Aditya L1 Satellite
Aditya L1 Satelliteesakal

Aditya L1 Satellite : 'आदित्य-एल 1' करणार सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास; जाणून घ्या मोहीम

आदित्य’ हे सौर वातावरणाचा अभ्यास करणारे एक कोरोनग्राफी अंतराळ यान आहे.
Published on
Summary

सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी समर्पित केलेली ही पहिलीच भारतीय मोहीम आहे.

-प्रा. संतोष गोणबरे

‘आदित्य एल १’ उपग्रह (Aditya L1 Satellite) ‘लँगरेंज पॉइंट १’ (Lagrange Point 1) येथे यशस्वीरित्या शनिवारी ६ जानेवारीला पोहोचला. २ सप्टेंबर २०२३ ला दुपारी ११:५० वाजता पीएस एलव्ही-एक्सएल या प्रक्षेपण वाहनातून अवकाशाच्या दिशेने प्रक्षेपित करण्यात आलेला हा उपग्रह पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर सूर्याच्या दिशेने सुमारे ११० दिवसांनी पोहोचला आहे. ‘आदित्य-एल १’ ही अवकाशीय सौर वेधशाळा असून, ती सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणार आहे.

सौर वातावरण, सौर चुंबकीय वादळे आणि सूर्याच्या स्थितीगतीचे पृथ्वीच्या सभोवतीच्या पर्यावरणावर होणारे परिणाम यांचा अभ्यास यातून सिद्ध होईल. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या (Indian Space Research Organization ISRO) चांद्रयान ३च्या यशस्वी उड्डाणानंतर दहा दिवसांनी प्रक्षेपित करण्यात आलेल्या या मोहिमेला लाक्षणीय यश मिळाल्याने भारतीय संशोधकांच्या सन्मानाचा तुरा आणखी चमकदार झाला आहे.

Aditya L1 Satellite
Chiplun Datta Temple : शांत...शांत...संवादासाठी श्रीक्षेत्र अवधूतवन!

‘आदित्य’ हे सौर वातावरणाचा अभ्यास करणारे एक कोरोनग्राफी अंतराळ यान आहे ज्याची रचना आणि विकास भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि इतर भारतीय संशोधन संस्थांनी केला आहे. कोरोनग्राफी म्हणजे सूर्याच्या सभोवतालीच्या प्रकाश वलयांचा अभ्यास करणे. सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणावर आणि जीवसृष्टीवरदेखील महत्त्वाचा प्रभाव पाडतो. त्यामुळेच त्यातील होणारे बदल टिपणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. सौरवादळांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम, सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर आणि अंतराळातील हवामान आदी बाबी त्यातून स्पष्ट होणार आहेत.

सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी समर्पित केलेली ही पहिलीच भारतीय मोहीम आहे. निगार शाजी या प्रकल्पाच्या संचालक आहेत. यातील ‘एल १’ ही संज्ञा विशेष अर्थाने वापरण्यात आली आहे. अंतराळातील मोठे वस्तुमान असलेल्या दोन वस्तूंमध्ये म्हणजेच तारे, ग्रह, उपग्रह आदींमध्ये प्रचंड गुरूत्वाकर्षण असते; मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही दोन वस्तूंमधील काही बिंदू असे असतात की, तेथे दोन्हींचे गुरूत्वाकर्षण समतोल (बॅलन्स) असते. अशा बिंदूंना ‘लँगरेंज पॉइंट’ म्हटले जाते.

इटालियन संशोधक जोसेफ लुई लँगरेंज यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले आहे. सूर्य आणि पृथ्वीदरम्यान आतापर्यंत असे पाच बिंदू खगोल अभ्यासकांना सापडले असून, त्यांना एल-१, एल-२, एल-३, एल-४ आणि एल-५ अशी नावे देण्यात आली आहेत. आदित्य हे अंतराळयान एल-१ या बिंदूवरून सूर्याचा अभ्यास करणार असल्याने मोहिमेचे नाव आदित्य एल-१ असे ठेवण्यात आले आहे. अलीकडेच ‘नासा’ आणि ‘युरोपियन स्पेस एजन्सी’ (ईएसए) संयुक्तपणे काढलेल्या ‘सोलर ऑर्बिटर’ मोहिमेतून तुलनेने लहान सौरवाऱ्यांचा शोध लागला होता.

Aditya L1 Satellite
Hemorrhoids Symptoms : मूळव्याधीतही होमिओपॅथीचा सम्यक विचार; 'या' लोकांना ही व्याधी उद्भवण्याची शक्यता जास्त!

आदित्य एल १ वरून सूर्याचे पहिले चित्र फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हीईएलसी नावाची प्रणाली भारतीय खगोल भौतिकी संस्थेने विकसित केली आहे. ही प्रणाली सूर्याचे एचडी फोटो घेईल. एल १ पर्यंतचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आदित्यचे सर्व पेलोड्स चालू झाले आहेत. त्याच्या चाचण्यादेखील इस्रोकडून करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत यान सूर्याच्या कक्षात टिकू शकेल यासाठी खास रचना करण्यात आली आहे. आदित्यमध्ये सात पेलोड्स बसवण्यात आले असून, ते सूर्याचे फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सर्वात बाहेरील थर कोरोनाचे निरीक्षण करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत.

