शिक्षण घेतल्यानंतर १९१० च्या जूनमध्ये बापूसाहेबांना कोल्हापूरमध्ये तेथील इन्फंट्रीचे दुय्यम सेनांनी ले. जे. सी. टेट यांच्याकडे शिक्षणासाठी पाठवण्यात आले. या काळात बापूसाहेबांच्या मनावर सैनिकी शिस्त कायम कोरली गेली. तेजस्वी असलेल्या बापूसाहेब यांच्यावर ले. टेट आणि त्यांच्या पत्नीचा विशेष जीव जडला. दरम्यानच्या काळात १९०८ मध्ये अक्कलकोटचे फत्तेसिंह राजे राजकोटला शिक्षणासाठी गेले होते. तेही कोल्हापूरला सैनिकी शिक्षणासाठी आले. पुढे दीड वर्षे हे दोघेही कोल्हापुरात टेट दांम्पत्याच्या घरी एकत्र राहीले. पुढे ऑक्टोबर १९११ला टेट यांची बदली झाल्याने बापूसाहेब पुन्हा पुण्यात मिस मॅक्सन यांच्याकडे गेले.
लष्करी प्रभाव
बापूसाहेब लहान असताना १९०५ मध्ये इंग्लंडचे पाचवे जॉर्ज बादशहा भारतात आले होते. त्यावेळी त्यांच्या भेटीला छोट्या बापूसाहेबांना नेण्यात आले. पाणीदार डोळे असलेल्या बापूसाहेबांची बादशहालाही भुरळ पडली. तुम्हाला मोठेपणी कोण व्हावेसे वाटते असा प्रश्न त्यांनी राजकुमाराला विचारला. यावर बापुसाहेबांनी ‘मला तोफखान्याचा ड्रायव्हर व्हावेसे वाटते’ असे उत्तर दिले. राजकुमाराला ड्रायव्हर आदर्श वाटावा याचे जॉर्ज यांना आश्चर्य वाटले. त्यांनी ‘असे का’? असा सवाल केला. यावर छोट्या बापूसाहेबांनी ‘त्याला बसायला स्वतःचा घोडा तर असतोच; पण बाजूला आणखी घोडे असतात म्हणून...’ असे उत्तर दिले. खडकीच्या लष्करी वातावरणाचा हा प्रभाव होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.