Olive ridley sea turtle
Olive ridley sea turtleSAKAL DIGITAL

Ground Report: कोकणातील ऑलिव्ह रिडले कासवाच्या संवर्धनातील अडथळे काय?

रत्नागिरी जिल्ह्यात वेळास, केळशी, आंजर्ले, मुरूड, कर्दे, लाडघर, गावखडी, वेत्ये-तिवरे-आंबोळगड, माडबन, दाभोळ, कोळथरे, गुहागर, मालुगंड येथे कासव संवर्धन केले जात आहे.
Published on

Why should we save the Olive ridley sea turtle in Konkan

दुर्मिळ प्रजाती मानल्या जात असलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीची समुद्र कासवे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर विणीच्या हंगामामध्ये अंडी घालण्यासाठी दरवर्षी येते. मात्र, समुद्रामध्ये सातत्याने विविध कारणांमुळे होणारे बदल, पर्यावरणामध्ये झालेले प्रतिकूल बदल, तापमानामध्ये होणारे कमी-जास्त बदल या सार्‍यातून कासवाच्या विणीच्या म्हणजे घरटं करण्याच्या हंगामावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यातून, घरटं करण्याचा ‘पिक नेक्स्टिंग सिझन’ सुमारे महिनाभर लांबणीवर गेल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम अंड्यातून पिल्लं बाहेर येण्यावर (प्रजनन) होत आहे. प्रजनन काहीसे घटत असल्याचे प्राथमिक निरिक्षणे कासव अभ्यासकांकडून नोंदविली जात आहेत. यावर अभ्यासकांमध्ये मतमतांतरांची शक्यता नाकारता येणार नाही.बदलत्या भौगोलीक स्थानांबाबत ही निरीक्षणे वेगवेगळी असू शकतील. निसर्गातील प्रतिकूल बदलाव रोखणे वा त्यावर मात करणे सद्यस्थितीमध्ये अशक्यप्राय असले तरी, समुद्र परिसरासह पर्यावरणामध्ये होत असलेला प्रतिकूल बदल लक्षात घेऊन ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या संवर्धनांसाठी प्रयत्न सुरू असून यातून पर्यावरणाची जाणीवही वाढत आहे.

नेमकी याच किनारपट्टीची निवड का ?

रत्नागिरी जिल्ह्यातील चौदा ठिकाणांसह कोकण किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये कासवाची अंडी गेल्या काही वर्षापासून सातत्याने सापडत आहेत. मात्र, याच भागामध्ये कासवाच्या माद्या अंडी घालण्यासाठी नेमक्या का येतात असा प्रश्‍न सार्‍यांसमोर ठाकतो. मात्र, त्याचे निश्‍चित कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. जिल्ह्यातील चौदा ठिकाणा व्यतिरीक्त अन्य किनारपट्टीवरील भागात कासवाची मादी अंडी घालण्यासाठी येत नाही असे ठामपणे म्हणता येत नाही असे मत काही कासवमित्रांकडून मांडले जात आहे. असे असले तरी, गेल्या काही वर्षामध्ये कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर ज्याअर्थी अंडी घालण्यासाठी कासवाची मादी येते त्याअर्थी किनारपट्टीवरील ‘ती’ ठिकाणं ऑलीव्ह रिडले प्रजातीच्या समुद्र कासवांसाठी काहीशी ’सेफ झोन’ ठरताना दिसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात वेळास, केळशी, आंजर्ले, मुरूड, कर्दे, लाडघर, गावखडी, वेत्ये-तिवरे-आंबोळगड, माडबन, दाभोळ, कोळथरे, गुहागर, मालुगंड येथे वन विभाग आणि कांदळवन कक्षांच्या मार्गदर्शनाखाली कासव संवर्धन केले जात आहे.

