पर्यटनस्थळे अविकसित,पर्यटकांसाठी अनैक गैरसोयी
rat19p39.jpg -
संगमेश्वर ः कसब्यातील अनेक मंदिरांची अशी दुरवस्था आहे. (संग्रहित)
पर्यटनस्थळे अविकसित,
पर्यटकांसाठी अनैक गैरसोयी
संगमेश्वर तालुका ; लोकप्रतिनिधिंकडून नाही पाठपुरावा
संगमेश्वर,ता.19 ः पर्यटनस्थळांचा मोठा खजीना असलेल्या संगमेश्वर तालुक्यात पर्यटनस्थळांनाच विकासाची प्रतिक्षा आहे. पुरातत्व विभाग, शासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे येथे येणार्या पर्यटकांना अनैक गैरसोयींना तोंड द्यावे लागते.
श्री देव मार्लेश्वर देवस्थानामुळे संगमेश्वर तालुक्याचे नाव सातासमुद्रापार गेले आहे. कसब्यातील कर्णेश्वर मंदिर हे अप्रतिम शिल्पकलेचा नमुना म्हणून प्रसिध्द आहे मात्र मंदिराच्या इमारतीशिवाय येथे त्यांच्या पदरी काहीच पडत नाही. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली, राजवाडी, गोळवली येथे गरम पाण्याची कुंड आहेत मात्र व्यवस्थित देखभाल, निगा, स्वच्छतेअभावी ही कुंडे पर्यटकांसाठी नाके मुरडण्याचे ठिकाण ठरतात. अपवाद फक्त राजवाडीतील कुंडाचा, अप्रतिम काष्ठकलेचा नमुना असणारे राजवाडीतील सोमेश्वर मंदिर आज अखेरच्या घटका मोजत आहे. प्रतिकाशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कसबा गावात असंख्य पुरातन मंदिरे आज अक्षरशः मोडकळीस येऊन पडली आहे. संगमेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर, सुर्यनारायण मंदिर, काळभैरव मंदिर, ज्ञानवापी तिर्थकुंड अशा स्थळांचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे.
कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांची आठवण असलेला स्तंभ, लेंडीवरील शंभुराजांचा अर्धपुतळा, महामार्गावर शासकीय इमारतीप्रमाणे बांधण्यात आलेले संभाजी स्मारक आदींचा विकास कधी होणार, याची उत्तरे कुणीच देत नाही. संगमेश्वरप्रमाणेच सप्तलिंगी नदीच्या तिरावर निसर्गरम्य परिसरात वसलेली शंकराची सात देवस्थाने, देवरूखजवळच्या पाटगाव येथील श्री सांब मंदिर, मार्लेश्वराची वधु असलेली साखरप्यातील गिरीजा देवीचे मंदिर अशी पर्यटनस्थळेही तालुक्यात आहेत मात्र त्यांचा पर्यटनस्थळांच्या दृष्टीने उपयोग करण्यासाठी ना शासनाचे लक्ष ना लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा यामुळे यातील असंख्य स्थळे ही केवळ कागदोपत्री माहिती करून घेण्यातच पर्यटक धन्यता मानतात.
रस्ते नाहीत
या पैकी अनेक पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी रस्ते नाहीत, रस्ते असल्यास त्यावरून वाहने घेऊन जाण्याची स्थिती नाहीत, या स्थळांबाबत कुठेही एकत्रित माहिती नाही, वाटाडे, मार्गदर्शक अशा सोयीही उपलब्ध नाहीत. यातील बहुतेक पर्यटनस्थळांजवळ जेवणाखावणाचीही सोय उपलब्ध नाही अशा स्थितीत पर्यटक आले तरी पर्यटनस्थळांकडे जाणार तरी कसे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.