Konkan Business : बदलत्या बाजारपेठांकडे हवे वेळीच लक्ष्य, कशी घ्याल काळजी?
स्पर्धात्मक व्यूहरचनेला तोंड देण्यासाठी नव्या बाजारपेठेत प्रवेशासाठी सहयोगी बनता येऊ शकते का, याचाही विचार अवश्य व्हायला हवा.
-प्रसाद अरविंद जोग theworldneedit@gmail.com
खरेदीदार आणि विक्रेते यांचा जिथे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या व्यावहारिकदृष्ट्या संबंध येऊन आर्थिक व्यवहार घडतो, असे ठिकाण म्हणजे बाजार. असे मानल्यास आपल्या सर्वात जवळच्या बाजारपेठेपासून ते आपल्या व्यवसाय विस्ताराच्यादृष्टीने आवश्यक ठरू शकणाऱ्या बाजारपेठांचा व त्यांच्या क्षमतेचा अभ्यास करणे, हे एक उद्योजक म्हणून क्रमप्राप्त असते.
उद्योजक उद्योग (Business) सुरू करताना बाजारपेठ सर्वेक्षण करून आपण निवडलेल्या उद्योगसंधीला संभाव्य बाजारपेठ सहजतेने उपलब्ध होऊ शकते का? याचा अंदाज बांधत असतोच; पण उद्योग सुरू करताना उत्पादन निश्चिती करण्यासाठी किंवा उद्योग उभारणीच्या टप्प्यातील केले गेलेले सर्वेक्षण दीर्घ कालावधीसाठी उपयुक्त ठरू शकत नाही.
ग्राहक किंवा खरेदीदार यांचे खरेदीचे वर्तन शास्त्र, मागणी व पुरवठा यांचे गुणोत्तर व बदलत जाणारे बाजारपेठ क्षेत्र यावर कटाक्षाने लक्ष ठेवणारा उद्योजकच बाजाराची खरी नस ओळखून त्या दृष्टीने आपले विपणनात्मक धोरण ठरवू शकतो. स्वतःचे एखादे उत्पादन असो किंवा एखादी सेवा ती चांगल्यारीतीने विकली जावी म्हणून विक्रेता खरेदीदारांच्या गरजांचा आढावा घेत घेत आपल्या वस्तू, सेवा यासाठी बाजारपेठ काबीज करण्यासाठी प्रयत्नशील असतोच.
सातत्याने सजग राहून चहूबाजूला चाललेल्या घडामोडींवर व नव्याने बदलत्या पायाभूत सुविधांमुळे होणाऱ्या नगरोत्थानामुळे होणाऱ्या बाजारपेठांच्या विस्तारीकरणावर लक्ष्य ठेवून व्यापार, उद्योग वाढवायचा असेल तर बाजारपेठेचा योग्य अंदाज बांधायचा प्रयत्न हा उद्योजकांना, व्यापाऱ्यांना करता यायलाच हवा. विपणन व्यवस्थापन कौशल्य विकसित करण्यासाठी कोकणातील उद्योजकांनी काय करायला हवे, या संदर्भात महत्त्वाचे २१ मुद्दे. उद्योजकांनी स्वतःचा उद्योग ज्या भौगोलिक स्थानावर आहे किंवा आपण ज्या जीपीएस स्थळावर आहोत, त्या ठिकाणची जागतिक स्थिती प्रणाली दर्शकानुसार आंतरमहाजालावर नोंद करावी.
यामुळे स्थानिक उद्योग ही आंतरजालाच्या माध्यमातून वैश्विक पटलावर दिसायला लागतो. उदा. एका क्ष नावाच्या उद्योगाने कोकणात (Konkan) चिपळूण येथे कोकम सरबत बनवण्याचा उद्योग सुरू केला तर चिपळूण, सावर्डे, खेर्डी, तळी, गुहागर येथील दुकानदारही त्याच्यासाठी प्रत्यक्ष जवळची बाजारपेठ तर संपूर्ण कोकणात येणारे पर्यटकही अप्रत्यक्षपणे थेट ग्राहक मिळवून देणारी बाजारपेठ होऊ शकते. विपणन करताना बाजारपेठेतील मागणीनुसार, विक्रेत्याला वितरण व्यवस्था सुलभ व रास्त दरात व जास्त भौगोलिक भागात कशी होऊ शकेल, हेही तपासावे लागते.
कारण, यामुळेच योग्य वितरण प्रणाली व वितरकांचे जाळे प्रस्थापित करण्यास मदत होते. उद्योग विस्तारताना सुरवातीला उद्योजकाला आपल्या आस्थापनेपासून एकरेषीय किंवा परिघात येणाऱ्या बाजारपेठांचा व त्यांच्या क्रयशक्तीचा अंदाज घेऊन ग्राहकांच्या गरजांच्या प्राधान्यक्रमानुसार व ग्राहकांच्या श्रेणीनुसार आपल्या उत्पादनांचे विपणन करण्यासाठी धोरणात्मक कार्यप्रणाली अंगीकारावी लागते. विपणन हे ग्राहकांच्या गरजांची पूर्ती होण्यासाठी करायचे असल्याने बाजारपेठेत आपल्या उत्पादनविषयी व सेवेविषयी विश्वासार्हता व आकर्षण वाढावे म्हणून तत्पर असावे लागते. बाजारपेठासुद्धा काळाच्या ओघात बदलते स्वरूप घेत असल्याने बदलाला जुळवून घेण्याची मानसिक तयारी उद्योजकाला ठेवावी लागते.