Olive ridley sea turtle
खोल काळोख्या गुहांत आजही जिथे मानवी उत्क्रांती संबंधीचे अनेक पुरावे सापडतात

कासवमित्रांची भूमिका महत्वपूर्ण

वाळूमध्ये खड्डा खोदून मादी कासवाने घातलेल्या अंड्यांचा शोध घेवून त्याचे संवर्धन करण्यामध्ये कासव मित्रांची भूमिका महत्वाची ठरत आहे. कासवाच्या प्रजननाच्या काळामध्ये पहाटेच्या प्रहरी समुद्र किनारपट्टीवर नियमित फेरफटका मारून वाळूमध्ये कासवाच्या उमटलेल्या पावलांचा पाठलाग करीत कासवमित्रांकडून कासवाच्या मादीने घातलेल्या अंड्यांचा शोध घेतला जातो. त्यानंतर, त्या अंड्यांना जंगली श्‍वापदे, कुत्री यांच्याकडून असलेला संभाव्य धोका लक्षात घेवून त्यांचे कासवमित्रांकडून वनविभागाच्या मागदर्शनाखाली योग्य पद्धतीने संरक्षित करून ठेवली जातात.

Ratnagiri Sea Turtle
Ratnagiri Sea TurtleSakal

‘पिक नेक्स्टींग सिझन’ लांबणीवर

पर्यावरणातील सातत्याने झालेल्या बदलांचा ऑलिव्ह रिडले कासवाच्या विणीच्या हंगामावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा प्राथमिक अंदाज कासव अभ्यासकांकडून वर्तविला जात आहे. त्यातून, अंडी घालण्यासाठी येण्याचा मादी कासवाचा कालावधीमध्ये सुमारे महिनाभर उशीरा सुरू होत असल्याचे दिसत आहे. त्यातून, गेल्या चार-पाच वर्षामध्ये ‘पिक नेक्स्टींग सिझन’ हा जानेवारी-फेब्रुवारी दिसत असून त्याचा कासवांच्या प्रजननदरावर प्रतिकूल परिणाम झाल्याची माहिती कासव अभ्यासकांकडून दिली जात आहे.

चांगल्या प्रजननदराला अनुकूल काळ

डिसेंबरमध्ये मादी कासवाने घरटं करून त्यामध्ये अंडी घातल्यास साधारणतः फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये अड्यातून पिल्लं बाहेर येतात. या कालावधीतील तापमानामध्ये चांगला प्रजननदर राहतो. या कालावधीमध्ये अंड्यातून बाहेर पडणारी पिल्ले सर्वसाधारणतः सक्षम असून त्यामध्ये मादींच्या तुलनेमध्ये नरांची संख्या जास्त असते. मात्र, फेब्रुवारीमध्ये घरटं केल्यास म्हणजे अंडी घातल्यास त्यानंतर, एप्रिल-मे महिन्यामध्ये अंड्यातून पिल्लं बाहेर येतात. या कालावधीमध्ये अंड्यातून बाहेर पडणारी पिल्लांमध्ये नरांपेक्षा माद्यांची संख्या जास्त असते. मात्र, ही पिल्लं काहीशी असक्षम (विक) असल्याचे निरिक्षण कासव अभ्यासकांच्या नोंदीतून पुढे आले आहे. पिल्लांची साईज आणि पिल्ल्यांच्या चालण्याच्या गतीवरून त्यांची शारीरीक क्षमता लक्षात येत असल्याचेही कासव अभ्यासकांकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

चिंताजनक प्रजनन दर

सर्वसाधारणतः डिसेंबर हा ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाचा विणीचा हंगाम मानला जातो. घरटं केल्यापासून सुमारे ५०-५५ दिवस म्हणजे सुमारे दीड महिन्याच्या कालावधीनंतर अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. यामध्ये सर्वसाधारणतः साठ ते सत्तर टक्के प्रजननदर राहणे अपेक्षित असते. मात्र, गेल्या काही वर्षामध्ये तो सरासरी ३७ ते ४० टक्क्यांवर आल्याचे प्रथमदर्शनी चित्र दिसत असल्याची माहिती कासव अभ्यासकांकडून नोंदविली गेली आहे. गतवर्षी सुमारे २३ हजारहून अधिक अंडी जतन करण्यात आली होती. त्यापैकी सुमारे ७ हजार २०० कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. हा प्रजनन दर सुमारे ३१.३० टक्के राहिल्याची माहिती उपलब्ध होत आहे.

