अनोखं कोकण : 'कोकण म्हणजे नुसता बीच नाही, तर बीच-बीच में निसर्गाचा विविधरंगी समुद्र अनुभवा!'
ज्या मराठी चित्रपट निर्मात्यांना केरळचा खर्च परवडत नसेल आणि मुंबई जवळ हवी असेल तर अक्खी वेबसीरिज बनेल, असे हे बेट.
-पराग वडके परशुराम, parag.vadake@gmail.com
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात पहिले ४० दिवस संपल्यावर कोकणी माणसे थोडेफार घराबाहेर पडू लागले. बहुतांश लोकांची घरे, जरा चाललं की, छोटी पाटबंधारेची धरणे, डोंगर, दाट जंगल, नदी, समुद्र, खाडी अशी वेढलेली त्यामुळे माणसावर आलेले नैसर्गिक आक्रमण कोकणी माणसाने (Konkani Man) असेच निसर्गात कनेक्ट करून बऱ्यापैकी परतवले. मग अशातच आमचा एक ग्रुप बनला आणि मग मॉर्निंग वॉक हा प्रकार ट्रेझर हंटमध्ये रूपांतरित झाला.
कार काढायची, पहाटे साडेपाचला निघायचे की, त्या वेळी पोलिस (Police) बंदोबस्त आटपून घरी गेलेले असत आणि आम्हाला मास्क न लावता भटकता यायचे. नंतर रोज विविध डेस्टिनेशन शोधायची. तिथे कार पार्क करायची आणि मग सहा सहा किमी चालायचे. त्या काळात अखंड तीन-तीन, चार-चार तास चालत राहिलो. कोकण आणि कोकणच्या आजुबाजूला अनोखं कोकण अनुभवता आले. येत्या वर्षभरात अनवट वाटांनी उलगडलेल्या अनगड कोकणची सैर करूया....
पहिली भटकंती माझं आवडतं गाव चिपळूणमधील, कालुस्ते गावातून. कालुस्ते आणि त्याला लागून असलेले भिले हे गाव, जेमतेम हजार बाराशे लोकसंख्या. कालुस्ते गावाचे वैशिष्ट्य, घरटी एक माणूस परदेशात स्थाईक झालेला अगदी अफ्रिकेत खाणी ते इंग्लंडमध्ये वैद्यकीय तज्ञ असे विविध लोक कालुस्ते गावात आहेत आणि सगळ्यांची नाळ मात्र अजून तुटलेली नाही.
एका गावांसाठी बॅंक ऑफ इंडिया (Bank of India) या बॅंकेची एक शाखा इथे चालते यावरून या गावाची श्रीमंती लक्षात येते. चित्रपटात दिसणारे बंगले प्रत्यक्षात पाहायला मिळतात. गावाचे सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गावाला लाभलेली गोवळकोटची खाडी आणि या खाडीभोवती असलेली गावाची ठेवण. तारकर्ली देवबागसारखा इथे एक फिल येतो. खाडीभोवती शानदार रस्ता. त्यात सुंदर वळणे समोर छत्रपती शिवरायांचा किल्ला गोविंदगड. खाडीच्या पलिकडे परशुराम घाट (Parashuram Ghat) आणि खाडीत मच्छीमारी करणाऱ्या छोट्या होड्या.
कोकणात लोक येतात आणि थेट बीच गाठायला जातात. खरा कोकण आत आत वळणा वळणात पाहायला मिळतो. छायाचित्रात दिसतो तो भाग कालुस्तेमधील खाडीला लागून असलेल्या एका बेटाचा आहे. ज्या मराठी चित्रपट निर्मात्यांना केरळचा खर्च परवडत नसेल आणि मुंबई जवळ हवी असेल तर अक्खी वेबसीरिज बनेल, असे हे बेट. सभोवती नारळाची झाडे आणि नारळाच्या झाडांवर दिसणारे समुद्री गरूड, घारी, ससाणे यांची लक्षणीय संख्या हे या बेटाचे अजून एक वैशिष्ट्य. पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफर यांच्यासाठीचा निसर्गाचा कुंभमेळा.
मला अजून एक या गावात आवडलेली गोष्ट म्हणजे दूर देशावरून आलेला एखादा कोट्यधीश सकाळी सकाळी तुटलेले जाळं विणत असतो आणि छोटी होडी घेऊन मासे पकडायला निघालेला असतो. तुम्ही नवीन वर्ष साजरे करायला गुहागर, गोवा, दापोली या ठिकाणी चिपळूणमार्गे जाणार असाल तर जाता जाता चिपळूणपासून सहा किमीवर हे छोटं गाव आहे. गोविंदगड पाहा, सोबत हे कालुस्ते गाव फिरा.
तिथेच ग्लोबल टुरिझमची, तुम्हाला छोटी होडी मिळेल. त्यातून खाडीचा फेरफटका करा. दहा दहा फुटी मगरी शेकड्यांनी ऊन्हं खात पहुडलेल्या पाहा, फोटो काढा, विविध पक्षी पाहा. एवढेच काय मारूती चितमपल्ली यांना झाडावर चढणारा मासा याच पट्ट्यात सापडला तो सुद्धा नशीब असला तर पाहा. कोकण म्हणजे नुसता बीच नाही तर बीच बीच में निसर्गाचा विविधरंगी समुद्र, तो अनुभवा.
(लेखक दऱ्याखोऱ्यातून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.