Konkan news
Konkan newsesakal

भूलतज्ज्ञ नाथा : 'आयुष्यभर ओढलेल्या धुराने फुप्फुसे निकामी झालीयत, वर्षातून चार-पाचवेळा नाथा वेडसर होतो!'

नाथाच्या या गांजा चिलीम कसबामुळे लोक गमतीने नाथाला भूलतज्ज्ञ म्हणत असत.
Published on
Summary

आयुष्यभर ओढलेल्या धुराने फुप्फुसे निकामी झालीयत..वर्षातून चार-पाचवेळा नाथा वेडसर होतो.

-राजा बर्वे, चिपळूण

नाथा चांगला असे तेव्हा रोज सायकलवर (Cycle) गावात पेपर टाकत असे. गावाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सायकलची घंटा अखंड बडवत जाई. पेपर टाकताना हमखास चार, पाच कप चहा कुणा ना कुणाकडे ढोसत असे. सायकलच्या हँडलला डावीकडे पेपरची थैली आणि उजवीकडे पानांची चंची लटकवलेली असायची. सतत ओल्या सुपारीचा तोब्रा आणि तंबाखूची मळी गालात ठेवून नाथा फिरायचा.

संध्याकाळी गावात रघुअण्णांकडे परसदारी गांजाची चिलीम शिलगावली जायची. तिथे नाथा हमखास सापडे. नाथा तब्येतीने आडदांड होता. चिलीम शिलगावताना उजव्या हाताची मूठ वळलेली आणि डावा हात उपडा करून जोरदार झुरका मारला की, चिलमीतून ज्वाळा वर यायच्या आणि नाथा नंतर भरल्या तरी बंद डोळ्यांनी दोन मिनिटे धुराची वर्तुळे हवेत सोडत राही. नाथाच्या या गांजा चिलीम कसबामुळे लोक गमतीने नाथाला भूलतज्ज्ञ म्हणत असत.

Konkan news
भारतातील 'ही' पहिली बुलेट ट्रेन वाऱ्याशी करणार स्पर्धा; बंदुकीतील गोळीच्या वेगाचाही चुकवणार अंदाज!

सुमारे २५-३० वर्षांपूर्वीचा हा काळ आहे. नोकरीच्या निमित्ताने एका गावात राहत होतो. छोटंसं गाव, तालुक्यापासून वीसेक किलोमीटर, गावात शिरायचं तर आधी होडीने खाडी पार करावी लागत असे. बंदरावर अनेक पर्यटक (Tourists) संध्याकाळी गर्दी करून फिरताना दिसत. त्याच गर्दीत नाथा हटकून फिरताना दिसत असे. पहावे तेव्हा बंदरावर फिरणारा हा कोण असावा? असा नेहमी मला प्रश्न पडत असे.

गावातल्या छोट्याशा आळीतल्या कोपऱ्यात एका बाजूला नाथाचे घर होते. पूर्वी गावातले खोत असल्यामुळे जागा भरपूर. नाथाचे वडील, नानूकाका मंत्रतंत्र, गंडादोरा, पंचांग बघत असत. शेतीवाडी भरपूर त्यामुळे मधल्या राशीची कधी ददात नव्हती. शिवाय पंचांग, गंडेदोरे यातून चार पैसे मिळत. नाथाला तीन भावंडे, दोन बहिणी लग्न होऊन गेलेल्या. एक भाऊ मुंबईत (Mumbai) कुठंतरी छोटी खासगी नोकरी करत होता. चुलते, त्यांची मुलंबाळं पूर्वीच बाहेर जाऊन स्थिरावली होती. घरी फक्त नाथा आणि आई-बाबा. नाथाचंदेखील लग्न झालं होतं. सगळं सुरळीत सुरू असताना एक दिवस अचानक नाथाला फिट आली आणि त्यातून तो सावरला तरी मग मात्र अधूनमधून डोक्यावर परिणाम झाल्यासारखा वागू लागला. त्यातून सावरल्यावर नाथा ठीक झाला तरी थंडी पडून आंब्याला मोहोर आला.

पावसाळ्यापूर्वी काळे ढग जमून आभाळ भरून आलं. होळीमध्ये पालख्यांचे ढोल वाजायला लागले. नवरात्रात महालक्ष्मीची अंगात आलेली ‘झाडे’ कळशी घागरी फुंकून घुमायला लागली की, नाथा वेड्यासारखे वागायला लागायचा. अवसे पौर्णिमेला हमखास उशिरापर्यंत बंदरावर जाऊन बडबडत बसायचा. नाथाचे वडील, नानूकाका गंडेदोरे देत असत. भानामती, करणी, पाहात असत; पण तरी नाथा असे का वागतो, ते मात्र त्यांना कधी कळले नाही. गावातले लोक मात्र यासाठी नाथाच्या वडिलांनाच दोष देत. म्हणत, दुसऱ्यांच्यासाठी काढलेल्या खड्ड्यात नाथाच्या रूपाने नानूकाकाचं कुटुंब स्वतःच पडलंय, असं काहीबाही बोलत.

Konkan news
Konkan Business : सगळी सोंगं घेता येतात; पण पैशाचं सोंग घेता येत नाही.!

