Nilesh Rane : भास्कर जाधवांची चिपळूणमधील भाईगिरी संपवणार; राड्यानंतर नीलेश राणेंचा गर्भित इशारा
भास्कर जाधव तुम्ही नख लावले आहे, सोडणार नाही. मुंबईत ठाकरे, पवारांना कधी घाबरलो नाही तू कोण?
गुहागर : भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) याने कणकवलीत आल्यानंतर नारायण राणे यांच्याबाबत काय काय शब्द वापरले, हे मी विसरू शकत नाही. मला काही बोल; परंतु राणे साहेबांना बोलल्याचे खपवून घेतले जाणार नाही. भास्कर जाधव शेपटीवर पाय दिलास, तुला जन्मात विसरणार नाही. तुझी चिपळूणची भाईगिरी मी संपवणार, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी आमदार भास्कर जाधव यांना येथे झालेल्या जाहीर सभेत दिला.
नीलेश राणे म्हणाले, ‘सभेची गरज होती असे मला वाटत नव्हते; पण उद्धव ठाकरे गटाच्या प्रमुखांची कणकवली सभा झाली; पण मला आनंद आहे. आज पहिल्यांदा नातू साहेबांना आक्रमक भाषण करताना पाहिले. खुर्ची माझ्या बाजूलाच होती; पण आवडलं आपल्याला. कणकवलीत आल्यानंतर उद्धव ठाकरे, भास्कर जाधवनी नको नको ते शब्द राणे साहेबांबाबत वापरले. डॉ. विनय नातू यांना मतदारसंघात चार वेळा निवडून दिले.
या मतदारसंघाला त्यांनी वेगळ्या उंचीवर नेण्याचा काम केले; परंतु हा आमदार झाला आणि त्यांनी जे मिळवले तेवढे सर्व घालवायचे काम केले. एकही काम दाखवण्यासारखे नाही. भास्कर जाधव तू आमच्या शेपटीवर पाय दिलास. तुला जन्मात विसरणार नाही. दगडफेकीला आम्ही घाबरत नाही. आता बसलाय चिपळुणात २५ लोक घेऊन.’’
राणे म्हणाले, ‘‘बाळासाहेबांवर कधीच वाईट दिवस आले नव्हते. राणेंनी ठाकरेसाहेबांवर जेवढे प्रेम केले त्याच्या ५ टक्केदेखील तू करू शकत नाहीस. आम्ही विरोधीपक्षनेते होतो तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) सरकार पाडण्यासंदर्भात साहेबांनी शब्द दिला; परंतु तेव्हा पैसा नव्हता, तेव्हा राणेसाहेबांनी घर गहाण ठेवले. ठाकरे साहेबांसाठी तू काय केलेस. आम्ही राहायचे कुठे असा तेव्हा प्रश्न होता. काय अवस्था झाली होती; पण राणेसाहेब कधी सांगायला गेले नाहीत. आम्ही परत हे सर्व वैभव उभे केले. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा स्वतःला सिद्ध करणारा नेता नारायण राणे आहेत; पण तुला आयते मिळत गेले. ठाकरे कुटुंबावर मी कधी बोललो नाही, म्हणणाऱ्या भास्कर जाधवचा ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे म्हणत भास्कर जाधव यांचा जुना व्हिडिओ लावण्यात आला.
त्यानतंर राणे पुन्हा आक्रमक पवित्रा घेत म्हणाले, ‘‘भास्कर जाधव तुम्ही नख लावले आहे, सोडणार नाही. मुंबईत ठाकरे, पवारांना कधी घाबरलो नाही तू कोण. कितीवेळा आमदार केले; पण गुहागरचा विकास दिसतो काय. प्रत्येक कामात पाच टक्के घेणारा हा आमदार. अडीच वर्षे सत्ता होती, ठाकरेंनी का मंत्रिपद दिले नाही, पवारसाहेबांनी ९ खात्यांचा मंत्री केला. काय दिले गुहागरला बघा. आता नगरपंचायत झाली. हा नीलेश राणेच तुझा बाजार उठवणार त्याशिवाय थांबणार नाही, दोन पराभव झाले अजून चार होऊ दे; पण राणे थांबणार नाही.’’
संवेदनाहीन जाधव....!
जेव्हा २०१३ ला दुष्काळ होता, तेव्हा दोन मुलांचे थाटात लग्न करणारा संवेदनाहीन हा माणूस. शेतकरी मेला तरी चालेल; पण याची पत दिसली पाहिजे. उद्धव ठाकरेंना माहीत नाही, भास्कर जाधवचे कोणा एका नेत्याबरोबर पटले नाही. रामदास कदम, उदय सामंत, तटकरे, शेखर निकम, रमेश कदम या प्रत्येकाबरोबर त्याचा क्लेश. माणसांना भडकवायचे आणि नंतर आपण रडत बसायचे, असा टोलाही राणे यांनी लगावला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.