आईला मदत करता-करता ती 'त्या' विश्वात कधी गुंतून गेली हे तिलाही कळत नाही!
"आईबापाची लाराची लेक... मी लारी..... चोळी पिवली गं .... नेसली अंजिरी सारी..." गाण्याच्या ओळी तेव्हा माझ्या मनात उमटून गेल्या.
-डॉ. स्वप्नजा मोहिते
समोरचा अथांग सागर आणि मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून पाण्यावर सरसरत चाललेली ती बोट. कुठल्याही चित्रकाराला किंव्हा फोटोग्राफरला मोह पडावा असं समोरच दृश्य! माझ्या डोक्यात मात्र वेगळचं चित्रं रंगतंय. आता या बोटीवरून जाळं पाण्यात सोडलं जाईल.... खोल पाण्याच्या पोटात दडलेली मस्त चंदेरी मासळी त्या जाळ्यात अडकेल आणि.... अहाहा ..... ती ताजी फडफडीत मासळी माझ्या कोळणीच्या टोपलीतून माझ्या ताटात पोहोचेल! दिवास्वप्नं खरी होतात माझी.... माझ्या नजरेसमोर सगळं कसं स्पष्ट दिसतंय.
बोट पुढे जाऊन स्थिरावली आहे आणि जाळं सोडण्याची त्यावरची लगबग मला दिसतेय इथूनही! मला बंदरात आपल्या नाखवाची वाट बघत थांबलेली ती दिसतेय. तिची बोट बंदरात आली की, होणारी धांदल मी बघितली आहे. बोटीवरच्या माशाच्या टोपल्या उतरवून घ्यायच्या, त्यातला क्वालिटी मासा (Fish) बाजूला ठेवत किमतीची घासाघीस करत लिलावाकडे एक डोळा ठेवत मध्येच हाताखालच्या माणसांना ऑर्डर सोडत ती वेगवेगळ्या आघाड्यांवर खिंड लढवताना मी पाहिलंय तिला!
मग ते रत्नागिरीचं मिरकरवाडा बंदर असू दे, हर्णैचा किनारा असू दे की, वर्सोव्याची गजबजलेली जेट्टी असू दे! वसई, पालघर, डहाणू.... वेगवेगळे किनारे... वेगवेगळ्या मच्छीमार संस्कृती.... वेगवेगळे आचारविचार, रितीभाती ..... तरीही सगळ्यांना जोडणारा एकच दुवा..... मासा, मच्छी, मासळी, म्हावरा, मछली, मीन, फिश! तुम्हा आम्हाला जोडणारा ! विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार ..... मत्स्य अवतार ! खवय्यांच्या लिस्टमधली पहिली पसंत. हा अवतार आपल्याही डिशमध्ये असावा आणि त्यासाठी समुद्रातून, नदी तलावातून भरपूर मासळी मिळत राहू देरे महाराजा .. असं गाऱ्हाणं घालणारा मत्स्यप्रेमी आपल्याला जगात कुठेही हमखास सापडणारच! आणि ही खास पसंतीची मासळी आपल्यापर्यंत आणणारी ‘ती’ आपल्याला भेटतेच सगळीकडे.
मग तो भारत असू दे की दुबई, जपान असो वा इंग्लड, इंडोनेशिया (Indonesia), थायलंड, चीन….. कुठेही जा, मासळी बाजारात आपल्याला आवर्जून बोलावणारी, अगदी माझ्याकडचे मासे खास तुमच्यासाठीच ठेवलेत असं सांगून आपण तिच्या खास आठवणीतले आहोत. असं आपल्याला पटवून देत महागडी मासळी आपल्या पिशवीत टाकत आपल्याला खिशात टाकणारी ..... ती तिचं असते. तरीही आपण परत पुढच्या वेळीही तिच्याच टोपलीकडे वळतो..... मागच्या वेळेस किती महाग दिलेस मासे असं म्हणत, परत तिच्या गोड बोलण्यात अडकतो आणि आपल्या पिशवीतील म्हावरा काळजीपूर्वक सांभाळत घराकडे वळतो. होना? मी तर हा अनुभव नेहमीच घेते आणि माझ्या पिशवीतले मासळी फक्त माझ्याकडेच आहे अशा भोळ्या समजुतीत वावरत राहते.
मेरे पास माँ हैं .... अशा आविर्भावात ‘मेरे पास रावस हैं .... (माशाचं नाव बदलत राहतं दरवेळी)’ असं नाक वर करत सांगत फिरत राहते आणि उगीचच नसलेली कॉलर ताठ करते. जेट्टीवरची नाहीतर मासळी मार्केटमधली ‘ती’ गालातल्या गालात हसत राहते. सखी शेजारिणी, तू हसत राहा ....सारखं मी उगाच तेव्हा " सखी कोळीणी, तू हसत राहा... टोपलीतून मासे विकत राहा" , असं मनातल्या मनात गात राहते. मासळी मार्केटच्या मिणमिणत्या पिवळ्या प्रकाशात तिचा चेहरा उजळलेला असतो. मला तेव्हा आठवते मत्स्यगंधा! राजा रविवर्माच्या पेंटिंगमधून भेटलेली! यमुनेच्या किनारी राहणारी... आपल्या मासेमार पित्याला मासेमारीमध्ये आणि होडी चालवण्यात मदत करणारी...... जन्मतः अंगाला येणाऱ्या गंधामुळे मत्स्यगंधा म्हणून ओळखली जाणारी!