प्रस्थापित बाजारपेठेत ग्राहक मिळवताना नवीन ग्राहकांची जुळवणूक करण्यासाठी प्रभावी जाहिरात तंत्राचा वापर करावा लागतो. बाजारपेठेचा खरा चेहरा हा तिथे येणारा ग्राहक असल्याने ग्राहकांचे त्यांच्या भौगोलिक, सामाजिक, राहणीमानानुसार तसेच लिंग, वय, उत्पन्न, शिक्षण, जेवणाच्या सवयी या श्रेणीनुसार वर्गीकरण करावे लागते. कोकणचा विचार करता मुंबई-गोवा तसेच गुहागर, विजापूर या महामार्गावर जिथे चौक, रस्ते, तिठे आहेत व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पायाभूत सुविधा आहेत किंवा शाळा, महाविद्यालये, तंत्र निकेतन, रेल्वेस्थानक, बसस्थानक आहेत तिथे बाजारपेठा या ग्राहकांच्या मूलभूत गरजांची पूर्ती करण्याच्या उद्दिष्टाने विकसित होत असल्याने उद्योजक अशा जागांवर योग्य जाहिरात करून आपला संभाव्य ग्राहक हेरू शकतात.
बाजारपेठेची सातत्याने अचूक माहिती मिळवून आपली विपणन प्रणाली सुदृढ करण्यासाठी ग्राहक, वितरक, पुरवठादार, स्पर्धक, वित्तसंस्था, जाहिरात संस्था यांच्याशी चांगले समन्वय ठेवून त्यांच्या संपर्कात राहणे. कोकणी उद्योजकाने आपणास उपलब्ध असणाऱ्या बाजारपेठेतून आपण किती समभाग आपल्या क्षमतांवर मिळवू शकतो याचा आढावा घेणे व व्युहात्मक विपणन व्यवस्थापन प्रणाली निश्चित करणे. ग्राहकांना प्रभावित करू शकणाऱ्या घटकांचा शोध घेत त्या घटकांना चेतवणारे ग्राहकलक्षी विपणन सुलभ निर्णय अंमलात आणणे. बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी स्पर्धात्मक किंमती ठरवण्याचा व योग्य वितरण प्रणाली कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणे.
फक्त नफ्यावर लक्ष केंद्रित न करता नवीन बाजारपेठेत शिरकाव करण्याचा प्रयत्न करणे. कोकणी उत्पादनांसाठी आपली हक्काची बाजारपेठ व्हावी म्हणून समव्यावसायिकांनी एकत्र येऊन कोकण हाच ब्रॅण्ड हे चित्र व्यापक पद्धतीने जाहिरातीच्या माध्यमातून उभे करणे. रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, गुहागर, देवरूख, खेड, दापोली, लांजा, मंडणगड या व्यतिरिक्त नव्याने जोमाने विकसित होणाऱ्या तळी, सावर्डे, खेर्डी, पिंपळी, वाकवली, कळंबस्ते, पाली, लोटे, आबलोली अशा बाजारपेठांचाही गांभीर्याने विचार नवउद्योजकांनी, व्यापारी मित्रांनी करायला हवा नाहीतर परप्रांतीय या बाजारपेठा काबीज करायला तयार आहेतच.
स्पर्धात्मक व्यूहरचनेला तोंड देण्यासाठी नव्या बाजारपेठेत प्रवेशासाठी सहयोगी बनता येऊ शकते का, याचाही विचार अवश्य व्हायला हवा. वस्तू किंवा सेवा विक्री करताना वैश्विक बाजारपेठेचा विचार करायचा असल्यास आपले संकेतस्थळ विकसित करून ते अद्ययावत ठेवावे. जे बाजारात दिसते तेच विकले जाते. त्यामुळे आपल्या उत्पादनांचे, सेवांचे योग्य प्रदर्शन करण्यावर भर द्यावा. कोणत्याही उद्योगाचा आत्मा हा बाजारपेठेतील ग्राहक असतो. त्यामुळे कोणत्याही बाजारपेठेतील ग्राहकाला समाधानी ठेवण्याचा प्रयत्न असावा. आजूबाजूला सतत बदलत राहणाऱ्या परिस्थितीला, स्पर्धेला तोंड देण्यासाठी विपणनाचे लवचिक धोरण ठेवावे. नफा मिळायला उशीर झाला तरी उद्योजकाने आधी विविध बाजारपेठेतून आलेल्या मागणीला सातत्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. विपणन कला उद्योजकाकडे असेल तर कोणत्याही बाजारपेठेत जम बसवता येतो.
(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.