वैद्यकीय क्षेत्रातली अतिशय छोटी पदवी घेऊन आयुष्यभर नाना आणि ताई यांनी केलेली आरोग्यसेवा हे केवळ अर्थार्जनाचे साधन नव्हते तर तो त्यांनी समाजासाठी घेतलेला आरोग्यसेवेचा वसा होता.
१९५२ नंतरची पुढची सलग ४५ ते ५० वर्षे ही केवळ कुलकर्णी ताईंचीच होती. आवाशी या खेड तालुक्यातल्या मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) गावात आजही तुम्ही ‘वत्सला नारायण कुलकर्णी कोणी राहतं का इथे?’ असं विचारलं तर कोणालाही सांगता येणार नाही; पण ''कुलकर्णी ताई (Kulkarni Tai) कुठे राहतात?'' असं विचारलं तर लोक आदराने तुम्हाला घरी नेऊन सोडतील. आज कुलकर्णी ताई हयात नसल्या तरी आजही त्या खेड तालुक्यातील या पंचक्रोशीमधल्या अनेक माणसांच्या मनात आदराचे स्थान राखून आहेत...!
डॉ. नारायण उर्फ नाना कुलकर्णी (Nana Kulkarni) हे देशावरून कोकणात उतरले. सुमारे १९५०च्या सुमारास ते ‘डीएएसएफ’ हा फॅकल्टी कोर्स (Faculty Course) करून डॉक्टर झाले. त्या वेळी आता जशी पीएचसी असतात तशी एसएमपी असत. तिथे आधी नोकरी करावी लागे. आठवड्यातून पाच दिवस फिरून आणि दोन दिवस हेडक्वार्टर अशी सलग सात दिवस रुग्णसेवा करावी लागे. याच काळात मग मार्गाताम्हाणे येथे डॉ. तात्या नातू, सवणस येथे डॉ. दैठणकर आणि लवेलला डॉ. नाना कुलकर्णी यांनी अशी तीन सेंटर सुरू केली. पुढे पाच वर्षांनी डॉ. नाना यांनी नोकरी सोडून दिली आणि खासगी रुग्णसेवा सुरू केली ती अगदी तहहयात.
नानांच्या पश्चात गेली अनेक वर्षे ताईंनी आणि ताईंच्या नंतर देखील हे काम आतां त्यांचा मुलगा आणि सून करत आहे. १९५२ ला नानांचे लग्न झाले आणि कोकणला ताईंच्या रूपाने मिशनरी वृत्तीने रुग्णसेवा करणारी ताई मिळाली. आयुष्याची लग्नाआधीची वर्षे सोडली तर आयुष्याच्या ८९ वर्षांपर्यंत एक निर्व्याज आणि अत्यल्प मोबदल्यात तर कधी मोफत रुग्णसेवेचा वसा घेऊन ताई जगत राहिल्या. जेमतेम पाचवी शिकलेल्या ताई लग्नानंतर ‘आरएमपी’ परीक्षा पास झाल्या.
आवाशी, लोटे, गुणदे, अजगणी, सोनगाव, कोतवली, आयनी, मेटे, माणी, सवेणी, परशुराम या गावात रोज फिरून, छोटे-मोठे आजार, स्त्रियांचे आजार, बाळंतपणे अशी सलग साठ-पासष्ट वर्षे गरजू लोकांना वैद्यकीय सेवा घरपोच दिली. छोटी चण, गोरा रंग, रूंद हसरी जिवणी, चेहरा आणि हालचाल यात एक अनोखा आत्मविश्वास, मायाळू असला तरी थोडा फटकळ स्वभाव, रोगाची आणि रोग्याची अचूक पारख, एकदा आजार कळला की, मग त्यासाठी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिक सेवा ही ताईंची वैशिष्ट्ये होती.
ताईंवर आणि नानांवर लोकांनीदेखील अपरंपार प्रेम केले. उपचाराचे बिल देतील असे नाही; पण येताना घरीदारीं पिकणारा तांदूळ, नाचणी, भाजीपाला, सीझनमध्ये काकड्या, पडवळ, चिबूड यांचा दवाखान्यात ढीग जमत असे. मग ताई प्रत्येकाला तो जे आणणार नाही ते देऊन तो ढीग स्वतःकडे आवश्यक ठेवून संपवत असत. प्रत्येक गावात आल्यावर ताईंचा मुक्काम हा ठरलेल्या वारी आणि ठरलेल्या घरी असे. गावातील लोकं तिथे येत असत. ताईंकडे भल्यामोठ्या चिनी मातीच्या बरण्या लोणच्याने भरलेल्या असत. कोणी गावात आजारी असलं की ताईंकडे हक्काने येत असे आणि हक्काने, तापाने तोंडाला चव नाही सांगून लोणचे घेऊन जाई. मे महिन्याच्या सुट्टीत घरी सुट्टीवर आलेल्या छोट्या मुलांना परत जाताना न चुकता ताई नाक दाबून चांगले चार चमचे एरंडेल पाजूनच परत पाठवत असत.
वैद्यकीय क्षेत्रातली अतिशय छोटी पदवी घेऊन आयुष्यभर नाना आणि ताई यांनी केलेली आरोग्यसेवा हे केवळ अर्थार्जनाचे साधन नव्हते तर तो त्यांनी समाजासाठी घेतलेला आरोग्यसेवेचा वसा होता. कोकणात या क्षेत्रात डॉ. तात्या नातू यांचे जसे आदराने आजही नाव घेतले जाते त्याच पंक्तीत ताईदेखील आहेत. कोकणातल्या या साऱ्या माणसांची जडणघडणच वेगळी झालेली होती. गावोगावी आयुष्यभर पायपीट करून ताईंनी जसे अनेक लोकांचे आशीर्वाद आणि दुवे मिळवले तसेच समृद्ध दीर्घायुष्यदेखील. वयाच्या नव्वदीत कोकणातल्या या मदर तेरेसाने समाधानाने अखेरचा श्वास घेतला.
(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.