रत्नागिरी - एसटी महामंडळाच्या कमी होणाऱ्या उत्पन्नामुळे सलग तिसऱ्या महिन्यात पगार कपातीची वेळ आली. यामुळे कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अधिकाऱ्यांचे पगार 100 टक्के देण्यात आले आहेत. मात्र, त्याचवेळी चालक, वाहक, कारागीर व अन्य कर्मचाऱ्यांचे पगार फक्त 77 टक्केच झाले. कामगारांनी विभाग नियंत्रकांकडे नाराजी मांडल्यानंतर आणखी 10 टक्के पगार होण्याची शक्यता आहे. आगामी काळात असा भेदभाव राहिला तर नियमातच काम करू, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिला आहे.
रत्नागिरी विभागात 4,300 कर्मचारी असून पगारासाठी दरमहा 6 कोटी 32 लाख रुपये लागतात. मिळणारे उत्पन्न 22 कोटी रुपये व खर्च मात्र 29 कोटी रुपये आहे. राज्यात अन्य विभागातही अशी परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून सलग तिसऱ्या महिन्यात वेतन कपातीचे संकट कोसळले आहे. गेल्या महिन्यात कपात केलेला 19 टक्के पगार पुढील 10 दिवसांत दिला होता. त्यावेळी कामगारांनी अधिकाऱ्यांच्या 100 टक्के पगारालाही कात्री लावा, अशी मागणी केली होती. ती विभाग नियंत्रकांनी ऐकली होती.
या महिन्यात पुन्हा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत भेदभाव करण्यात आला. यामुळे कामगारांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर वाढीव 10 टक्के पगार देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे समजते. एसटी महामंडळ वाचवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांसह चालक-वाहकांवर उत्पन्न वाढीची मोठी जबाबदारी आहे. एसटीपासून दुरावलेल्या प्रवाशांना पुन्हा बोलावून आणण्याकरिता मेहनत घ्यावी लागणार आहे.
वेतन कपातीची स्थिती पुन्हा येऊ नये, म्हणून वरिष्ठ स्तरावरून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 10 दिवसांचे उत्पन्न राखून ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसत नसल्यामुळे ही गोष्ट साध्य झाली नाही. त्यामुळे आता उत्पन्न वाढीसाठी कर्मचाऱ्यांना काटेकोर रहावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.