नाथा शाळेत शिकला नाही; पण चांगला असला की, व्यवहारी बोलत असे. बायकोचे लाड करत असे. सायकलवर मागे बसवून केशवराजला दर्शनाला घेऊन जाई. मुलींना वसंतपंचमी झाली की, गावोगावच्या जत्रांना नेई. नवे कपडे घेई. खाजे भजी खायला घाली. चाळीशीच्या आत -बाहेर वय असलेला एकनाथ सहा फूट उंच, अंगात कायम एक हाफ चड्डी, बिनगळ्याचा मुंढा, त्याचा खिसा कसल्या कसल्या कागदांच्या चिटोऱ्यांनी वीतभर टम्म फुगलेला, गळ्यात गमशा, लहानपणी कुस्ती खेळलेला नाथा गोकुळाष्टमीत सहाव्या थराला चढून हंडी फोडत असे. सत्तर-ऐंशी फूट उंचीच्या माडावर सरसर चढून जवळच्या माडावर झापाला धरून वरच्यावर जाऊन नारळ पाडत असे. गावात नारळाच्या पाड्याला नाथा सगळीकडे असायचा.

एकदा शर्यत लागली आणि नाथाने एक डझन सुखडी दाताने सोलल्या; पण त्यामुळे दात हलले म्हणून डॉक्टरांनी मग दातांना तारा आवळून ठेवल्या. जेमतेम पंधरा दिवस झाले आणि नाथाच्या हिरड्यांमध्ये तारा टोचून जखमा होऊ लागल्या. नाथाला डॉक्टरांकडे जायचा सल्ला दिला तर पठ्ठ्याने छोटी पकड घेतली आणि घरीच सगळ्या तारा काढून टाकल्या. रघूअण्णांच्या परसदारी चिलमीनंतर हा कार्यक्रम झाला. रघुअण्णा यावर म्हणाले, ‘नाथा, आज तू तुझं भूलतज्ज्ञ हे नाव सार्थकी केलंस हो, अरे या चिलमीच्या नशेच्या तारेत या सगळ्या तारा तू काढून टाकल्यास, धन्यरे बाबा तू’..

Konkan news
Ajit Pawar : 'काजू बोंडावर प्रक्रियेसाठी ब्राझीलसोबत सामंजस्य करार'; मुंबईतील बैठकीत अजितदादांचे निर्देश

एक दिवस बँकेत आला. त्याचे खाते बँकेत होते; पण त्यात खडखडाट. मला म्हणाला, ‘साहेब यात पैसे कसे साठवायचे सांगा. पैसे मिळतात; पण संध्याकाळी पुडी आणायला अर्धे संपतात, साले झुरके मारायला सगळे हजर.’.. मग मी त्याला थोडे डोस पाजले. ‘नाथा, अरे छान संसार आहे. दोन सोन्यासारख्या मुली आहेत. थोडे थोडे बाजूला करत जा म्हणजे साठतील.. त्यावर नाथा म्हणतो, ‘साहेब बँकेत सारखा आलो की, लोकांना वाटेल नाथाकडे पैसा झाला. मग उधार मागायला माझ्याकडे रीघ लागली तर काय करू तेवढं सांगा.’ नाथाला पैसे साठवणे मात्र कधी जमले नाही.

एकनाथाचा नाथा कधी झाला हे मात्र गावालासुद्धा कळलं नाही. फिट्स यायला लागल्या आणि नाथा बिघडत गेला. बायकोला, मुलींना मारहाण करत असे आणि मग स्वतःच स्वतःला खोलीत कोंडून घेऊन रडत बसे. काळ सरकत राहिला. नाथाचे वय वाढत गेलं. दरम्याने, त्याचे आई-वडील गेले आणि नाथा अनिर्बंध झाला. बायकोला जुमानत नसे. मुलींना तिने माहेरी पाठवून दिले आणि एक ना एक दिवस नाथा सुधारेल, नीट वागेल या वेड्या आशेवर ती कुढत, जगत राहिली. मुली थोड्या शिकल्या सवरल्या, जावई बरे मिळाले आणि आईचे नाथासोबत होणारे हाल पाहून आईला एका मुलीने दाभोळला आपल्याकडे नेले.

Konkan news
'महाधनेश'च्या 39 जोड्यांचे संगमेश्वरसह चार तालुक्यांत संवर्धन; पक्षाच्या घरट्यांवरही राहणार CCTV ची नजर

गेली काही वर्षे नाथा एकटाच राहतो. नाथाची आता साठी जवळ आलीय. हातून काम होत नाही. आयुष्यभर ओढलेल्या धुराने फुप्फुसे निकामी झालीयत..वर्षातून चार-पाचवेळा नाथा वेडसर होतो. वडाच्या पारावर, बंदरावर फिरत राहतो. बंदरावरचा हॉटेलवाला चंदू त्याला कधी वडापाव, भजी देतो, कोणी सणावाराला बोलावतात, श्राद्ध पक्षाला पितर म्हणून जेवायला बोलावतात, गोडधोड खाऊ घालतात.

कोकणातली अशी माणसे जग आणि जीवनाकडे एका वेगळ्याच अशा गांजेकस भूलीमधून बघत राहतात. आभासी सुखाची चाहूल घेत राहतात. सभोवारची माणसे मग ती भूल आणि आभास हेच वास्तव आहे, असे स्वतःच्या करमणुकीखातर त्यांची समजूत करून देत राहतात आणि अशाच आभासी जगातला हा भूलतज्ज्ञ नाथा अनेक क्षमता असून वाया गेलेल्या लोकांचे प्रतिनिधित्व करत जगत राहतो, कधी शहाणा तर कधी वेडा होत आयुष्याची वाट चालत राहतो.

(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.