PCOS Disease Symptoms : 'पीसीओएस' म्हणजे आजच्या तरुणींमधील वाढती समस्या
मासिक पाळी अनियमित आहे म्हणजे पीसीओएस आहे असे नाही. पाळी अनियमित असण्याची अजून वेगळी कारणे असू शकतात.
-डॉ ज्योती चव्हाण chirayu.jyoti@gmail.com
गेल्या काही वर्षांत तरुण मुलींमध्ये सुमारे १३ ते १८ वर्षे वयोगट व २० वर्षांपेक्षा पुढे ६० टक्के महिलांमध्ये वेगाने वाढत जाणारी समस्या म्हणजे पीसीओएस (PCOS). आजकाल स्त्रिया घर आणि बाहेर असं दोन्ही ठिकाणचा समतोल साधत असतात; पण हे सर्व सांभाळत असताना आपल्या शरीराची काळजी घ्यायला मात्र त्या विसरतात.
पीसीओएस म्हणजे काय?
पाळी अनियमित येणे, जास्त प्रमाणात रक्तस्राव होणे, तीन-चार महिने पाळी न येणे, लठ्ठपणा, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, हार्मोन्समध्ये विविध कारणाने बदल होणे, हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे इम्बॅलन्स, अंडाशयामध्ये सिस्ट (गाठी) निर्माण होतात, आकार वाढत जातो आणि शरीरामध्ये हायलेवल मेल हार्मोन्स रिलीज होतात व इन्सुलिन रजिस्टन्स वाढतो या सगळ्याला एकत्रितपणे पीसीओएस (PCOS) असे म्हणता येईल.
पीसीओएसची कारणे
पीसीओएसची नेमकी कारणे काय आहेत, ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर नेमका हाच उपचार करतात किंवा करू शकतो असे नाही, तर त्यासाठी मल्टिपल ट्रीटमेंट उपयोगी पडतात. जंकफूडचे अत्याधिक सेवन, व्यायामाचा अभाव, जास्त स्ट्रेस, अनुवांशिक आणि अनहेल्दी लाईफस्टाईल ही पीसीओएसची मुख्य कारणे आहेत.
गैरसमज
पीसीओएस म्हणजे (PCOS Disease) गंभीर आजार नाही. पीसीओएसमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नाही; पण मूल होण्याच्या दृष्टीने दहा ते पंधरा टक्के महिलांना औषधोपचाराची गरज असते. मासिक पाळी अनियमित आहे म्हणजे पीसीओएस आहे असे नाही. पाळी अनियमित असण्याची अजून वेगळी कारणे असू शकतात. जसं की, थायरॉईडचे प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात आढळते. मुली व त्यांच्या आईमध्ये एक गैरसमज असतो की, पीसीएस म्हटलं तर ऑपरेशन करावे लागतं. पीसीओएसच्या प्रत्येक पेशंटचं ऑपरेशन करावे लागत नाही जर एखादी गाठ सहा ते सात सेंटीमीटरपेक्षा जास्त वाढली असेल किंवा त्या गाठीला ट्विस्ट बसला असेल किंवा ती गाठ फुटली तरच ऑपरेशनची गरज लागते आणि हे क्वचित प्रसंगीच होते.
कोणती काळजी घ्यावी
१२ ते १८ वयोगटातील मुलींमध्ये हार्मोन्समध्ये बदल मोठ्या प्रमाणात होतात आणि तेव्हा लाईफस्टाईल हेल्दी ठेवली नाही तर त्याचे प्रमाण वाढत जाते. स्ट्रेसमुळे पीसीओएसचे प्रमाण अजून वाढते. दहावी-बारावीच्या १५ ते १८ वयोगटातील मुलींमध्ये हे सगळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते. म्हणून स्ट्रेस कमी करण्यामध्ये आई-वडिलांची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते. आई स्वतः घाबरून जाते आणि सतत त्या गोष्टींचा विचार किंवा सतत त्या गोष्टीवर बोलत राहिली तर त्यामुळे मुलीच्या मनावर त्याचा परिणाम होतो आणि खरंच आपल्यामध्ये काहीतरी दोष आहे, असे त्यांना वाटते. तर तसं न करता त्यांना धीर देणं व्यायामासाठी प्रोत्साहन देणं त्यांचा कॉन्फिडन्स वाढवणं हे खूप महत्वाचे आहे.
