Budget : 'अर्थसंकल्प' म्हणजे भविष्यातील आर्थिक शिस्तीचं 'बाळकडू'
उद्योजक स्वतःहून अर्थसंकल्पाचा अभ्यास करणारे असतील तर त्यांना भविष्यातील बदलणाऱ्या अर्थकारणाचा वेध घेणे सोपे होत असते.
-प्रसाद अरविंद जोग theworldneedit@gmail.com
अर्थसंकल्प (Budget) म्हणजे भविष्यातील आर्थिक शिस्तीचे बाळकडू असेही म्हणता येईल. उद्योग साकारताना नाईलाज म्हणून आखलेले अंदाजपत्रक कायम शिस्तीत ठेवण्याचे अवघड काम एक उद्योजक म्हणून निभावताना उद्योजकाची फारच दमछाक होते. त्यामुळे बहुतांशी उद्योजक केंद्रीय अर्थसंकल्प किंवा राज्याचा अर्थसंकल्प फार गांभीर्याने समजून घेऊन त्यानुसार आपली रणनीती ठरवण्याच्या फंदात पडत नाहीत. ते आपले दैनंदिन कामकाज किंवा महिन्याच्या अखेर भरायला लागणाऱ्या कर्जाच्या हप्त्यांचा किंवा कामगारांच्या पगार व भत्त्यांचाच विचार करत राहतात.
अर्थकारण समजून घेण्यासाठी अगदी पूर्ण अर्थशास्त्राचा अभ्यास करायची गरज नसते तर मान्यवरांच्या, तज्ञांच्या अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया ऐकून, पाहून, वाचून व आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला साक्षी ठेवून दरवर्षी होणाऱ्या अर्थसंकल्पाचा थोडक्यात परामर्श काढण्याची किंवा त्यातील ठळक मुद्दे अधोरेखित करून त्यावर आपल्याच क्षेत्रातील उद्योजकांशी गटचर्चा करून आपल्यासाठी वार्षिक अर्थसंकल्पात निश्चित काय आहे व अर्थकारणाची दिशा काय असणार आहे तसेच करप्रणाली नक्की कशी असणार आहे, याची खात्री करून घेणे हे उद्योजकीय परिपक्वतेचे लक्षण ठरू शकते. उद्योजक (Businessman) हा अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्वाचा घटक असतो, हे पहिल्या पिढीतील उद्योजक मित्रांनी नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे.
उद्योजक स्वतःहून अर्थसंकल्पाचा अभ्यास करणारे असतील तर त्यांना भविष्यातील बदलणाऱ्या अर्थकारणाचा वेध घेणे सोपे होत असते. दरवर्षीच्या अर्थसंकल्पाचा विश्लेषणात्मक अभ्यास करून हे उद्योजक भविष्यकालीन अंदाज व आडाखे बांधत आपल्या उद्योजकीय प्रगतीसाठी काय योग्य ठरू शकते, यावर आपले सुयोग्य मत बनवू शकतात. उद्योजक हा आपल्या व्यवसायात नवा असो अथवा जुना त्याला आपल्या विशिष्ट उद्योगाची ध्येयधोरणे ठरवण्यासाठी आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा सजगतेने वेध हा घ्यावाच लागतो.
यावर्षीचा अंतरिम अर्थसंकल्प उद्योजकांसाठी कसा आहे, हे पाहण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मांडलेले प्रमुख मुद्दे उद्योजक मित्रांनी समजून घेणे गरजेचे आहे. २०४७ ला विकसित भारताचे स्वप्न भारतीयांना दाखवून पायाभूत क्षेत्रात भरीव कामगिरी होणार असल्याचे संकेत...त्यासाठी भरीव तरतूद. संशोधन वाढावे म्हणून त्यासाठी वेगळी तरतूद. स्टार्टअपसाठी करातून सवलत देण्याचा निर्णय. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उपक्रमाला अधिक चालना देणारे धोरण. सौरऊर्जा क्षेत्राला विस्तारवाढीसाठी योग्य धोरण.ग्रामीण भागाच्या विकासासाठी धोरण व निधीची तरतूद. कोकणातील मत्स्य व्यवसायाला चालना देणारी मोठ्या रकमेची तरतूद.
पर्यटनस्थळांचा जागतिक पातळीवर प्रचार व प्रसार होण्यासाठी प्रोत्साहनात्मक प्रावधान. महिला सक्षमीकरण हा ध्यास दाखवणारा अमृत संकल्प. हरित ऊर्जा देशाच्या शाश्वत विकासासाठी महत्वाची हे अधोरेखित करणारा व त्याचा होणारा उल्लेख महत्वाचा. प्राप्तीकरात कोणतेही विशेष बदल नाहीत. अन्वयार्थ, उद्योजकांनी आत्मनिर्भर होऊन परडोई उत्पन्न वाढवावे, अशी प्रेरणा देणारा अंतरिम अर्थसंकल्प.
पर्यटन, शेती, कृषिपूरक उद्योग, दुग्ध व्यवसाय, डेअरी, सोलार एनर्जी, मत्स्य व्यवसाय, फळप्रक्रिया अशा उद्योग व्यवसायांना धार्जिणा व असे उद्योग वाढू शकतात, असा कल दाखवणारा अर्थसंकल्प. संशोधन, सृजनात्मकता, नावीन्यता उद्योगधंद्यात वाढली पाहिजे, त्याला अनुकूल वातावरण आहे हे सूचित करणारा अर्थसंकल्प. प्राप्तीकर रचना कायम असल्याने ग्राहकांची विक्रय शक्ती उत्तम असल्याचे दर्शवणारा अर्थ संकल्प. आत्मनिर्भर होऊन लांबच्या ध्येयाला (२०४७) विकसित अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रत्येक तरुण उद्योजकाला स्वतः आपण यात काय योगदान देऊ शकतो, याचा विचार करायला लावणारा अर्थसंकल्प.
(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.