यामधील चार पेलोड्स हे थेट सूर्याचे निरीक्षण करतील तर उर्वरित तीन एल १ बिंदूवरील कण आणि फील्डचा इन-सीटू अभ्यास करतील. विशेष म्हणजे ग्रहण काळातदेखील सूर्याचा अभ्यास करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नसल्याचे इस्रोच्या शास्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे. सूर्य हा एक तारा असल्याने सूर्यावर सतत छोटे-मोठे स्फोट होत असतात; पण या स्फोटांचा परिणाम यानावर होणार नाही. हे मिशन स्पेसक्राफ्ट पाच वर्षांसाठी काम करणार आहे. या काळात यानावरील पेलोड कोरोनल हिटिंग, कोरोनल मास इजेक्शन, स्पेस वेदर डायनॅमिक्स आदींचा अभ्यास करतील.

आदित्य मोहीम ही अवकाशात सौर वेधशाळा स्थापन करण्याचा भारताचा पहिला प्रयत्न आहे. मुळात आदित्यला पृथ्वीपासून ८०० किमी उंचीवर ठेवण्याची योजना होती; पण नंतर एक महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार करण्यात आला आणि आता आदित्यला लँगरेंजियन पॉईंटवर ठेवण्याची योजना आखण्यात आली. निगार शाजी या महिला संशोधक मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. सद्यःस्थितीत निगार शाजी या प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून इस्रोत कार्यरत असून, त्यांच्या टीमने केलेल्या गेल्या ८ वर्षांच्या कठीण परिश्रमांतून ही मोहीम साध्य झाली आहे. २०१६ पासून या मोहिमेची आखणी सुरू झाली होती. कोरोनाच्या काळात २०२० पर्यंत अनेक अडचणींवर मात करून ही मोहीम फत्ते झाली.

१९८७ मध्ये निगार शाजी यांनी इस्रोमध्ये श्रीहरीकोटा येथे काम सुरू केले. पुढे त्यांना बेंगळुरू येथील यु आर राव सॅटेलाईट सेंटरचे काम सोपवण्यात आले. शाजी या पहिल्यांदा रिसोर्सेस २ योजनेच्या संचालक राहिल्या आहेत. ही योजना अजूनही प्रगतीपथावर आहे. ५९ वर्षीय निगार यांचा जन्म तामिळनाडूमधील तेनकाशी जिल्ह्यातील सेनगोट्टई येथे एका मुस्लिम कुटुंबात झाला असून, मदुराई कामराज विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्समधून त्यांनी पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Aditya L1 Satellite
Health Tips : साथीच्या रोगाप्रमाणे वाढतोय हाडांचा ठिसुळपणा; दगडासारखी हाडं होताहेत काचांसारखी नाजूक

आदित्य ही मोहीम किती जटिल आहे याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. कारण, पृथ्वी व सूर्य यांच्यातील अंतर १५ कोटी किलोमीटरचे आहे. त्यातून हे यान पृथ्वीपासून १० टक्के अंतरावर म्हणजे १५ लाख किलोमीटर अंतरावर नेऊन ठेवायचे होते. त्यातून हे काम आणखी आव्हानात्मक बनले कारण, हे यान एल-१ बिंदूभोवती त्रिमिती कक्षेत फिरण्यास सुरुवात करेल, अशी व्यवस्था करणे गरजेचे होते. एल-१ भोवती फिरता फिरता हे यान सूर्याभोवतीसुद्धा फिरणार आहे. या कक्षेची सरासरी त्रिज्या १४ कोटी ८५ लाख किमी असेल. हे यान सूर्याभोवती १७७.८६ दिवसांत एक प्रदक्षिणा पुरी करेल.

ही गती ठरवताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट साध्य होणे गरजेचे असते ती म्हणजे आदित्य यान आणि पृथ्वी जोडीने सूर्यप्रदक्षिणा करतील. सूर्य व पृथ्वी अंतरापेक्षा सूर्य व यान अंतर कमी असल्याने हे यान पृथ्वीच्या तुलनेत (३६५ दिवस) कमी वेळात (१७७.८६ दिवस) सूर्याभोवती एक रिंगण पूर्ण करेल. एवढ्या सर्व अग्निदिव्यांतून पार पडून या मोहिमेला यश गवसलेले आहे. सर्वाधिक मोहिमा नासाने राबवल्या असून, पहिली सौरमोहीमदेखील नासानेच राबवली होती. नासाने १९६९ ला लाँच केलेले पायोनिअर-ई ऑर्बिटर हे आपल्या ठरलेल्या कक्षेत पोहोचण्यास अयशस्वी ठरले होते. पूर्णपणे अयशस्वी ठरलेली ही आतापर्यंतची एकमेव सौरमोहीम आहे. २०११ ला लाँच केलेल्या जिनिअस यानाने सूर्याच्याभोवती फिरून सौरहवेचे नमुने गोळा केले होते. त्यामुळे आदित्य कोणती नवीन माहिती पुरवतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

(लेखक महाविद्यालयाचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()