उपचार
माइंडकेसेस म्हणजे सोनोग्राफीमध्ये सिस्ट दिसते. वजन झपाट्याने वाढलेले आहे; पण शुगर नॉर्मल आहे. थायरॉइड नॉर्मल आहे, पाळी स्वतःहून नियमित किंवा अनियमित येत आहे अशा पेशंटना फक्त इन्सुलिन रजिस्टन्स असल्यामुळे पीसीओएस च्या पेशंटचे वेट लॉस झाले तर हार्मोन्सची प्रक्रिया नॉर्मल होते. व्यायाम व डायबिटीसचा समतोल राखणे गरजेचे आहे. हेल्दी लाइफस्टाईलचे काउन्सेलिंग, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, घरगुती पौष्टिक आहार, फळ, दूध अशा पदार्थांचा आहारात समावेश कारणे.
दररोज ३० ते ४० मिनिटे कोणत्याही प्रकारचा व्यायाम करणे व वजन आटोक्यात ठेवणे, वजन दर महिन्याला अर्धा ते एक किलो कमी करणे, अतिशय जास्त डायटिंग करून अचानक वजन कमी करणे किंवा वजन वाढणे पण चांगले नाही. हे बदल दररोजच्या जीवनामध्ये करणे गरजेचे आहे. मुलींमध्ये असे पण दिसून येते की, सुरवातीचे काही दिवस मनावर घेऊन करतात आणि मग अचानक सोडून देतात. त्यामुळे नियमितता खूप महत्वाची आहे.
जर तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा तीन दिवस व्यायाम करत असाल तर तो कायमचा चालू ठेवणे. आपल्या लाईफस्टाईलमध्ये इन्कॉर्पोरेट करणे गरजेचे आहे. या वयात हार्मोन्सच्या गोळ्या देणे हानिकारक ठरू शकते; पण जर अंगावर जास्त रक्तस्राव होत असेल तर फक्त रक्त गोठण्याची प्रक्रिया वाढवण्याची औषधं दोन ते तीन दिवस दिली जातात.
योग आणि ध्यान
योगा हा एक अतिशय चांगल्या प्रकारचा व्यायाम आहे. ज्याच्यामुळे झालेले मानसिक व शारीरिक परिणाम जगभरात दिसून येतात. जर अशा प्रकारचा व्यायाम आपल्या भारतीय मुलींनी आपल्या लाईफस्टाईलमध्ये आचरणात आणले, दररोज २० ते ३० सूर्यनमस्कार केले, समतोल आहार घेतला, स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन केले तर नक्की या कंडिशनमधून आपण बाहेर पडू शकतो.
पीसीओएसचे परिणाम (जर योग्य उपचारपद्धती घेतली नाही तर)
जर वजन कमी केले गेले नाही, लाईफस्टाईलमध्ये बदल केला नाही तर पीसीओएस वाढू शकतो आणि पुढे जाऊन त्यांना डायबिटीस, ब्लडप्रेशर, वंध्यत्वाचे प्रमाण, पाळीच्या तक्रारी आणि पुढील आयुष्यामध्ये पिशवीचे कॅन्सर होण्याची शक्यता पण वाढू शकते.
मध्यम/गंभीर आजार
व्यायाम आणि समतोल आहाराबरोबर अँटीडायबिटीसच्या गोळ्या, विटामिन डीच्या गोळ्या काही महिने ते वर्षभर घ्याव्या लागतात. ज्याच्यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते व अंडकोशातून अंडी फुटण्याची प्रक्रिया सुरू होते व स्वतःहून पाळी येते. रक्तस्रावदेखील कमी प्रमाणात होतो. पीसीओएस हे एक आजारपण नव्हे तर एक लाइफस्टाइल डिसॉर्डर आहे. मुली व स्त्रियांनी या स्ट्रेसफूल लाइफस्टाईलमध्ये जर नीट काळजी घेतली तर ही कंडिशन नक्कीच आटोक्यात राहू शकते.
(डॉ. चिरायू हॉस्पिटल रत्नागिरी येथे स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र व वंध्यत्व उपचारतज्ज्ञ आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.