उपरकर यांनी तातडीने खुलासा करत पक्षातून हकालपट्टी झालेली नाही, तर मी स्वत:हून पक्ष सदस्यत्व आणि इतर पदांचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.
कणकवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) माजी सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराम उपरकर (Parashuram Uparkar) यांचा आजपासून मनसेशी कोणताही संबंध असणार नाही, असे पत्रक मनसे नेते शिरीष सावंत यांनी जाहीर केले. उपरकर यांनीही आपण मनसे पक्षसदस्यत्व व इतर पदांचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.
आता कार्यकर्ते जो निर्णय घेतील, त्याच्याशी बांधिल राहू आणि पुढील राजकीय वाटचाल सुरू ठेवणार असल्याचेही श्री. उपरकर यांनी स्पष्ट केले. एक्स (ट्विटर) या संकेतस्थळावरील मनसेच्या अधिकृत अकाउंटवरून दुपारी दीड वाजता श्री. उपरकर आणि प्रवीण मर्गज ह्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कोणताही संबंध असणार नाही, असे पत्रक जारी केले.
मनसे नेते सावंत यांनी दुपारी अडीच वाजता त्याबाबतचे पत्रक जारी केले. त्यानंतर श्री. उपरकर यांची मनसेतून हकालपट्टी झाल्याचे वृत्त माध्यमांतून जाहीर झाले आणि सिंधुदुर्गच्या राजकारणात (Sindhudurg Politics) खळबळ उडाली. यावर श्री. उपरकर यांनी तातडीने खुलासा करत पक्षातून हकालपट्टी झालेली नाही, तर मी स्वत:हून पक्ष सदस्यत्व आणि इतर पदांचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.
डिसेंबर २०२२ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सिंधुदुर्ग दौरा केला होता. या दौऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे श्री. ठाकरे यांनी या दौऱ्यावेळीच सिंधुदुर्गची मनसे कार्यकारिणी बरखास्त केली होती. त्यानंतर ठाकरे आणि उपरकर यांचे बिनसल्याच्या चर्चा होत्या. कोकण दौऱ्यानंतर श्री. ठाकरे यांनी कोकणासाठी संपर्क नेत्यांची घोषणा केली. यात श्री. उपरकर यांना स्थान देण्यात आले नव्हते.
या वर्षभरात मनसे नेते सावंत यांनी देवगड तसेच जिल्ह्याच्या इतर ठिकाणी बैठका घेऊन मनसे कार्यकारिणीची नव्याने बांधणी केली होती. या बैठकांवेळी श्री. उपरकर यांना स्थान दिले नव्हते. मनसेच्या नव्या कार्यकारिणीमध्ये उपरकर समर्थकांना स्थान मिळाले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस होती. आता खुद्द उपरकर यांनाच पक्षाबाहेर केले आहे. त्यामुळे श्री. उपरकर आणि त्यांचे समर्थक पुढील राजकीय वाटचालीच्या दृष्टीने कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
कणकवली मतदारसंघात राणे यांचा प्रवेश होण्यापूर्वीपासूनच श्री. उपरकर शिवसेनेत सक्रिय होते. कणकवली ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती यामध्ये त्यांनी शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले. २००५ मध्ये श्री. राणे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या विरोधात श्री. उपरकर यांनी पोटनिवडणूक लढवली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी श्री. उपरकर यांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व दिले होते. २०१४ मध्ये श्री. उपरकर यांनी शिवसेना सोडून राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला. त्यापासून डिसेंबर २०२२ पर्यंत मनसेचे सरचिटणीस म्हणून श्री. उपरकर जबाबदारी सांभाळत होते.
मी आता पदमुक्त आणि पक्षमुक्त झालो आहे. माझ्यासोबत मनसेचे ४०० कार्यकर्ते आहेत. राजकीय वाटचालीच्या दृष्टीने हे कार्यकर्ते जो निर्णय घेतील, तो मला मान्य असणार आहे. या कार्यकर्त्यांच्या संमतीनंतरच मी माझी पुढील राजकीय दिशा निश्चित करणार आहे. मनसेच्या भूमिकेनंतर जिल्ह्यातून, राज्यातून अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांशी मी फोनवरून संपर्क साधला आहे. मला पाठिंबाही जाहीर केला आहे. पुढील राजकीय दिशा निश्चित होईपर्यंत माजी आमदार म्हणूनच जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणार आहे
जे नेते स्वत:च्या गावात मनसेची शाखा काढू शकत नाहीत, अशा नेत्यांना कोकणची जबाबदारी दिली. त्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारवर मला पक्षाबाहेर केले आहे. २०१४ पासून प्रामाणिकपणे पक्ष संघटना वाढवली. मधल्या तीन वर्षांच्या काळातील मोठ्या आजारपणाला सामोरे जावे लागले. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात पुन्हा पक्ष संघटना मजबूत केली. तरीही पक्ष नेतृत्वाने मनसे पक्षाशी संबंध नसल्याचे पत्रक काढले. या निर्णयाचे तीव्र दु:ख झाले आहे. ज्यांची पक्षातून हकालपट्टी झाली, त्यांनाच कोकणचे प्रतिनिधी म्हणून नेमले. त्याबाबतची व्यथा मी पक्षनेते शिरीष सावंत यांना सांगितली होती; पण कोणतीच कार्यवाही होत नसल्याने वर्षभर मी पक्षबैठकांपासून दूर होतो. माजी आमदार या नात्यानेच आंदोलने केली.
-परशुराम उपरकर, माजी सरचिटणीस, माजी आमदार, मनसे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.