आलिव्ह रिडले कासवाविषयी माहिती (Olive ridley sea turtle Informnation in Marathi)

आढळः जगभरातील उष्णकटीबंधीय किनारे
प्राकृतिक अधिवासः उष्ण कटिबंध व उपोष्ण कटीबंध
वजनः सुमारे ५० कि. ग्रॅम. पर्यंत
लांबीः ६० ते ७० सें.मी.
आकारः फारसे खडबडीत नसलेले, पसरट व तंबूच्या आकाराचे.
रंगः ऑलिव्ह हिरवा
डोक्याचा आकारः मोठे, त्रिकोणी आकाराचे, वरचा जबडा अंकुशाकार
पायः वल्ह्यासारखे व पुढील प्रत्येक पायावर एक नख
खाद्यः मृदूकाय प्राणी, जेली फिश आदी.

Olive ridley sea turtle Konkan
Olive ridley sea turtle KonkanSakal

अंडी घालण्यासाठी जागेची निवड

ऑलिव्ह रिडले या सागरी कासवांच्या प्रजातीची मादी अंडी घालण्यासाठी समुद्रकिनारपट्टीची निवड करते. सर्वसाधरणपणे नोव्हेंबर ते मार्च हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. या कालावधीमध्ये मादी कासव वालुकामय भागात हायटाईड लेव्हलपासून सुमारे ५० ते १०० मीटर अंतरावर १ ते १५ फूट उंचीचा खड्डा खोदून त्यामध्ये अंडी घालते. सर्वसाधारणपणे शंभर ते दोनशे इतकी त्यांची संख्या असते.

घरट्यासाठी कोणता योग्य काळ

पहाटेच्या दरम्यान कासवाची मादी अंडी घालण्यासाठी किनार्‍यावर येते. सुमारे दीड फूट खोल खड्डा खोदून त्यामध्ये अंडी घालून समुद्रामध्ये परत जाते. सुर्योदयानंतरच्या स्वच्छ प्रकाशातून वाढणार्‍या तापमानाचा या अंड्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुर्यप्रकाश आणि तापमानाचा हा प्रतिकूल परिणाम होण्यापूर्वी ज्या स्थितीच्या तापमानामध्ये मादीने खड्ड्यामध्ये अंडी घातली होती त्या तापमानामध्ये त्या अंड्यांचे सुर्योदयापूर्वी योग्य पद्धतीने संवर्धन होणे अपेक्षित मानले जाते. त्याप्रमाणे सुर्योदय होण्यापूर्वी या अंड्यांचे कासवमित्रांकडून केले जाते.

तापमानाची महत्वपूर्ण भूमिका

कासवांचा प्रजनन दर म्हणजे अंड्यातून पिल्लं बाहेर येण्याची संख्या चांगली राहण्यासाठी अंडी ठेवण्यासाठी संवर्धित केलेल्या खड्डयातील तापमान आणि अंड्यातून पिल्लं बाहेर येण्याच्या कालावधीतील तापमान महत्वपूर्ण ठरत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. अंडी उबविण्याचा कालावधी आणि पिल्लं बाहेर येण्याचा कालावधी यावेळी सर्वसाधारण हे तापमान ३३ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असणे समाधानकारक प्रजननासाठी उपयुक्त मानले जाते. यामध्ये सुमारे २७ अंश सेल्सिअस तापमान राहिल्यास सर्वसाधारणपणे अंड्यातून बाहेर येणार्‍या पिल्ल्यांच्या संख्येमध्ये सर्वाधिक नरांची संख्या जास्त असते. सुमारे ३३ अंश सेल्सिअस तापमान राहिल्यास नरांच्या तुलनेमध्ये माद्यांची संख्या जास्त असते आणि तेच तापमान सुमारे २९.५ अंश सेल्सिअस राहिल्यास अंड्यातून बाहेर पडणार्‍या पिल्ल्यांच्या संख्येमधील नर-मादीचे प्रमाण सरासरी ‘फिफ्टी-फिफ्टी’ टक्के राहत असल्याची माहिती वाईल्डलाईफ इन्स्टीट्युट ऑफ इंडियाच्या अभ्यासक सुमेधा कोरगावकर यांनी दिली.

