गावठी वकील आत्माराम काका : काकांनी आयुष्यभर एकच व्यवसाय केला, तो म्हणजे साक्षीदाराचा!
चाळीस-बेचाळीस वर्षे कोर्टात आणि कोर्टाच्या आवारात काकांची हयात गेली. शरीर थकले तरी लोक सल्ला घ्यायला मात्र येत असत.
-राजा बर्वे, चिपळूण
आत्माराम काकांनी आयुष्यभर एकच व्यवसाय केला तो साक्षीदाराचा. रोज सकाळी उठून तालुक्याच्या गावी जाऊन कोर्टात साक्षीदार म्हणून काकांची हयात गेली. त्यासाठी वकील (lawyer) आणि पक्षकार यांच्याकडून जे काही मिळे त्यावर काकांची गुजराण होई. नामवंत वकील असावेत तसे काका नामवंत साक्षीदार. एकदा केस समजावून घेतली की, साक्ष कशी द्यायची हे काकांना पक्के ठाऊक.
उलटतपासणी घेताना वकिलांचीच ते कधी कधी भंबेरी उडवत. पुढे पुढे बऱ्याचशा फौजदारी आणि दिवाणी दाव्यांची कलमे, त्यातल्या खाचाखोचा काकांनी आत्मसात केल्या. नंतर नंतर दूर तालुक्याच्या गावी वकिलांकडे जाण्याऐवजी लोक त्यांच्याकडेच सल्ला घ्यायला येत आणि इथेच काकांचे गावठी वकील, असे बारसे झाले.
तिथवली या मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या गावातल्या रामाच्या मंदिरासमोरचा चौक कायम गजबजलेला असे. दिवसभरात एक-दोनच एसटी गाड्या ये-जा करत असल्या तरी गावातली सगळी मंडळींची वर्दळ इथूनच. तिथून वरकशीतल्या गावांमध्ये सकाळी डोक्यावर पाट्यांमधून मासळी विकायला जाणाऱ्या आणि संध्याकाळी परतणाऱ्या कोळणी या वर्दळीत भर घालत असत. याच चौकात जसं रामाचं मंदिर तसंच त्याला लागून आत्माराम काकांचं बैठे घर. रोज सकाळी आणि संध्याकाळी तास-दोन तास देवळासमोरच्या दीपमाळेच्या चौथऱ्यावर आत्माराम काकांची बैठक असे.
सव्वासहा फूट उंची, मुळात गोरा; परंतु उन्हा-पावसात रापलेला तांबूस गोरा वर्ण, धारदार नाक, घारे भेदक डोळे, हनुवटी थोडी पुढे आलेली त्यामुळे मुळात उभट असलेला चेहरा अधिक करारी, बालपणी कुस्ती, मल्लखांब खेळलेला चपळ बांधेसूद देह, नेसुला अंगावर फक्त ढोपरापर्यंत आखूड पंचा असे आत्मारामकाका गावात गावठी वकील म्हणून प्रसिद्ध होते. लहानपणीच आई-वडील गेलेले आणि लग्नकार्य न केल्यामुळे या घराने फार माणसे आणि बांगड्यांची किणकिण मात्र फार कधी ऐकलेली नाही; मात्र कधीही गेलात तरी घर मात्र लखलखीत आरश्यासारखे स्वच्छ असे.
काकांनी आयुष्यभर एकच व्यवसाय केला तो साक्षीदाराचा. रोज सकाळी उठून तालुक्याच्या गावी जाऊन कोर्टात साक्षीदार म्हणून काकांची हयात गेली. त्यासाठी वकील आणि पक्षकार यांच्याकडून जे काही मिळे त्यावर काकांची गुजराण होई. नामवंत वकील असावेत तसे काका नामवंत साक्षीदार. एकदा केस समजावून घेतली की, साक्ष कशी द्यायची हे काकांना पक्के ठाऊक. उलटतपासणी घेताना वकिलांचीच ते कधी कधी भंबेरी उडवत. फक्त इंग्रजी दुसरी इतकं शिक्षण असलं तरी कोकणातल्या मातीतला आत्मविश्वास, मूळची हुशारी, हजरजबाबीपणा आणि भारदस्त व्यक्तीमत्व या भांडवलावर काकांनी अनेक केसेस जिंकून दिल्या.
जिथे भले भले वकील जजच्या दालनात जायला घाबरत तिथे नवीन जज आला की, काका बिनधास्त जाऊन जजची भेट घेत, ओळख करून घेत, आपली करून देत. ‘साहेब, आता ओळख झाली हो आपली; पण तुमची खुर्ची वेगळी आणि आमचा साक्षीदाराचा कठडा वेगळा. कधीकधी भगवद्गीता कृष्णाने अर्जुनाला उपदेश करायला सांगितली की, कोर्टात साक्षीदाराला शपथ घ्यायला हेच कळत नाही; पण त्यात कर्मयोग मात्र नक्की सांगितलाय म्हणजे आता तुम्ही तुमचे आणि आम्ही आमचे काम करायला मोकळे आहोत’, असे सांगून काका दालनातून बाहेर येत.
वर्षांमागून वर्षे निघून गेली. चाळीस-बेचाळीस वर्षे कोर्टात आणि कोर्टाच्या आवारात काकांची हयात गेली. शरीर थकले तरी लोक सल्ला घ्यायला मात्र येत असत. माझी ओळख मात्र या त्यांच्या अखेरच्या काही वर्षातली. कोर्टातले अनेक किस्से त्यांनी मला गप्पांच्या ओघात सांगितलेत. हरत आलेली केस एका त्यांच्या साक्षीने कशी फिरली, हे सांगता सांगता ते अंतर्मुख होत आणि वर बोट करून म्हणत,"राजाभाऊ, हे सगळं ठीक आहे हो.
ही सगळी माणसाने बनवलेले नियम, कायदेकानून आणि कोर्ट तिथे साक्ष देणं सोपं; पण खऱ्याखोट्याचा निवाडा तिथे वर त्या कोर्टात, तिथे मीच माझी केस लढवणार. आयुष्यभर पोट जाळायला साक्षी दिल्या आहेत. आता ती तारीख लवकर पडावी आणि त्याने माफीचा साक्षीदार करून मुक्ती द्यावी एवढीच इच्छा! आश्चर्य म्हणजे एक दिवस रात्री झोपलेले आत्मारामकाका सकाळी उठलेच नाहीत. कोणालाही न सांगता ते आपली केस लढवायला अचानक एकटेच निघून गेले. त्याने माफीचा साक्षीदार करून मुक्ती दिली की नाही कोणास ठाऊक, त्यासाठी कोणाची साक्ष काढणार?
(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.