चिपळूण ( रत्नागिरी ) - राज्यभरात सोमवारी (ता. 28) कॉंग्रेसचा 135 वा स्थापना दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील कॉंग्रेसचा आढावा घेतला असता रत्नागिरी जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्ष रसातळाला गेल्याचे चित्र आहे. राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस असली तरी सत्तेचा उपयोग करून पक्षवाढ करणाऱ्या खमक्या नेत्यांची जिल्ह्यात उणीव आहे.
रत्नागिरी जिल्हा पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. जिल्ह्यातून 1962 ते 2020 पर्यंत 93 आमदार निवडून गेले. त्यामध्ये कॉंग्रेसचे 30 तर शिवसेनेचे 28 आमदार निवडून आले. 1985 च्या विधानसभा निवडणुकीत दापोलीतून चंद्रकांत मोकल, खेडमधून तु. बा. कदम, चिपळूणमधून निशिकांत जोशी, संगमेश्वरमधून मुसा मोडक, रत्नागिरीतून शिवाजी जड्यार, राजापूरमधून लक्ष्मण हातणकर हे कॉंग्रेसचे तर गुहागरमधून श्रीधर नातू हे एकमेव भाजपचे आमदार निवडून आले होते. पण 1990 च्या विधानसभा निवडणुकीत राजापूरमधून लक्ष्मण हातणकर हे एकमेव कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले होते.
1990 नंतर जिल्ह्यात शिवसेनेचा काळ सुरू झाला तेव्हा कॉंग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना सुरू होता. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून होते; मात्र 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा हात धरला. त्यामुळे कॉंग्रेसची घडी विस्कटली.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे 2005 मध्ये शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये दाखल झाले, तेव्हा पक्षाला बळ मिळले होते. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राणेंचे सुपुत्र नीलेश राणे कॉंग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत निवडून गेले; मात्र राणेंनी कॉंग्रेस सोडल्यानंतर जुने कार्यकर्ते पक्षातच राहिले. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पक्षाचे अस्तित्व असून नसल्यासारखेच आहे.
राज्यात सत्तेत कॉंग्रेस असली तरी सत्तेचा वापर करून संघटना वाढवणारा जिल्हास्तरावरील नेता पक्षात नाही. दोन वर्षापूर्वी रमेश कदमांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला, तेव्हा पक्षाला बळकटी येईल, असे चित्र होते. मात्र कदम यांनीही गटा-तटाला कंटाळून पुन्हा राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. त्यामुळे सद्यःस्थिती जिल्ह्यात कॉंग्रेसचे अस्तित्व शून्य असल्याचे दिसते.
जिल्ह्यात कॉंग्रेसकडे वजनदार नेता नसला तरी तळागाळात आमचा पक्ष अजूनही तग धरून आहे. निवडणुका आल्या की हात या निशाणीचा उमेदवार कोण आहे? अशी विचारणा जुन्या मतदारांकडून केली जाते. कॉंग्रेसचे अस्तित्व संपणार नाही. भविष्यात पक्षाला चांगले दिवस नक्कीच येतील.
- लियाकत शाह, कॉंग्रेसचे चिपळूण शहरप्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.