सिंधुदुर्गनगरी : जिल्हा मुख्यालय नवनगर प्राधिकरणने सिंधुदुर्गनगरी येथे मोक्याच्या ठिकाणी कोट्यावधी निधी खर्च करून निर्मिती केलेल्या प्रशस्त अशा टाऊन पार्कची दुरावस्था झाली आहे. देखभाल दुरुस्ती अभावी खर्च केलेला निधी वाया गेल्यानंतर या ओस पडलेल्या टाउन पार्कच्या सुशोभीकरण व डागडुजीसाठी प्राधिकरणने पुन्हा ९२ लाखाचा निधी मंजूर केला आहे.
जिल्हा मुख्यालयात राहणाऱ्या रहिवाशांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून मुख्यालयातील मोक्याच्या ठिकाणी दहा वर्षापूर्वी टाऊन पार्कची निर्मिती करण्यात आली. यासाठी त्यावेळी सुमारे दीड कोटी निधी खर्च करण्यात आला होता. याठिकाणी विविध सुविधांबरोबरच लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे खेळाचे साहित्य तसेच बैठक व्यवस्था, खाद्यपदार्थाचे स्टॉल आणि विविध प्रकारची फुल झाडे लावण्यात आली होती.
विरंगुळ्यासाठी अतिशय सुंदर असे ठिकाण निर्माण केल्याने याठिकाणी सुरुवातीच्या काळात लहान मुले व वृद्ध तसेच अनेक जोडपी विरंगुळा म्हणून तेथे जात होती. सकाळ-सायंकाळ फेरफटका मारणाऱ्या लोकांनाही हे विश्रांतीचे ठिकाण म्हणून नावारूपाला आले होते. येथे येणाऱ्या लोकांसाठी पाणी व खाद्यपदार्थांची सोय व्हावी म्हणून स्टॉल उभारण्यात आले होते; मात्र सुरुवातीपासूनच हे स्टॉल उघडलेच नाहीत. हळूहळू येथील गैरसोयी वाढू लागल्या तसेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने याठिकाणी होणारी गर्दी कमी होत गेली.
तेथील फुलझाडांची तसेच साहित्याची देखभाल करण्यासाठी प्रशासनाने कोणतीही यंत्रणा ठेवली नसल्याने स्वच्छता आणि देखभालीअभावी हिरवीगार असलेली झाडे सुकून गेली. याठिकाणी सद्यस्थितीत कोणीही फिरकत नाही. गेल्या आठ-दहा वर्षात प्रशासनाने या टाऊन पार्कच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष दिले नाही; मात्र हे टाउन पार्क पूर्वीप्रमाणेच सुशोभीकरण करून सिंधुदुर्गनगरीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तसेच येथील लोकांना विरंगुळ्याचे ठिकाण निर्माण करण्यासाठी आता या टाऊन पार्कच्या डागडुजीसाठी व सुशोभीकरणासाठी नव्याने ९२ लाखाचा निधी प्राधिकरणाने मंजूर केला आहे.
या टाउन पार्कच्या निर्मितीसाठी खर्च करण्यात आलेला सुमारे दीड कोटी रूपये निधी जिल्हा प्रशासनाच्या स्वच्छता व देखभाली बाबतच्या अनास्तेमुळे वाया गेला आहे. आता पुन्हा टाउनपार्कच्या शुशोभिकरनासाठी ९२ लाख रूपये खर्च करून यातून प्रशासनाला काय साध्य करायचे आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रकल्पाच्या उद्देश्यापेक्षा ठेकेदाराचे हित जोपासले जात असल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे. गेल्या दहा वर्षात प्रशासनाने टाउन पार्कच्या देखभालीकड़े दुर्लक्ष केल्याने या प्रकल्पाची वाताहत लागली आहे. मग हे प्रकल्प उभारलेच कशासाठी? जनतेच्या सोईसाठी की ठेके दारांच्या भल्यासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तेव्हा आता नव्याने खर्च होणाऱ्या लाखो रूपये निधी पुन्हा वाया जाणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज आहे.
``सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात कोट्यावधी रुपये निधी खर्च करून सोई-सुविधेच्या नावाखाली विविध प्रकल्प उभारण्यात आले; मात्र या प्रकल्पाच्या निर्मितीनंतर त्याचे जतन आणि स्वच्छता याकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने सिंधुदुर्गनगरीतील सर्वच प्रकल्पाची दुर्दशा होऊन सद्यस्थितीत हे प्रकल्प अडगळीत पडले आहेत. केवळ शासनाचा निधी खर्च करण्यासाठी आणि ठेकेदारांचे हित जोपासण्यासाठी हे प्रकल्प राबविण्यात आलेले आहेत. सर्वसामान्य जनतेला या प्रकल्पाचा उपयोग होताना दिसत नाही.``
- सुशिल निब्रे, ओरोस.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.