कोकणातील देवीची (शक्तीची) उपासना
११ (टुडे पान ४ साठी, सदर)
(२८ सप्टेंबर टुडे ४ )
जनरिती- भाती ..............लोगो
-rat४p८.jpg ः
२३M३५६६८
डॉ. विकास पाटील
-------
कोकणातील देवीची (शक्तीची) उपासना
कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्याबरोबरच आपला पारंपरिक रीतीरिवाज जपत महाळ साजरा होतो. त्यानंतर सुरू होतात ते नवरात्रोत्सवाचे वेध. कोकणात शिवाची जशी उपासना केली जाते त्याप्रमाणे शक्तीची उपासनादेखील केली जाते. दक्षिण कोकणात अनेक देवीची मंदिरे आपणास दिसतात. त्यांची वेगवेगळी नावे असलेली दिसतात. काही ठिकाणी ही शक्तीदेवता ग्रामदेवता आहे तर काही ठिकाणी तिला अनेक खेड्यांची मालकीण मानले जाते. देवरूख परिसरातील सोळजाई ही ४४ खेड्यांची देवता म्हणून ओळखली जाते. त्याबरोबरच राजापूरजवळील आडिवऱ्याची महाकालीदेखील त्या परिसरातील मुख्य देवता म्हणून ओळखली जाते. या शक्तीदेवतांची नावे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असलेली दिसतात. आर्यादुर्गा, महाकाली, चंडिका, विठू महाकाली अशा विविध नावांनी या शक्तीदेवतांना ओळखले जाते.
-डॉ. विकास पाटील
-----
आज महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपिठे मानली जात असली तरी कोकणातील या शक्तीदेवतांना अंशरूप शक्तीस्थळे मानली जातात. चिपळूणच्या विंध्यवासिनी देवीस अंशरूप शक्तीस्थळ मानले जाते. कोकणचा निर्माता परशुराम यांची माता रेणुका यांना शक्तिरूप मानले जाते. सिंधुदुर्गात दिसणारे वारूळाचे रूप हे रेणुकामातेचे रूप मानले जाते. रेणुकामाता ग्रामदेवता मानली गेली आहे. तिचा वारूळाशी संबंध अनेक कथेतून दाखवलेला आहे. रेणुका ही वारूळात जन्मली आणि वारूळातच अदृश्य झाली, अशी कथा आहे. त्यातूनच दक्षिण कोकणात वारूळ पूजेची प्रथा निघाली असावी, असा अंदाज बांधला जातो. अशीच रेडीची प्राचीन स्वयंभू, जागृत देवता म्हणून श्री माऊलीस ओळखले जाते. ही ४८ चाळकऱ्यांची देवता असल्यामुळे भूताखेतांवर तिचा अधिकार आहे. देवीच्या जागृतपणाच्या अनेक आख्यायिका ऐकायला मिळतात. त्यातीलच एक म्हणजे पोर्तुगीजांनी या परिसरात प्रवेश केल्यावर तेरेखोलपर्यंत आक्रमण केले. इ. स. १८१७ ला त्यांनी हस्ताच्या डोंगरावरून या माऊली मंदिरावर तोफा डागल्या. दुसऱ्या दिवशी आक्रमण होणार ते कसे टाळावे म्हणून देवीला कौल लावण्यात आला. देवीने सांगितले, घाबरू नको, कोणी भीतीने गाव सोडू नका. तीन दिवसात मी संकट दूर करते. तिसऱ्या दिवशी पोर्तुगीजांच्या तोफेचे गोळे मंदिराच्या आवारात पडताच लक्षावधी गांधील माशा उत्पन्न झाल्या व त्यांचे थवेच्या थवे तेरेखोलच्या दिशेने घोंगावत गेले. पोर्तुगीजांनी संकट पाहताच पळ काढला. पुन्हा ते मंदिराच्या नाशास कधी प्रवृत्त झाले नाहीत. रेडीच्या सीमेवरील नागोळेवाडीत श्रीदेवी भवानीमातेचे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराला भेट दिल्याचे परंपरागत कथांवरून दिसते. प्रतापगडची भवानी व देवीच्या मुखवट्यात कमालीचे साम्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रेडीच्या यशवंतगडाला भेट दिल्यावर या मंदिरातील मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे सांगण्यात येते. गुहागर तालुक्यातील दुर्गादेवीचे मंदिर दुर्गादेवीच्या माहात्म्यामुळे सर्वदूर पोहोचले आहे. एप्रिल महिन्याच्या ३० तारखेला दुर्गादेवीचा वाढदिवस असतो. या वाढदिवसाचे विशेष म्हणजे या दिवशी देवीला कुमारिका, सौभाग्यवती आणि गंगा भगीरथी अशा तिन्ही रूपातल्या स्त्रिया देवीला औक्षण करतात. विधवा स्त्रियांनी औक्षण करू नये, असे मानणाऱ्या समाजाला पुढे घेऊन जाणारी या मंदिरातील ही प्रथा इतर ठिकाणीही अनुकरणीय आहे. देवरूख गावची सोळजाई भक्तावरील कृपेसाठी अशीच प्रसिद्ध आहे. ही देवता प्रेमळ मानली जाते. तिच्याकडे एखादी गोष्ट मागितल्यास ती रिक्तहस्ते पाठवत नाही, अशी श्रद्धा आहे.
