वसई-अलिबाग 
मेट्रो लवकरच

वसई-अलिबाग मेट्रो लवकरच

Published on

वसई-अलिबाग
मेट्रो लवकरच
विरार : भाईंदरच्या पुढे वसई-विरार मेट्रोच्या कामाला अजून हिरवा कंदील मिळालेला नाही. मात्र, वसईकरांसाठी अलिबाग-वसई मेट्रोच्या मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच हा मेट्रो मार्ग तयार होणार असल्याने वसईकरांना दळणवळणाचा आणखीन एक मार्ग उपलब्ध होणार आहे. एका बाजूला मुंबईमधून भाईंदरपर्यंत मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, नायगाव आणि भाईंदरमध्ये असलेल्या खाडीमुळे पुढील हे काम एवढ्यात तरी सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खाडीवर पूल उभारण्याबरोबरच त्याच पुलाच्या समांतर मेट्रोचे काम करावे, अशी मागणी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली होती. त्याला अजून हिरवा कंदील मिळालेला नाही.
--
खाजखुजली
टाकत लुबाडले
पनवेल : बँकेतून पैसे काढून घरी निघालेल्या एका व्यक्तीच्या मानेवर खाजखुजली टाकून ५० हजारांची रोख रक्कम असलेली बॅग चोरल्याची घटना नवीन पनवेलमध्ये घडली आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कर्जत तालुक्यातील दहिवली येथे राहणारे रवीद्र गायकवाड (५८) नवीन पनवेल येथील सिडको कॉलनीतील बॅंकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. पन्नास हजारांची रक्कम आपल्याजवळच्या बॅगेत ठेवून बँकेच्या बाहेर आले. यावेळी एका चोरट्याने गायकवाड यांच्या अंगावर खाज निर्माण होण्यासारखी पावडर टाकली. त्यामुळे गायकवाड यांच्या मानेवर खाज येऊ लागल्यानंतर मदत करण्याचा बहाणा करून त्यांना लुबाडले.
--
कशेडी घाटात
बसचा अपघात
पोलादपूर ः मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अपघातांचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी भोगाव क्षेत्रात दुपारी ३ च्या सुमारास युनिस याकूब आगा (५८, रा. गोवा) हे आपल्या ताब्यातील बस घेउन गोवा ते पनवेल जात होते. याच मार्गावरून चालक सिद्धार्थ गंगाराम बडे यांनी आपल्या ताब्यातील एसटी घेउन रत्नागिरी-वसई असा प्रवास करीत होते. मात्र रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्‍यांनी भरधाव वेगात पनवेल-गोवा एसटीला मागून जोरदार धडक दिली. यामुळे दोन्ही बसचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल जाधव व त्‍यांच्या पथकाने घटनास्‍थळी धाव घेतली. सिद्धार्थ बडे यांच्यावर गुन्हा दाखल केला.
--
मुंबई-पुणे अंतर
९० मिनिटांवर
पनवेलः मुंबई ते पुणे प्रवासातील अंतर कमी व्हावे, यासाठी अटल सेतू चिर्ले ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गवरील कोन असा ७.३५ किलोमीटर लांबीच्या एक हजार कोटींच्या एलिव्हेटेड लिंक रोडला मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे असा प्रवास भविष्यात ९० मिनिटांचा होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास अधिक वेगवान झाला आहे; तर या प्रकल्पामुळे वाहनचालकांना दिलासा मिळालेला आहे. मात्र असे असले तरी मुंबईहून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प अर्थातच अटल सेतूने प्रवास करून चिर्ले येथे आल्यानंतर तेथून पुण्याच्या दिशेने जाताना तारेवरची कसरत होते.
--
दुबार हंगामात
भात लावणी
रसायनी : रसायनी-पाताळगंगा परिसरात दुबार हंगामातील भात लावणीची कामे सुरू झाली आहेत. खरिपाच्या हंगामापेक्षा दुबार हंगामात पीक चांगले येत असल्‍याने सध्या शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. पाताळगंगा नदीच्या काठच्या गावातील शेतक-यांना मुबलक पाणी उपलब्‍ध होत आहे. तसेच जांभिवली गावाजवळ माणिकगडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणाचे पाणीही सिंचनासाठी सोडण्यात येत असल्‍याने दुबार हंगामातील लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. जांभिवली पंचक्रोशीत तसेच मोहोपाडा येथील शेतकऱ्यांना एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातील सांडपाण्याचा आधार आहे. त्यामुळे हे पिक घेतले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.