कणकवली तालुक्यात अवैध उत्खनन

कणकवली तालुक्यात अवैध उत्खनन

Published on

50951
परशुराम उपरकर

कणकवली तालुक्यात अवैध उत्खनन

परशुराम उपरकर ः कारवाई न केल्यास आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १३ ः तालुक्यातील कासार्डे, पियाळी, वाघेरी, लोरे आणि फोंडाघाट परिसरामधून मोठ्या प्रमाणात अवैध सिलिका माईन्स उत्खननासह वाळूची बेकायदा वाहतूकही होत आहे. याबाबत योग्य कारवाई न केल्यास मनसे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडेल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज येथे दिला.
येथील मनसेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. उपरकर म्हणाले, ‘‘सिलिका मायनिंगसाठी याआधी काही विनापरवाना व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली होती. यातील ४५ कोटींचा दंड अद्याप वसूल झालेला नाही. ‘इकोसेन्सिटिव्ह झोन’मध्ये हे उत्खनन सुरू आहे. कणकवली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिलिका माईन्स उत्खनन बेकायदा सुरू होते. याबाबत मनसेने आवाज उठवला होता. तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनीही तक्रार दिली होती. आमदार नीतेश राणे यांनी वाघेरी येथील बेकायदेशीर सिलिका मायनिंगसंदर्भात तक्रार केली होती. तेव्हा ३० कोटी रुपये दंड ठोठावला होता. तो दंड अद्याप वसूल झाला नाही. त्यानंतर २६ मार्च २०२१ रोजी तत्कालीन कणकवलीच्या तहसीलदारांनी अनधिकृत सिलिका मायनिंगवर आणि विनापरवाना उत्खननधारकांवर कारवाई करणारा अहवाल तयार केला होता. तेव्हा कागदपत्रांची पूर्तता करण्याची हमी दिली होती. या वेळी विविध अनधिकृत व्यावसायिकांना ठोकलेला दंड जवळपास ४५ कोटींपेक्षा अधिक आहे. तो अद्याप भरलेला नाही. काही व्यावसायिकांनी ‘इकोसेन्सिटिव्ह झोन’मध्येही अनधिकृत व्यवसाय उभारले होते. सध्या हे व्यवसाय सुरू आहेत. या विरोधात संबंधित यंत्रणांना पत्रव्यवहार करून त्यांनी कारवाई न केल्यास मनसे आंदोलन छेडेल. प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडला जात आहे. या विरोधात मनसेचे हे आंदोलन आहे.’’
---
चौकट
‘फोंडाघाटमार्गे अवैध वाळू वाहतूक’
‘‘जिल्ह्यात सध्या अवैध वाळू वाहतूक होत असल्याने पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे करूळ घाट आणि फोंडाघाट नादुरुस्त आहेत. सध्या फोंडाघाट मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक सुरू आहे. यामुळे घाटरस्ताही नादुरुस्त होऊ लागला आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर नियंत्रण न आल्यास आणि कारवाई न झाल्यास मनसे त्याचे पुरावे आपल्यासमोर सादर करेल,’’ असा इशाराही श्री. उपरकर यांनी दिला.
---
‘सीसीटीव्ही लावून पुरावा देणार’
श्री. उपरकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नदी, नाले आणि खाड्यांमधून वाळूची चोरटी वाहतूक केली जाते. यासाठी याआधी महसूल विभागाने जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर विशेष पथके तैनात केली होती. मात्र, सध्या ही पथके तैनात केलेली नाहीत. सीसीटीव्हीही लावलेले नाहीत. जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर मनसेतर्फे सीसीटीव्ही लावून जिल्हा प्रशासनाला तसा पुरावा दिला जाईल. योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलन छेडू.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.