शेतीची भरभराट होवो, बळीराजाला ''फळ'' मिळो
32076
ओटवणे ः पारंपरिक नवं कापणी सोहळ्यात सहभागी ग्रामस्थांसह चाकरमानी.
शेतीची भरभराट होवो,
बळीराजाला ‘फळ’ मिळो
ओटवणेवासीयांचे साकडे ः पारंपरिक ''नवं कापणी'' सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २० ः ओटवणे गावातील घरे आज ‘नव्या’च्या तोरणांनी सजविण्यात आली. शेतीची भरभराट होवो आणि बळीराजाला मेहनतीचे फळ मिळो, अशी प्रार्थना करून नव्याची म्हणजे भाताच्या रोपांची पूजा या गावरहाटीतील सोहळ्यात करण्यात आली.
राजेशाही संस्थानकालीन परंपरा लाभलेल्या ओटवणे गावातील गेल्या ४७५ वर्षांची या अखंड परंपरेचा हा सोहळा काल (ता. १९) ढोलताशांच्या गजरात व मानकऱ्यांच्या उपस्थितीत पुरोहितांच्या मंत्रघोषात उत्साहात पार पडला. ओटवणे गावच्या संस्थानकालीन रुढी परंपरेतील एक असलेली आणि दरवर्षी गणेश चतुर्थी किंवा काही धार्मिक अडचण असल्यास दसरोत्सवाच्या कालखंडात हा नव्याचा सोहळा केला जातो. या ‘नव कापणी’ सोहळ्यासाठी आदल्या दिवशी गावात मानाच्या ठिकाणी दवंडी देऊन ग्रामस्थांना सूचित केले जाते. सकाळी मान-मानकरी एकत्र कुळघर येथे जमा होतात. तेथून वाजतगाजत नवं कापणीच्या ठिकाणी ग्रामस्थ मार्गक्रमण करतात. मानकरी देवदेवतांना साकडे घालत मंत्रघोषात, ढोलताशांच्या गजरात ह्या नव्याची कापणी करण्यात आली. त्यानंतर त्याची विधिवत पूजा करण्यात आली. घरातील देवदेवतांसह दरवाज्यांवर ही नव्याची तोरणे म्हणजेच नव्याने फुटोऱ्यावर आलेल्या भाताच्या लोंब्यांनी तयार केलेली तोरणे सजवली जातात.
गावच्या प्रत्येक रुढी-परंपरेला एक वेगळी आख्यायिका आहे. ही तोरणे घरात दरवाजावर सजल्याने घरात सौख्य येते, घरदाराची अन्नधान्याने भरभराट होते, अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे. गेली सुमारे पावणे पाचशे वर्षे हा सोहळा अखंडितपणे सुरू आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत हा सोहळा होत असल्याने गावातील ग्रामस्थांसह चाकरमान्यांनी यामध्ये भक्तिभावाने सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.