तिचा वारसा चालवणाऱ्या या मत्स्यगंधेच्या लेकी मला किनाऱ्या किनाऱ्यावरून भेटत राहतात. त्यांच्या चालीरिती, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सारंच कसं आगळंवेगळं.... विचार करायला लावणारं! म्हणूनच जाणून घ्यावंसं वाटणार! मच्छीमारी हा आपल्याकडचा पारंपरिक व्यवसाय. अफाट, अथांग समुद्र आणि त्यातली असंख्य प्रकारची मासळी ही आपली निसर्गानं दिलेली संपत्ती. ती पकडणे आणि खवय्यांपर्यंत पोहोचवणे हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्षे चालतोय आपल्याकडे. समुद्रावर जाऊन मासेमारी करणे हे अजूनही पुरूषप्रधान क्षेत्र आहे; पण मासळी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवणे ....... त्याला या मत्स्यगंधांशिवाय मात्र पर्यायच नाही! किंबहुना त्यांच्याशिवाय हा व्यवसाय पूर्णत्वाला जाऊच शकत नाही, असेच म्हणावे लागेल.
हा व्यवसाय अगदी पुरूषप्रधानच; पण त्यापुढचे व्याप सांभाळणाऱ्या स्त्रिया आणि यातील अर्थकारण सांभाळणाऱ्या ही स्त्रियाच! मातृसत्ताक की पितृसत्ताक संस्कृती यावर चर्चा होईलही या व्यवसायाबाबत; पण या ''अनरेकग्नाईज्ड वर्क फोर्स''चा सहभाग नोंदवण्याची वेळ आता मात्र नक्कीच आली आहे! या स्त्रियांच्या मत्स्य व्यवसायातील सहभागाचा आलेख मांडण्याचा हा प्रयत्न! मासळी बाजारात कोळणीकडूनच मासे घ्यायचे असतात, हा समज आपल्या डोक्यात पक्का बसलेला असतो. तिच्याशी घासाघीस करून हवा तो मासा घरी आणताना कितीजण तिच्या कामाच्या स्वरूपाचा विचार करतात, तासनतास बर्फात, पाण्यात मासळी टिकवण्याचा प्रयत्न करत राहायचं, सुन्न पडणाऱ्या हातापायाच्या बोटांचा विचार न करता मासळी विकत राहायचं दिवसभर, संध्याकाळी घरी परतताना उरलेल्या मासळीची योग्य व्यवस्था लावायची आणि परत नव्या दिवसाला नवा वाटा लावत त्याच मासळी बाजारात बसायचं!
अजिबात सोपं नसतं हे! त्यातच न पिण्याच्या पाण्याची सोय, न बाथरूमची व्यवस्था! कुचंबणा म्हणजे काय ते आमच्या या मच्छीमार स्त्रियांना विचारा; पण तरीही त्या या व्यवसायात का येतात, याचा विचार करणं खरंच महत्वाचं आहे. समाजाच्यादृष्टीने फेसलेस असलेल्या या स्त्रिया ....... यांची खरी ओळख काय? या स्त्रियांचा चेहरा जाणण्याचा हा प्रयत्न. "बाय, काय देऊ आज? म्हावरा ताजा हाय!" टोपलीतले ताजे मासे खुणावत असताना माझं तिच्याकडे लक्ष जातं. कपाळाला ठसठशीत कुंकू, गळाभर लखलखत्या सोन्याचे सर आणि चापूनचोपून नेसलेली टिपिकल साडी. "आईबापाची लाराची लेक... मी लारी..... चोळी पिवली गं .... नेसली अंजिरी सारी..." गाण्याच्या ओळी तेव्हा माझ्या मनात उमटून गेल्या.
मत्स्यगंधा! तिचा वारसा पुढे चालवणारी.... माशाच्या गंधात वावरत त्यालाच आपलंस करत त्या गंधात रंगून गेलेली मत्स्यगंधा! मासेमार कुटुंबात जन्मल्यापासून हा गंध तिच्या पाचवीलाच पुजला जातो. लहानग्या वयात आईला मदत करता करता ती त्या विश्वात कधी गुंतून जाते तिचं तिलाही कळत नाही. वयात येता येता ती मासळी वेगळी करायला शिकते. कोणती मासळी, काय भाव, कुठे जास्त दर मिळेल, कशी सुकवायची याच जणूं बाळकडूच या मत्स्यगंधेला मिळत जात तिच्या आई-आजीकडून आणि सुरू होतो एक प्रवास! तुम्हा आम्हालाही न कळणारा.. न उमगणारा! या मत्स्यगंधेचं विश्व जाणून घ्यायचं तर तिच्याकडेच जायला हवं ना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.