'काँग्रेसच्या कुबड्या घेऊन नाचणाऱ्यांनी पेकाटात लाथ घालायची भाषा करू नये'; उदय सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
'मुस्लिम समाज हा वर्षानुवर्षे माझ्यासोबत आहे. या समाजाचे आणि आमचे वेगळे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे कोण कुठे गेलेले नाही.'
रत्नागिरी : शिवसेना-भाजपने युती (Shiv Sena-BJP Alliance) म्हणून २०१९ च्या निवडणुका लढवल्या; परंतु सत्तेसाठी भाजपशी फारकत घेऊन काँग्रेसशी हातमिळवणी केली. मग ही गद्दारी नाही का? जे काँग्रेसच्या कुबड्या घेऊन नाचत आहेत, त्यांनी कोणाच्याही पेकाटात लाथ घालायची भाषा करू नये, असा पलटवार उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केला.
कॉन्ट्रॅक्टर म्हणून आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे आणि त्याचा मला अभिमान आहे; परंतु ज्यांचा कोणताही व्यवसाय नाही, त्यांच्या ६ ते ८ मजली इमारती कशा? असाही प्रश्न पडू शकतो, असा टोलाही त्यांनी लगावला. दूरदृश्यवाहिनीद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सामंत म्हणाले, गेले दोन दिवस रत्नागिरीत ऐतिहासिक आणि धार्मिक कार्यक्रम झाले.
या दोन कार्यक्रमांमध्ये एक ठाकरेंच्या सभेचा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. रस्त्यावरच्या सभेत टोमणे, खालच्या पातळीवरून जाऊन टीका, असा एककलमी बदनामीचा कार्यक्रम सुरू आहे. ते माझ्यापेक्षा वयाने आणि मानाने मोठे आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल मला आदर आहे; परंतु मी काहीच उत्तर दिले नाही तर मी घाबरलो, असा संदेश जाईल. म्हणून त्यांच्या भाषणाला उत्तर द्यायचे आहे. प्रत्येकवेळी माझ्या व्यवसायावरून टीका केली जाते. होय मी आहे ठेकेदार. आमचा हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपल्याकडे चार बोटं असतात, याचे आत्मचिंतन त्यांनी करावे. अपशब्द वापरणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल.
मुस्लिम समाजाबाबत १५ दिवसांत प्रचिती
मुस्लिम समाज हा वर्षानुवर्षे माझ्यासोबत आहे. या समाजाचे आणि आमचे वेगळे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे कोण कुठे गेलेले नाही. येत्या पंधरा दिवसांत मुस्लिम समाज आपल्याबरोबर असल्याची प्रचीती सर्वांनाच येईल. मुस्लिम बांधवांचा एक मोठा कार्यक्रम होणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.
खरे गद्दार कोण ते बघा
गद्दारांना गाडायचे आहे या उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याशी आपण पूर्ण सहमत आहोत. बाळासाहेब ठाकरे सांगायचे की, मी शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही. अशी वेळ आली तर आपण पक्ष बंद करू; पण आता ठाकरे शिवसेना काँग्रेससोबत गेली आहे, ही खरी गद्दारी आहे आणि ती गाडायला हवी आहे, अशी टीका सामंत यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.