Olive ridley sea turtle
कोकणकड्यावर.. एकमेकांपासून दूर... ती निरव शांतता अनुभवत!

प्रजनन दरावर परिणामाचा अभ्यास अपेक्षित

अंडी घालण्यासाठी कासवाची मादी सुमारे दीड फूट खोल खड्डा खोदते. खड्ड्यासाठी जागेची निवड करताना सर्वसाधारण अंड्यांच्या उबवणीवर परिणामकारक ठरणाऱ्या विविधांगी गोष्टींचा (उदा. तापमान आणि तेथील परिसर) यांचा कासवाची मादी सर्वसाधारणतः प्राधान्याने विचार करताना दिसते. मात्र, कासवाच्या मादीचे अंडी घातल्यानंतर त्यांचे हॅचरीद्वारे संवर्धन करीत असताना अपेक्षित तापमान राखले जाईल असा खड्डा हॅचरीमध्ये खोदला जातो का ? हा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आणि संशोधनाचा ठरत आहे. मात्र, तशा पद्धतीने मिळता-जुळता खड्डा खोदण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, काहीवेळा तो चुकीचा ठरण्याची शक्यताही नाकारता येण्यासारखे नाही. त्याचवेळी हॅचरी तयार करताना बहुतांशवेळा शेडनेटचा उपयोग केला जातो. शेडनेटच्या माध्यमातून आकाशातून येणारी प्रखर सुर्यकिरणे रोखून समतोल तापमान राखणे शक्य होत आहे का? याचाही विचार होणे गरजेचे आहे. सर्वसाधारणतः या साऱ्या गोष्टी अंड्यातून पिल्लं बाहेर पडणे वा प्रजनन दर यावर परिणामकारक ठरताना दिसत आहेत.

टक्केवारी वाढविण्याचे आव्हान
गतवर्षी सुमारे २३ हजारहून अधिक अंडी जतन करण्यात आली होती. त्यापैकी सुमारे ७ हजार २०० कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. हा प्रजनन दर सुमारे ३१.३० टक्के राहीला आहे. त्यामुळे यावर्षी संवंर्धित केलेल्या अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडण्याची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान वनविभाग, कांदळवन कक्ष, कासवमित्र आणि निसर्गस्नेहींसमोर ठाकले आहे.

बदललेल्या पिक नेक्स्टींग मोसमावर परिणाम
सर्वसाधारणतः डिसेंबर ते फेब्रुवारी-मार्चपर्यंत असलेल्या तापमानात अंड्यांची चांगली उबवण होणे आणि अंड्यातून जास्तीत जास्त पिल्ले बाहेर येण्यासाठी पोषक ठरत आहे. मात्र, त्यानंतर, तापमानामध्ये वाढ होवून कमालीचा म्हणजे असह्या उष्मा झालेला असतो. त्याचा प्रतिकूल परिणाम अड्यांच्या उबवणीवर होताना दिसतो. अंड्यातून बाहेर आल्यानंतर समुद्राकडे झेपावत असताना असह्य तापमान वा उष्म्यामुळे काही पिल्लांचा समुद्रामध्ये जाण्यापूर्वी किंवा समुद्रामध्ये गेल्यानंतर काही दिवसांमध्ये मृत्यू होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामध्ये विशेषतः कोकणा किनारपट्टीवर असलेल्या काळ्या वाळूच्या तापमानाचाही काहीसा प्रतिकूल परिणाण होत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

