आंबोलीत निसर्ग पर्यटनाला मान्यता

आंबोलीत निसर्ग पर्यटनाला मान्यता

Published on

25045
आंबोली ः परिसरातील समृद्ध पर्यावरण.

आंबोलीत निसर्ग पर्यटनाला मान्यता

‘वन’कडून परवानगी; नवी ओळख आणखी व्यापक होणार

सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. २२ ः वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीमध्ये अखेर निसर्ग पर्यटनाला शासनाकडून अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना जंगल सफर तसेच आंबोलीतील अन्य पर्यटन स्थळांचा आनंद घेता येणार आहे. या निर्णयामुळे पर्यटन विकासासमवेत स्थानिक तरुणांना त्याचा फायदा होणार आहे, अशी माहिती संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्यावतीने आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी दिली.
आंबोली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ब्रिटीश काळात विकसित करण्यात आले होते. सरकारी अधिकारी या ठिकाणी विश्रांतीसाठी यायचे. नंतरच्या काळात येथील पर्यटन विकास काहीसा मंदावला; मात्र सिंधुदुर्गात पर्यटन विकासाचे वारे वाहू लागल्यानंतर पहिल्या टप्प्यातच आंबोलीचा विकास सुरु झाला. सुरुवातीला थंड हवेचे ठिकाण अशीच ओळख वाढत होती. हळूहळू येथे हॉटेल व इतर पर्यटन विकास विस्तारु लागला. पुढच्या काळात मात्र आंबोलीच्या पर्यटनाची ओळख काहीशी बदलत गेली. वर्षा पर्यटनाला जास्त प्रसिध्दी मिळाली; मात्र हा हंगाम मर्यादित काळाचा असतो. यामुळे येथील पर्यटनाच्या वाढीला काहीशा मर्यादा आल्या.
गेल्या काही वर्षात येथील पर्यटनाला आणखी एक समृध्द बाजू जोडली गेली. येथे जैवविविधता मोठ्या प्रमाणात आहे. अनेक दुर्मिळ प्राणी, पक्षी, वनस्पती या ठिकाणी सहज दिसतात. या गोष्टी प्रकाशात आल्यानंतर निर्सगाची आवड असलेल्यांबरोबरच निसर्ग अभ्यासक येथे येऊ लागले. त्यातून निर्सग पर्यटन आणि आंबोली यांचे घट्ट नाते तयार झाले.
आंबोली परिसरात रितसर परवानगी मिळावी, यासाठी निसर्ग अभ्यासक गेली बरीच वर्षे प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांचा सकारात्मक विचार करून संयुक्त वन व्यवस्थापन समिती आंबोलीच्या माध्यमातून वन विभाग, सावंतवाडी यांच्याकडे परवानगीची मागणी केली होती. या सर्वांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. आंबोली परिसरात आढळणारे वेगवेगळ्या प्रजातीचे साप, बेडूक, मासे, फुलपाखरू व इतर कीटक व वनस्पती हे वाइल्ड लाईफ छायाचित्रकरांसाठी व निसर्ग अभ्यासाकांसाठी व संशोधकांसाठी एक नविन डेस्टिनेशन बनत चालले आहे.
----------
कोट
जैवविविधतेने संपन्न असणाऱ्या आंबोलीमध्ये धबधब्यांशिवाय बघण्यासारखे खूप आहे. मागील वीस वर्ष हा निसर्गाचा खजिना जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करीत होतो. त्याला आज यश आले आहे. यापुढे निसर्ग पर्यटन करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही, याचे भान ठेवून एक चांगले मॉडेल महाराष्ट्र समोर ठेवण्याची संधी आपल्याला लाभली आहे. शाश्वत (Sustainable) आणि जबाबदार (responsible) निसर्ग पर्यटन या जिल्ह्यामध्ये रुजवण्याची ही चांगली संधी आपल्याला मिळाली आहे याचा आनंद आहे."
- हेमंत ओगले , निसर्ग अभ्यासक तथा फुलपाखरू तज्ञ
----------
कोट
आम्ही गेली अनेक वर्ष निसर्ग पर्यटन आंबोलीमध्ये सकाळी सहा ते दहा या वेळात होण्यासाठी प्रयत्न करत होतो. नुकत्याच झालेल्या पर्यटन महोत्सवात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि सरपंच सावित्री पालेकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले होते. शासनाने मान्यता दिल्याने आम्ही शासनाचे आभार मानतो. निसर्ग पर्यटनामुळे येथील हॉटेल व्यवसायिकांबरोबरच इतर व्यवसायिकांना सुद्धा चालना मिळणार आहे.
- काका भिसे, निसर्ग अभ्यासक, आंबोली
----------
कोट
आंबोलीत काही युवकांना वन विभागाच्यावतीने प्रशिक्षण देण्यात आले होते. त्या युवकांच्या उपस्थितीत नितसर नोंदणी करून निर्धारित वेळेसाठी निसर्ग पर्यटनसाठी परवानगी देण्यात आली आहे. निसर्ग पर्यटन करताना वन विभागाने दिलेल्या सर्व अटी व शर्तीचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करायचे आहे. मिळालेल्या संधीचे सोने करावे.
- सौ. सावित्री पालेकर, सरपंच तथा संयुक्त वन व्यवस्थापन समिती, आंबोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.