पाली - सुधागड तालुक्यातील कुंभारशेत या छोट्या गावातील आशिष अशोक मनवी दुबईत रायगड जिल्ह्याचे नाव गाजवत आहे. त्याचे वडील टेम्पो ड्रायव्हर आहेत. छोट्याशा गावात राहून मोठी स्वप्न उराशी बाळगून मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर उच्च शिक्षण घेऊन आशिष आज दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात मोठ्या इमारतीमध्ये शेफ चे काम करत आहे.
आशिष म्हणतो, जार्ज बर्नार्ड शॉ म्हणतात, अन्नावर प्रेम करण्यासारखं प्रामाणिक प्रेम दुसरं नाही. आई सुद्धा म्हणायची एखादया व्यक्तीच्या मनात जागा करण्याचा मार्ग पोटातून जातो. तेव्हा मी ठरवलं की जीवनात सर्वांना आपल्या हातचे चविष्ट पदार्थ खाऊ घालायचे.
आई-वडीलांना चिंता होती माझ्या भविष्याची की मी काय करेल. पण लहान वयात माझे धेय मी ठरवले होते की मला हॉटेल मॅनेजमेंट करून जगातल्या मोठ्या हॉटेल मध्ये शेफ व्हायचयं. याच इच्छेने ध्येय्याने मी पेटलो आणि पुण्यातील डि. वाय. पाटील मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. कॉलेजची वर्षे विस्मयकारक अनुभव व ज्ञान देणारी ठरली.
मला आयटीसी ग्रँड मराठा मुंबई येथे काम करायची संधी मिळाली. प्रचंड मेहनत, तासन तास काम केले. प्रत्येक डिशचे बारकावे शिकून घेतले. चिकाटीने, जिद्दीने तळमळीने रेसीपीज शिकून घेतल्या त्यात नाविन्यता आणल्या स्वतःच्या नवीन संकल्पना समोर ठेवल्या ज्या रुचकर तर होत्याच परंतु त्यापेक्षा जास्त जिभेला आस्वाद व समाधानाचा ढेकर आणणाऱ्या होत्या.
याच कौशल्याची पावती म्हणून कलर्स मराठी चॅनलवर परिपूर्ण मेजवाणी कार्यक्रमात मला डिशेस सादर करण्यासाठी आमंत्रित केलं त्यावेळी टिव्ही वर माझे नाव आलं आशिष अशोक मनवी! हे पाहिल्यास माझ्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि माझ्या मनात समाधान.
आज आशिष दुबईच्या नव्हेतर जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफा इमारतीमध्ये असणाऱ्या मिसेलीयन स्टार्स प्राप्त अरमानी हॉटेल, दुबई येथे चांगला शेफ म्हणून किचन गाजवतोय, या आधी त्याने तेथील पेरगोला डे पाईन्स, ग्रॅण्ड हयात, इटालीयन रेस्टॉरंट 5 स्टार, 7 स्टार हॉटेल मध्ये शेफ म्हणून काम केले.
दुबईत त्याला शेफ ऑफ दी इयर, एम्लॉय ऑफ द इयर अवॉर्ड मिळाले. तसेच तेथील स्पर्धेत त्याला 2 सिल्व्हर व 1 ब्राँझ मेडल मिळाले आहेत. कुंभारशेत या छोट्या गावातील आशिष मनवी दुबईत सुधागडचे नाव गाजवतोय हे नक्कीच अभिमानास्पद आहे. जिद्द, मेहनत, चिकाटी, प्रामाणिक प्रयत्न या गोष्टीमुळे आपण जीवनात नक्कीच यश प्राप्त करू शकलो असे तो तरुणांना आवर्जून सांगत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.