राष्ट्रवादीच्या जिल्हा विरूद्ध तालुका कार्यकारणीमध्ये संघर्ष
जिल्हा विरुद्ध तालुका
कार्यकारणीमध्ये संघर्ष
राष्ट्रवादीचे दोन्ही गट आक्रमक; चित्रा चव्हाण पक्ष सोडणार की संघर्ष करणार
चिपळूण, ता. ११ः राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण यांनी पक्षातील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत माजी आमदार रमेश कदम यांनाच आव्हान दिले आहे. चव्हाण यांना जिल्हा कार्यकारिणीतील महिलांनी पाठिंबा दिला; मात्र त्यांच्या विरोधात तालुक्यातील महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारिणीविरुद्ध तालुका कार्यकारिणी समोरासमोर उभी ठाकली आहे. जिल्हा महिला कार्यकारिणीतील वाद आता वरिष्ठांच्या कोर्टात गेला आहे. या पार्श्वभूमीवर चित्रा चव्हाण पक्ष सोडणार की पक्षात राहून संघर्ष करणार हे येत्या काळात पाहावे लागणार आहे.
चिपळूण येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा मेळाव्यात महिला जिल्हाध्यक्ष म्हणून चित्रा चव्हाण यांना योग्य तो मानसन्मान मिळाला नाही. त्यामुळे चित्रा चव्हाण यांनी मेळाव्यातच नाराजी व्यक्त केली. पक्षाचे नेते बबन कनावजे आणि माजी आमदार रमेश कदम यांचा समाचार घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत रमेश कदम यांच्या कार्यपद्धतीमुळे आमदार शेखर निकम किती त्रस्त झाले, आमदार भास्कर जाधव राष्ट्रवादी सोडून का गेले, रमेश कदमांना पालिका ताब्यात का हवी, राजकारणात राहून ते आर्थिक गणिते कशी बांधतात, विरोधी पक्षाबरोबर कशी हातमिळवणी करतात, मी पक्षासाठी किती योगदान दिले, जिल्ह्यात कशी संघटना बांधणी आदी विषयांवर चित्रा चव्हाण यांनी माहिती दिली.
चिपळूण, राजापूर, लांजासह जिल्ह्यातून आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी चित्रा चव्हाण यांना पाठिंबा दर्शवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीच्या तालु्क्यातील रमेश कदम समर्थक महिला पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा चव्हाण यांना यापुढे पक्षाने पद दिल्यास आम्ही काम करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे महिला राष्ट्रवादीतील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
चिपळूणमध्ये घडलेल्या वादावादी दोन्ही गटाकडून पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचवण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आमदार शेखर निकम यांचा गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर गेला. माजी आमदार रमेश कदम शरद पवार यांच्याबरोबर राहिले. जिल्ह्यात राष्ट्रवादीची सर्वाधिक ताकद चिपळूण आणि खेड तालुक्यात तालुक्यात आहे. चिपळूणमधील राष्ट्रवादीचे दोन गट झाले आहेत. दोन्ही गट तुल्यबळ आहेत. इतर तालुक्यात शरद पवार यांचा गट मजबूत आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी नेमकी कोणाची बाजू घेतात याकडे लक्ष आहे.
चौकट
चित्रा चव्हाण विधानसभेसाठी इच्छुक
केंद्र आणि राज्य सरकारमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय नुकतेच झाला आहे. २०२४ च्या निवडणुकीत त्याची अंमलबजावणी झाली आणि चिपळूण महिलांसाठी आरक्षित झाले तर चित्रा चव्हाण विधानसभेसाठी इच्छुक आहेत; मात्र त्यांचा स्वभाव स्पष्ट, रोखठोक आणि कारभार स्वतंत्र आहे. त्यामुळे दोन्ही गटाच्या राष्ट्रवादीतील काही जणांचा त्यांना विरोध आहे, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.
कोट
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या कानावर मी सर्व गोष्टी घातल्या आहेत. जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांनीही आपल्या भावना खासदार सुळे यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे योग्य तो निर्णय होईल.
- चित्रा चव्हाण, जिल्हाध्यक्ष, महिला राष्ट्रवादी काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.