दीडशे वर्षांपूर्वी एका माणसाने देवीला अर्वाच्य शब्द उच्चारले. देवीशी अरेरावी करणाऱ्या या माणसाला देवीने योग्य शिक्षा दिली. देवी आपल्यावर कोपली आहे, हे लक्षात येताच या व्यक्तीने देवीचे कारखानदार, कुमकर यांना गाठून देवीबाबत बोललेल्या चुकीच्या शब्दांची कबुली दिली. ''आपली चूक झाली असून, पुन्हा अशी चूक होणार नाही. झालेल्या चुकीसाठी प्रायश्चित्त द्या'', अशी विनवणी केली. दिलेल्या शिक्षेनुसार त्याने देवीच्या पुढ्यात देवीला पाच लोटांगणे घालून देवीची माफी मागितली. या दिवशी देवीचा उत्सव असल्याने सारे गावकरी मंदिरात उपस्थित होते. त्या वेळी देवीने त्याला माफ केले. त्या वेळेपासून देवीसमोर नवस बोलणाऱ्या भक्तांनी आपलं मागणं पूर्ण व्हावं म्हणून देवीपुढे लोटांगण घालण्याचा मार्ग आपलासा केला. त्यावरून नवस बोलले जाऊ लागले आणि नवस फेडण्यासाठी लोटांगण घातले जाऊ लागले, अशी ही आगळीवेगळी लोटांगण घालण्याची परंपरा सोळजाई देवीच्या मंदिरात दिसते.
दापोली तालुक्यातील आंजर्ले गावची दुर्गादेवी भक्तांना पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. देवीच्या रथोत्सवात दुर्गादेवीचा रथ ओढत गावकरी संपूर्ण गावात फिरत असतात. माहेरवाशिनी रथाची व देवीची पूजा करतात. हे मंदिर सोळाव्या शतकातील असून, या मंदिरातील शिळेची अष्टभूजा महिषासूरमर्दिनी रूपातील मूर्तीची थोरले बाजीराव पेशवे यांच्या कारकीर्दीत प्रतिष्ठापना झाल्याचे सांगितले जाते. दाभोळ बंदराजवळ वाशिष्ठी नदीच्या तीरावर चंडिका देवीचे स्वयंभू प्रसिद्ध मंदिर आहे. एकसंध कातळात तयार झालेल्या नैसर्गिक गुहेमध्ये चंडिका देवीची सुमारे साडेतीन फूट उंचीची काळ्या पाषाणातली शेंदूर लावलेली मूर्ती आहे. ही मूर्ती जितकी सुंदर तेवढीच रूद्रही भासते. देवीचा कृपाशीर्वाद संपूर्ण दाभोळ परिसरावर असल्याचे मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळ जिंकल्यावर अंजनवेल, गोपाळगड, गोवळकोट व आडिवरे या भागावर स्वारी केल्यावर चंडिका देवीचे दर्शन घेतल्याचे सांगितले जाते. अशा आपल्या दैवी माहात्म्याने आणि जनमानसात रूजलेल्या भक्तीभावनेतून आपले अलौकिकत्व या शक्तीदेवता प्रकट करताना दिसतात. परंपराप्रिय कोकणी समाज या साऱ्या परंपरांचे पालन करताना दिसतो. ही अशी शक्तीची आराधना कोकणात मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसते.
(लेखक महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.