पंधरा वीस वर्षापुर्वी १०० ते १५० एकरवर असणाऱ्या ऊसाचे क्षेत्र जिल्हयात झपाट्याने वाढले.
वैभववाडी : ऊस गाळप हंगाम सुरू होऊन २० ते २२ दिवस उलटले असले तरी जिल्ह्यात अजुनही ऊस तोडणीला सुरूवात झालेली नाही. तोडणी लांबणीवर जात असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे शेतीचे गणितच बिघडणार असून कोट्यवधी रूपयांचे नुकसान देखील होणार आहे. याशिवाय तोडणी विलंबाने झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
असळज (ता.गगनबावडा) येथील डॉ. डी. वाय. पाटील साखरकारखाना कार्यक्षेत्रात सिंधुदुर्गातील वैभववाडी आणि कणकवली हे दोन तालुके आहेत. या काररखान्यामुळेच या दोन तालुक्यांसह जिल्हयातील अन्य तालुक्यांमध्ये ऊसाचे क्षेत्र वाढले. पंधरा वीस वर्षापुर्वी १०० ते १५० एकरवर असणाऱ्या ऊसाचे क्षेत्र जिल्हयात झपाट्याने वाढले.
हमखास बाजारपेठ आणि निश्तिच दर यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांमध्ये ऊसाची गोडी वाढली. त्याचा परिणाम १५०० हेक्टरवर ऊस लागवड पोहोचली आहे. ऊस उत्पादनाने १ लाख टनाचा टप्पा पार केला आहे. ऊस उत्पादनातून २५ ते ३० कोटीची उलाढाल दरवर्षी होते; परंतु मागील काही वर्षापासून ऊसतोडणीची समस्या शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरू लागली आहे. याच समस्येमुळे काही शेतकऱ्यांनी ऊसशेती करणे देखील बंद केले आहे; परंतु ऊसतोडणी कामगारांची कमतरता हा त्या समस्येमागचा मुळ प्रश्न होता; परंतु आता घाटरस्ता नादुरूस्त असल्यामुळे ऊसतोडणीला सुरू झालेली नाही.
डॉ. डी. वाय. पाटील साखरकारखान्याचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला. सद्यस्थितीत कारखान्याकडे ५२० यंत्रणा कार्यरत आहेत; परंतु त्यातील एकही यंत्रणा अद्याप सिंधुदुर्गात दाखल झालेली नाही. त्याचे मुख्य कारण भुईबावडा घाटातून यापुर्वीच अवजड वाहतुक बंद केलेली आहे तर करूळ घाटरस्त्यातुन खड्ड्यांमुळे ऊस वाहतुक करणे शक्य नाही. त्यामुळे गाळप हंगाम सुरू होवुन २० ते २२ उलटुन देखील एकही यंत्रणा आलेली नाही. इतक्या कालावधीत ५ हजार टनाची ऊस तोडणी होवु शकली असती, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी सावध भुमिका घेत ऑक्टोबरमध्ये घाटरस्त्यांच्या दुरूस्तीची मागणी प्रशासनाकडे केली होती; परंतु सुस्त प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली नाही. परिणामी आजमितीस रस्ता दुरूस्त झालेला नाही.
१ नोव्हेंबर ते १० मार्च या कालावधीत ऊसतोडणी केली जाते. त्यातील नोंव्हेंबर महिना पुर्णतः वाया गेला आहे. आणखी १५ दिवस तोडणी होण्याची शक्यता देखील कमी आहे. त्यामुळे जिल्हयातील संपुर्ण शेतकऱ्यांच्या तोडणीला विलंब होणार आहे. विलंबाने होणाऱ्या तोडणीचे दुरगामी परिणाम ऊसशेतीवर होणार आहेत. अनेक शेतकऱ्यांचा ऊस सध्या सुरू असलेल्या अवकाळीने जमीनीवर कोसळला आहे. वन्यप्राण्यांकडुन देखील ऊसाचे नुकसान सुरू आहे. ऊस तोडणी जितकी लांबणीवर पडणार आहे, तितका ऊस वजनाला कमी होईल असा शेतकऱ्यांचा दावा आहे. याशिवाय तोडणीनंतरचे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडणार आहे.
तोडणीनंतर दोन महिन्यानंतर ऊसाची वाढ होते. त्यानंतरच भरणी केली जाते; परंतु फेब्रुवारी किवा मार्चमध्ये ऊसतोडणी झाली तर मे, जुनमध्ये भरणी करावी लागेल. त्या महिन्यांमध्ये भरणी करणे शक्य होत नाही. याशिवाय पाण्याच्या समस्येला देखील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांचा निडवा आहे, त्यांना नव्याने लागण करता येणार नाही, असे अनेक प्रश्न सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे टन दोन टन ऊस उत्पादन कमी झाले तर कोट्यवधीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
"ऊसतोडणी विलंबाने होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. उत्पादनात देखील घट होणार आहे. अवकाळी पाऊस, वन्यप्राण्यांकडुन सध्याचे उसाचे नुकसान होत आहे. नादुरूस्त करूळ घाटरस्त्यामुळे वर्षभराचे नियोजनच विस्कटणार आहे."
- किशोर जैतापकर, ऊस उत्पादक शेतकरी, नापणे
"कारखान्याकडे सध्या ५२० यंत्रणा उपलब्ध आहे; परंतु जोपर्यंत करूळ घाटरस्त्यांची दुरूस्ती होत नाही, तोपर्यंत सिंधुदुर्गातून ऊस वाहतूक करणे जिकरीचे आहे. रस्ता दुरूस्तीचे काम पूर्ण होताच तत्काळ तोडणी सुरू करण्यात येणार आहे."
- भागोजी शेळके, पर्यवेक्षक, डॉ. डी. वाय. पाटील कारखाना, असळज
सर्वाधिक फटका कणकवली, वैभववाडी तालुक्याला
* लागण, खोडवा, निडवा अडचणीत
* जानेवारीनंतर उष्णता वाढल्यास उत्पादनात घट
* सध्या वन्यप्राण्यांकडुन शेतीचे नुकसान
* अवकाळीच्या तडाख्यात ऊसशेती भुईसपाट
* पुढील वर्षीचे उत्पन्नही घटण्याची शक्यता
- जिल्ह्यात उसाचे एकूण क्षेत्र
१५०० हेक्टर
--------
- डॉ. डी. वाय. पाटील कारखान्याकडे
१२०० हेक्टर
--------
- ऊस उत्पादक शेतकरी संख्या
जिल्ह्यात ९५०
------------
- जिल्ह्याचे एकूण उत्पादन
८५ हजार ते ९५ हजार टन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.