गुहागर किनारी महिनाभर उशिरा घरटं

गुहागर येथील बाग समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवाची यंदा १४० अंडी सापडली. वनपाल संतोष परशेट्ये यांच्या उपस्थितीत ही सर्व अंडी संवर्धीत केली आहेत. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे यावर्षीही गुहागरच्या समुद्रावर अंडी मिळण्याचा हंगाम महिनाभर लांबला आहे. गेल्यावर्षी गुहागरच्या केंद्रात २०० हून अधिक मादी ऑलिव्ह रिडले कासवांची २३ हजारपेक्षा जास्त अंडी संवर्धित केली होती. या वर्षीही मोठ्या संख्येने अंडी संवर्धीत करता यावीत अशी तयारी वनविभाग आणि कांदळवन कक्षातर्फे केली आहे. हवामानामुळे गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात पहिले घरटे सापडले. यंदाही बदललेल्या हवामानामुळे हंगाम लांबला आहे. १६ डिसेंबरला पहिले घरटे सापडल्यावर पुढे दररोज घरटी सापडतील असा अंदाज होता. मात्र तसे झालेले नाही. वन विभाग आणि कांदळवन कक्षाने गुहागरमधील कासव संवर्धन केंद्राला अधिक बळकटी दिली असून यंदा संजय भोसले, शार्दुल तोडणकर, रवींद्र बागकर, कुसुमाकर बागकर, विक्रांत सांगळे, दिलीप सांगळे या कासवमित्रांची नियुक्ती केली आहे.

टॅगिंगमुळ उलगडतोय कासवांचा प्रवास

कोकण किनाऱ्यावर कासवं अंडी घालण्यासाठी कोठून येतात याचा अभ्यास वन विभाग आणि कांदळवन कक्ष गेली दोन वर्ष करत आहे. यंदा गुहागर येथून फेब्रुवारीत टॅग केलेली बागेश्री आणि गुहा ही दोन कासवं सोडली होती. आठ महिन्यांनी त्यांचा सॅटेलाईट संपर्क तुटला. डॉ. सुरेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास सुरू होता. गुहाचा २१ सप्टेंबरपासून तर बागेश्री २३ सप्टेंबरपासून संपर्काबाहेर गेले. प्रवास करत बागेश्रीने गोवा, कर्नाटक, कोची, केरळ तसेच पुढे नागरकोईल हे भारताचे दुसरे टोक गाठले. बागेश्रीने श्रीलंकेला वळसा घालून बंगालच्या उपसागरात प्रवेश केला. तिथेच ते स्थिरावले. यावरून ही कासवं बंगालच्या उपसागरातून येत असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तसेच गुहा कासवीणने गोवा, कर्नाटकपासून लक्षद्वीप बेटांपर्यंतचा प्रवास केला. लक्षद्वीप जवळच दिर्घकाळ फिरत असलेल्या गुहाच्या हालचालींवरून तिला तिथे चांगले खाद्य मिळत असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली होती.

Ratnagiri Sea Turtle
Ratnagiri Sea TurtleSakal

पिक नेक्स्टिंग सिझन लांबणीवर का ?

पर्यावरणामध्ये सातत्याने प्रतिकूल बदल
नोव्हेंबर-डिसेंबरमधील ढगाळ वातावरण
समुद्राच्या पाण्याचे वाढलेले तापमान
बदललेला सी वॉटर करंट
समुद्र किनाऱ्याच्या काळ्या वाळूचे तापमान

समाधानकारक प्रजननदर राखण्याचे उपाय

नियोजनबद्धरीत्या अंड्यांचे संवर्धन होणे गरजेचे
हॅचरीसाठी शेडनेटऐवजी माडाची झावळांचा उपयोग
हॅचरीतील तापमान नियंत्रणासाठी पाणी शिंपणार
योग्य पद्धतीने हॅचरी मॅनेजमेंट होणे गरजेचे

