तिवरे : दरडी कोसळल्यानंतर भयग्रस्त अवस्थेत चिखलातून वाट काढीत जेथे आसरा घेतला, त्याच घरांमध्ये रात्री २ वाजता झोपलेले असताना अंगाखालची जमीन खचली. (konkan News) पायाखालची जमीन खचली, असा वाक्प्रचार असला तरी त्याचा शब्दश: अनुभव तिवरे गावातील कातकरी कुटुंबांनी घेतला. या कुटुंबांचे गंगेच्या वाडीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. तेथे त्यांनी ही कर्मकथा सांगितली. (tivare dam, konkan)
दरडी कोसळल्यापासून त्यांचे ४ ठिकाणी स्थलांतर झाले आहे. सध्या ते गंगेच्या वाडीमध्ये अंगणवाडीत राहत आहेत. सकाळ रिलीफ फंडच्यावतीने जीवनावश्यक कीटचे वाटप करण्यासाठी या लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांची कहाणी समोर आली. हे लोक भटके नव्हेत. तिवरे गावातच त्यांची घरे आहेत; मात्र कोसळलेली दरड आणि तुफान पाऊस यामुळे त्यांच्या दुर्दशेला सुरवात झाली. त्या दिवशीची आठवण सांगताना काहीजण अजूनही घाबरेघुबरे होतात. प्रचंड पाऊस पडत होता.
सायंकाळ झाली होती, पावसाच्या अंधारीची त्यात भर. अशातच या लोकांच्या दारात पाणी आले. मोठा आवाजही ऐकू आला. पाण्यासोबत मोठा चिखलही आला. त्यांनी बाहेर जाऊन बघितले तो डोंगरच कोसळलेला होता. भर पावसात त्यांनी फणसवाडीत चिखल तुडवत जात, दत्तू बांद्रे व रघु बांद्रे यांच्या घराचा आसरा घेतला. तेथून सायंकाळनंतर धनावडे यांच्या घरात नेसत्या वस्त्रानिशी ही कुटंबे गेली. रात्री २ वाजता सर्व झोपले असताना अंगाखालच्या जमिनीला भेगा पडू लागल्या. हा अनुभव घाबरवणारा होता. त्यामुळे रात्रभर सारी मंडळी जागी होती. त्यानंतर सकाळी दुसऱ्या कातकरी वाडीत त्यांचे स्थलांतर करण्यात आले. निकम, पवार आणि हिलम आडनावाची ही ९ कुटुंबे आहेत.
'सकाळ'चे मानले आभार
२६ लोक दरडीमुळे भयग्रस्त होऊन कातकरी वाडीत राहिले. तेथून त्यांना ना पुढे जाता येईना ना मागे. भलामोठा डोंगर रस्त्यावर होता. ४ दिवसानंतर तेथून त्यांना अंगणवाडीत हलवण्यात आले. छोट्याशा अंगणवाडीत आणि शेजारच्या एसटीच्या निवारा शेडमध्ये ही ९ कुटुंबे वास्तव्य करून आहेत. त्यांना शिधा मिळाला; मात्र मदत घेऊन येणारे तुम्ही पहिलेच, असे सांगत, 'सकाळ'चे आभार मानताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले. आपल्या घराची स्थिती काय, हे बघायला ते दुपारच्या वेळी जातात. जमेल ती चीजवस्तू घेऊन येतात. त्यावरच गुजराण चालू आहे.
अंगणवाडीत राहण्याबद्दल तक्रार नाही
एक खोली आणि उघडा निवारा यामध्ये २६ जणांना राहायला लागल्याबद्दल त्यांची तक्रार नाही. आजूबाजूच्या वस्तीतील माणसे चांगली आहेत; मात्र तेथे यापैकी कोणी राहायला जात नाही. गावचे माजी सरपंच, आजी सरपंच आणि तरुण नेते येथे येऊन त्यांना सतत दिलासा देत असतात. नशिबानेच आता ही वेळ आणली आहे, ती निभावणार, असेच या कुटुंबीयांनी सांगितले. पहिले ४ दिवस त्यांना जेवण मिळाले मात्र नंतर ही कुटुंबे त्यांचे जेवण तिथेच तात्पुरता निवारा करून करत आहेत.
६०० मीटर लांबवर चिखलाचे साम्राज्य
कातकरी वस्तीलगत मोठी दरड २२ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास रस्त्यावर आली. त्याचबरोबर डोंगर कोसळताना काहीजणांनी पाहिला. मोठ्या वेगाने डोंगर खाली आला आणि ६०० मीटर लांबवर चिखल, माती पसरत पार नदीमध्ये गेला. जेसीबी व पोकलेनच्या साहाय्याने दरड हटवण्याचे काम चार-पाच दिवस सुरू होते. काही दगड महाकाय असल्याने ते ब्लास्टिंग करून फोडावे लागले. आता या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.