Ratnagiri Rain Update
Ratnagiri Rain Update

Kokan Rain Update: दापोलीत मुसळधारेने जनजीवन विस्कळित, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले; आपत्कालीन पथक सज्ज

Published on

दापोलीत मुसळधारेने जनजीवन विस्कळित
दाभोळ, ता. १९ः दापोली तालुक्यात मंगळवारी (ता. १८) सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे केळस्कर नाका, तहसील कार्यालय, नर्सरी रोड येथे मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळित झाली आहे. तालुक्यात आज सकाळी संपलेल्या २४ तासात १३०.४ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाल्याची माहिती कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाने दिली आहे.

पावसामुळे दापोली शहरातील केळस्कर नाका, तहसील कार्यालय, नर्सरी रोड येथे मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. हर्णै, फत्तेगड व राजेवाडी तसेच पाजपंढरी येथून दरडग्रस्त भागातील ५ कुटुंबातील २४ जणांना स्थलांतरित केले आहे.

दाभोळ येथील ढोरसई येथील दरड कोसळण्याच्या शक्यतेने ५ कुटुंबातील ३५ जणांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. तालुक्यातील शिरसोली-मुगीज रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. जालगाव ग्रामपंचायातीमागील समर्थ नगर, मित्रनगर भागात पावसाचे पाणी साचल्याने या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना ग्रामपंचायतीने सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दापोली, मंडणगड रस्त्यावर पावसामुळे काही ठिकाणी झाडे पडली होती ती तोडून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पावसामुळे १६ घरांचे अंशतः नुकसान झाल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मदतकार्यासाठी मनसेचे तसेच शिवसेनेचे पथक तयार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. आपत्कालीन पथकही तयार ठेवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.