पर्यावरणातील बदल, तापमानातील कमी-जास्तपणा यासह समुद्रात असलेल्या बदलांचा परिणाम ऑलिव्ह रिडले कासवाच्या अंडी घालण्याच्या हंगामावर होत आहे का, याचा अभ्यास सुरू आहे. त्यात मी सहकार्‍यांसमवेत सुमारे वीस वर्षातील अंडी घालण्याचा कालावधी, अंड्यांची संख्या आणि अंड्यातून बाहेर पडणार्‍या पिल्लांची संख्या आदी मुद्द्यांवर अभ्यास करीत आहे. गेल्या पाच वर्षापासून कासवाच्या मादीचा नेक्स्टिंग करण्याचा म्हणजे ‘पिक नेक्स्टींग सिझन’ हा महिनाभर उशीरा म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत लांबला आहे. याबाबत ठोस कारणामीमांसा करणे सध्या शक्य नाही. भविष्यात सखोल आणि परिपूर्ण अभ्यासाअंती निश्‍चित चित्र स्पष्ट होईल.”
- सुमेधा कोरगावकर, वाईल्डलाईफ इन्स्टीट्युट ऑफ इंडीया

मालगुंड किनाऱ्यावर सर्वसाधारण नोव्हेंबर महिन्यापासून कासव घरटं करण्यासाठी दाखल होतात. परंतु यंदा अजूनही कासवांचं आगमन झालेले नाही. पहिलं घरटं आॅक्टोबर महिन्यात राजापूर तालुक्यात सापडलं होतं. मात्र त्यानंतर अन्य किनाऱ्यावर घरटी सापडण्याचे प्रमाण कमी आहे. यावर्षी कासवांचा हंगाम उशिरा सुरु होण्याची शक्यता आहे. याची कारणं मात्र सांगता येणार नाहीत.
- ऋषिराज जोशी, मालगुंड

हंगाम लांबणे हे नैसर्गिक बदलाचा परिणाम आहे. त्यानुसार कासविणी अंडी घालण्यासाठी किनारी येतात. प्रत्येक कासविणीची अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी वन विभागाकडून किनारी भागात कासमित्रांच्या मदतीने प्रयत्न केले जातात. यंदाही त्याप्रमाणे नियोजन केले आहे. वेळास, आंजर्ले येथे कासव महोत्सव होतात. त्याचा फायदा तेथील पर्यटनासाठी होत आहे.
- राजश्री किर, परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण

वातावरणात अजून म्हणावं तसा गारवा किंवा थंडी निर्माण झाली नाही आहे. वातावरणात सारखा बदल जाणवत आहे. नैसर्गिक वातावरण पोषक नसल्यामुळे अजूनही वेळास किनाऱ्यावर कासवाचे अंडी घालण्यासाठी आगमन झालेले नाही. वेळासला मोठ्या प्रमाणात कासविणी अंडी घालण्यासाठी येतात. त्यांचा समुद्राकडे सुरु होणारा प्रवास पाहण्यासाठी निसर्गप्रेमी व पर्यटक वाट पाहत असतात. त्यांना यंदा विलंब होणार आहे.
- हेमंत सालदुरकर, वेळास ग्रामस्थ

गेल्या काही वर्षापासून ग्लोबल वॉर्मिंग, तापमान वाढीसह पर्यावरणातील बदलांना सामोरे जावे लागत आहे. या बदलांची झळ कासवांसह समुद्रातील जीवसृष्टीलाही बसत आहे. समुद्रातील वादळांचा कासवांच्या मेटींगवर आणि तापमान वाढीचा त्यांच्या प्रजननावर प्रतिकूल परिणाम होते आहे. कासवांच्या नर-मादीच्या संख्येचा संतुलन राहत नाही. त्याचाही कासवांच्या नेक्स्टींगवर परिणाम होऊ शकतो. यासाठी पर्यावरणाचा र्‍हास आणि बिघडणारा समतोल रोखण्यासाठी पावले उचलली पाहीजेत. पर्यावरण संवर्धनासाठी सार्‍यांनी पुढाकार घेतला पाहीजे.
- मोहन उपाध्ये, कांदळवन फाऊंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.