राजापूर (रत्नागिरी) : केरळ किनारपट्टीवर आढळणारा तारली मासा स्थलांतरीत म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर येतो. थव्याने राहणारा मासा गेल्या काही वर्षामध्ये आढळत नाहीत. तारली माशारखे अन्य काही मासेही आढळत नसताना नव्या प्रजातीचे काही मासे मिळू लागले आहेत. या बदलत्या मत्स्यप्रकाराचा विचार करताना चिकित्सक पद्धतीने कारणीमिमांसा शोधताना हवामानातील बदल, वाढते जागतिक तापमान, समुद्राचे बदलते प्रवाह आदींचा विचार प्राधान्याने करणे गरजेचे असल्याचे मत मत्स्य अभ्यासक, संशोधक प्रा. स्वप्नजा मोहिते यांनी व्यक्त केले आहे.
असा आहे तारली मासा
तारली माशाचे ‘सार्डिनेला लाँगिसेप्स’ असे शात्रीय नाव असून भारताची पश्चिम किनारपट्टी, श्रीलंका, पाकिस्तान, इराण, ओमान, फिलिपीन्स, सोमालिया, व्हिएटनाम आणि येमेन या देशांच्या किनारपट्टीला हा मासा आढळतो. त्यापासून तेल मिळते म्हणून या माशाला इंग्रजीत ‘ऑइल सार्डीन असे म्हणतात. त्याचे शरीर लांबट आणि दोन्ही टोकांकडे निमुळते असून दोन्ही बाजूंनी चपटे असते. डोक्यापासून शेपटीपर्यंत पाठीकडची कडा जवळपास सरळ तर पोटाची कडा फुगलेली असते. पोटावरील कडेवर धारदार खवल्यांची रांग असते. पाठीचा रंग काळपट चंदेरी असून त्यात मधूनमधून सोनेरी चमक दिसते. पोट रुपेरी असून त्यावर जांभळ्या रंगाची तकाकी असते.पृष्ठार आणि पुच्छपर हिरवट तपकिरी रंगाचे असतात. सर्वसाधारणपणे हा मासा 20-23 सेंमी. लांब व 200 ग्रॅम एवढ्या वजनापर्यंत वाढतो. मात्र, मत्स्योद्योगात पकडले गेलेले मासे 12-15 सेंमी. लांबीचे असतात. नर आणि मादी यांच्या बाह्यस्वरूपात फरक नसतो. हे मासे थव्याने किनार्याजवळ समुद्राच्या वरच्या थरात राहतात.
औषधी गुणधर्मयुक्त तारली मासा
तारली मासा म्हणजेच ‘सारडीन‘मासा खाण्यासाठी वापरतात. त्याचवेळी या माशांपासून चांगल्या दर्जाचे तेल मिळते. ओमेगा-3 हा घटक असणारे हे तेल औषधी आहेच. या तेलापासून साबण, रंगही तयार करतात. या तेलाचा मार्गारीन, पेंट्स, वार्निश आणि लिनोलियम तयार करण्यामध्ये ही वापरले जाते. तेल वेगळे केल्यानंतर उरलेल्या भुकटीचा वापर पशुपक्ष्यांच्या खाद्यामध्ये पूरकघटक म्हणून करतात. ही भुकटी काही कारणाने खराब झाली तर तिचा खत म्हणूनही उपयोग केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून या माशाला मोठ्याप्रमाणात मागणी असते. तरळीच्या सेवनातून प्रथिने, ड व ब 12 जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम मिळतात. हृदयविकार आणि अल्झायमर या रोगांवर उपयुक्त असलेली ओमेगा-3 मेदाम्ले मोठ्या प्रमाणावर शरीराला मिळतात. त्यातच, तरळी माशाची चव आणि पोषणमूल्य चांगले असल्याने मानवी आहारात तरळीला खूपच महत्त्व आहे.
तारलीने तारले असे नेहमी घडणे कठीण
‘तारली’मासे हे मोठ्याप्रमाणात केरळ किनार्याकडे आढळतात. हे मासे योग्य स्थानांसाठी स्थलांतर करत काही वेळेस रत्नागिरी किनार्याकडे वळतात. हे मासे थव्याने राहणारे असल्यामुळे ते पर्ससीनसारख्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात पकडले जातात. पण, जेव्हा तेथील वातावरण योग्य नसेल तर हे मासे त्या किनार्याकडून दुसरीकडे जातात. मासे मिळण्याचे प्रमाण या गोष्टींवर ही अवलंबून असते. त्यामुळे तारलीने तारले असे नेहमी घडणे कठीण.
माशांच्या बाबत कभी खुशी कभी गम
रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर विविध प्रजातीचे मासे विविध हंगामामध्ये मिळतात. त्यामध्ये गेल्या काही वर्षापूर्वी सापडत असलेल्या तारली मासा गेली तीन वर्ष जिल्ह्याच्या किनारपट्टीवर मिळत नाही. त्याच्यासोबत गेल्या काही वर्षामध्ये सुरमई, बांगडा, ढोमा वर्गीय मासे, सौंदाळा, काप, कांटा, टायगर, व्हाईट आणि टायनी सारखी कोळंबी असे काही मासे किनारपट्टीवरून कमी होवू लागले आहे. त्याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना काही मासे नव्याने मिळू लागले आहे. त्यामध्ये काळतोंड्या म्हणजे ट्रिगर फिश, पॅरट फिश, ब्लु रिंग असे प्रवाळांच्या सानिध्यात राहणारे मासे किंवा इतर नव्या माशांच्या प्रजाती मासेमारांना मिळू लागल्या आहेत. काही वेळेस बांगडा, घोळ असे मासे अचानक बम्पर प्रमाणात मिळत आहेत. एकंदरीत, माशांच्या बाबतीत मच्छीमारांमध्ये ‘कभी खुशी, कभी गम’ अशी काहीशी स्थिती आहे.
