रत्नागिरी ः वाहनांची वर्दळ नियंत्रणासाठी विशेष नियोजन

रत्नागिरी ः वाहनांची वर्दळ नियंत्रणासाठी विशेष नियोजन

Published on

रहदारी नियंत्रणासाठी विशेष नियोजन

गणेशोत्सव ; डेल्टा फोर्स, वाहनांच्या गस्तीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः कोकणातील गणेशोत्सव शांततेत, सुरळीत आणि विनाअपघाती व्हावा यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची वर्दळ नियंत्रित करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) डॉ. रवींद्र सिंगल यांनी केले. महामार्गावर डेल्टा फोर्स व पेट्रोलिंग वाहनांची गस्त वाढवण्यात आली आहे. वाहतूक सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी सूचनाफलक, गतिरोधक फलक, वाहतूक नियंत्रण सूचनाफलक आदी लावण्यात आले आहेत.
गणेशोत्सव काळात गणेशभक्तांना त्यांच्या गावी वेळेत पोहोचता यावे व गणेशोत्सवादरम्यान वाहतूककोंडी न होता हा सण निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी आज नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. शासकीय सुट्टीला जोडून १६ व १७ ला शनिवार व रविवार आल्याने महामार्ग क्र. ६६ वरील वाहतूककोंडी लक्षात घेता पोलिस प्रशासनामार्फत वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. महामार्गावर दुरुस्तीअंतर्गत खड्डे बुजवणे, बाजूपट्ट्या दुरुस्त करणे, लेन मार्किंग करणे, माहितीफलक स्वच्छ करणे इत्यादी कामे सुरू आहेत.नियोजित ठिकाणी रंगीत तालीम करावी, असे आदेश आहेत. मुंबई-गोवा महामार्ग ब्लॅकस्पॉट, रस्ते दुरुस्ती तसेच इतर अडचणींबाबत चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत ३ हजार २०० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. अपघात टाळण्याकरिता चालक आणि वाहक यांची अल्कोहोल चाचणी करण्यात येणार आहे. सहा अपघातप्रवण क्षेत्रात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे पथक तैनात ठेवण्यात येणार आहेत. बसस्थानकावरील चोरीसारखे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने सर्व प्रकारची काळजी मंडळामार्फत घेण्यात येणार असल्याची माहिती या वेळी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या प्रतिनिधींनी दिली.

गणेशभक्तांच्या सेवासुविधांसाठी

दर १५ किमी अंतरावर सुविधाकेंद्र
केंद्रात आरोग्यविषयक सुविधा
शौचालयासह चहापान कक्ष
स्तनदा मातांसाठी स्वतंत्र कक्ष
वाहनांच्या दुरुस्तीचीही व्यवस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.