समुद्रात तयार होतायत ऑक्सिजन विरहित झोन
जागतिक तापमानवाढ होण्यामध्ये पृथ्वीवर वाढणारा कार्बनडाय ऑक्साईड महत्वाचा घटक आहे. समुद्र हा या कार्बनडाय ऑक्साईडचं ‘सिंकचं’ म्हणावं लागेल. हवेत वाढणारा हा कार्बनडाय ऑक्साईड वायू समुद्रात विरघळून पाण्याचे अम्लीकरण होते. यामुळे समुद्रात काही ठिकाणी ऑक्सिजनच प्रमाण कमी होऊन ऑक्सिजन विरहित झोन्स तयार होतात. यामुळे त्या क्षेत्रातले जीव मृत होतात किंवा ते झोन्स सोडून दुसरीकडे जातात. मृत झालेल्या जीवांच्या कुजण्याची प्रक्रिया होऊन पुन्हा पर्यायाने कार्बनडाय ऑक्साईडचं प्रमाण आणखी वाढत. त्यातून, तयार झालेल्या ऑक्सिनजन विरहीत झोन्सचे प्रमाण सध्या वाढलेलं दिसत आहे.
वाढत्या प्लवंगांचा होताय माशांच्या कल्ल्यावर प्रतिकूल परिणाम
कार्बनडाय ऑक्साईडचं वाढतं प्रमाण काही जीवांना मात्र उपयुक्त असू शकत. त्यात काही वनस्पती प्लवंग आणि पेलींळर्श्रीलर सारखे जीव या वातावरणात मोठ्याप्रमाणात वाढतात. त्याचा प्रतिकूल परिणाम माशांवर होतो. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या या सूक्ष्म जीवांमुळे माशांचे कल्ले झाकले जातात आणि त्यांना श्वसनाला त्रास होऊ शकतो. अशा कारणांमुळे मासे ते स्थान सोडून इतरत्र स्थलांतर करू शकतात. काही वेळेस हे बदल ज्यांना अनुकूल असतात असे जलचर या क्षेत्रात येऊ शकतात आणि सूक्ष्म जीव आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे इतर जलचर अशी नवी अन्नसाखळी तिथे वाढू लागते.
मासेमारीतून हजारोंच्या हाताला काम
कोट्यावधी रूपयांची उलाढाल करणार्या मच्छीमारी व्यवसायामध्ये हजारो लोकांना विविध प्रकारच्या रोजगार मिळतो. त्यामध्ये खलाशांसह अन्य प्रकारच्या रोजगाराच्या संधींचा समावेश आहे. एका बोटीवर साधारणतः दहा खलाशी असतात. त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून साधारणतः 50 हजार लोकांना दरदिवशी रोजगार मिळतो. या रोजगार निर्मितीच्या माध्यमातून एका बोटीवरील मासेमारी अनेकांच्या हाताला काम आणि उदरनिर्वाहाचे हक्काचे साधन बनलेले आहे.
एक नजर तारली माशावर
‘तारली’चा मोठ्याप्रमाणात आढळ केरळ किनार्यावर
हा मासा गेली तीन वर्षे जिल्ह्याच्या किनारपट्टीवर नाही मिळत
टायगर, व्हाईट, टायनीसारखी कोळंबी असे काही असे काही मासेही कमी
काही वेळेस बांगडा, घोळ मिळतात अचानक बंपर प्रमाणात
मासा 20 ते 30 सेंटीमीटर लांब व 200 ग्रॅम एवढ्या वजमापर्यंत वाढतो
थव्याने किनार्याजवळ समुद्राच्या वरच्या थरात राहतात
तारली खाण्यासाठीापर, माशांपासून चांगल्या दर्जाचे मिळते तेल
ओमेगा-3 हा घटक असणारे हे तेल औषधी
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून माशाला मोठ्याप्रमाणात मागणी
तारलीच्या सेवनातून प्रथिने, ड व ब 12 जीवनसत्वे, कॅल्शियमही
हृदयविकार, अल्झायमरवर उपयुक्त ओमेगा-3 मेदाम्ले
दृष्टीक्षेपात रत्नागिरी जिल्हा
जिल्ह्याची सागरी किनारपट्टी : 167 कि. मी
माशाची उलाढाल : हंगामात दिवसाला 4.5 कोटी
प्रमुख बंदरे : साखरीनाटे, मिरकरवाडा, जयगड, दाभोळ, हर्णे (दापोली)
पर्ससीन : 281, इतर नौका : 2800
रत्नागिरीपासून खाली साखरीनाटे बंदरासह अन्य परिसरातील सागरी किनारपट्टीवर गेल्या तीन वर्षामध्ये काही प्रजातीचे मासे मासेमारीमध्ये सापडत नाहीत. त्यामध्ये प्रामुख्याने तारली माशाचा समावेश आहे. दोन वर्षानंतर यावर्षी बांगडा मासा काहीप्रमाणात सापडू लागला आहे. शिंगाळा गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी क्वचित प्रमाणात मिळतो. सागरामध्ये होणारे विविध बदलाव, त्यातून निर्माण होणारी प्रतिकूल स्थिती आदी नेमक्या कोणत्या कारणांमुळे गेल्या तीन वर्षामध्ये माशांच्या या प्रजाती कमी होवू लागल्या आहेत. हे नेमके समजत नाही. मात्र, अशा प्रजाती कमी झाल्यास मासेमारी करणे मुश्किल होईल.
अमजद बोरकर, मच्छीमार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.