Devbagh Beach
Devbagh Beachesakal

Devbagh Beach : 'लोक गोव्यात जातात आणि पी पी पितात; पण तेथून थोड्या अंतरावर असलेला निसर्ग प्यायला विसरतात!'

लोक गोव्यात जातात आणि पी पी पितात; पण तेथून थोड्या अंतरावर असलेला निसर्ग प्यायला विसरतात.
Published on
Summary

मुंबई-गोवा महामार्ग पकडायचा आणि मालवण गाठायचे; पण मालवणात मुक्काम करण्यापेक्षा देवबागला मुक्काम करा.

-पराग वडके, चिपळूण parag.vadake@gmail.com

‘लॉंचमध्ये मस्त दणकून उडी मारली. गौरवने (आमचा मित्र पुढच्या प्रवासातला कम गाईड) हात दिला आणि परूळे धक्का सोडला. गोवा ते कुडाळ लाल डबा मार्चचे रणरणते ऊन आणि सोबत ५ मित्र. कोण नागपूर, नांदेड, सोलापूर तर कोणी जळगाववाला. सगळे महाराष्ट्राचा कानाकोपरा फिरणारे कोकणात (Konkan) उतरत होते. लाल डबा कोकणात कसा एकेकाला लाल लाल करत ते अनुभवत कुडाळमध्ये उतरलो.

तिथून रिक्षाने १७ किलोमीटरवर परूळ गाव आणि परूळ्याचा धक्का. वेळ संध्याकाळ ६ची. धक्क्यावर पोचल्यावर समोर हजारो रंग ओतून निसर्गाने मारलेले फटकारे. सगळा शीण त्या फटकाऱ्याने फाट्यावर मारून आम्हाला त्या पोट्रेटमध्ये वर निसर्गाने प्रवेश दिला. समोर देवबाग कर्ली नदी ती जेथे समुद्राला मिळते तो संगम. मस्त नदी आणि समुद्र एकमेकांवर ढुशी मारत होते.

Devbagh Beach
भूलतज्ज्ञ नाथा : 'आयुष्यभर ओढलेल्या धुराने फुप्फुसे निकामी झालीयत, वर्षातून चार-पाचवेळा नाथा वेडसर होतो!'

आम्ही लॉंचमध्ये बसलो. समोर, ''सामंतांना'' लाभलेले वरदान दिसत होते. अख्ख्या डोंगरवर आंब्याची बाग आणि निसर्ग त्यांचे काहीतरी देणे असल्यासारखा. म्हणे, या सामंतांना नोव्हेंबरमध्येच अस्सल हापूस भरभरून देतो आणि पहिली पेटी १० ते २० हजार भाव खाऊन अमेरिकेत पोहोचते. सावकाश पलीकडे देवबाग बीच (Devbagh Beach) वर पोहोचलो. तिथून एका बाजूला सनसेट आणि आमची पायपीट. तेथून अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या समीर तांडेलच्या घरात आलो आणि फक्त १०० फुटांवर संध्याकाळचा समुद्र मस्त लाटा उधळत किनाऱ्यावर आपली मस्ती दाखवत येतोस का माझ्यासोबत? तुला ओपन ऑफर देतो. आलास सोबत तर अख्खी दौलत तुझी! असे मस्त लाटातून सांगत होता.

िट्रपचे उद्दिष्ट स्कुबा डायव्हिंग असल्याने बाकी फिरायला गेलो नाही. मस्त रात्री सौंदाली सोलकढी असे समुद्री जेवण केले. जळगाव, नांदेड, नागपूरवाले कोकण काय चीज आहे, हे भरभरून अनुभवत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३०ला यशवंत आला. हा, आम्हाला आता पुढे गाईड करणार होता. ''सारंग कुलकर्णी'' नावाच्या एक समुद्रवेड्या तरुणाने सगळ्यात पहिल्यांदा भारतात अंदमान-निकोबार बेटानंतर अतिशय विस्तृत स्वरूपात कोरल रिफची दौलत सिंधुदुर्ग परिसरात असल्याचा शोध लावला. स्वतः सारंग हे मरिन जीवशास्त्रज्ञ आहेत आणि जगातील नामवंत स्कुबा डायव्हिंगमधील तज्ज्ञ आहेत. त्यांनी मालवण परिसरात शोध लावल्यावर तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर तेथील तरुणांना त्यांनी एकत्र केले.

Devbagh Beach
Konkan Business : सगळी सोंगं घेता येतात; पण पैशाचं सोंग घेता येत नाही.!

तरुण मच्छीमारी करणारे जेमतेम दहावीपर्यंत गेलेले; पण सगळ्या परिसराची इंच इंच माहिती असणारे. व्यवस्थित स्कुबा डायव्हिंगचे त्यांना प्रशिक्षण दिले. सोबत स्नॉर्क्लिंगचे पण दिले. स्कुबा डायव्हिंग म्हणजे तुम्ही तोंडावाटे हवा घेऊन समुद्रात तळाशी जाऊन खालील सौंदर्य बघणे तर स्नॉर्क्लिंग म्हणजे समुद्राच्या पाण्यात डोके खुपसून तळातील सौंदर्य पाहणे; पण खरी मजा स्कुबा डायव्हिंगमध्ये आहे. तुम्हाला सिंधुदुर्ग आणि देवबागमध्ये या दोनही गोष्टी बघायला मिळतात; पण देवबागमधील टीम ही थोडी महागडी असली तरी ती तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यापासून दूर खोल समुद्रात घेऊन जाते आणि जास्त वेळ देतात.

यशवंतने आम्हाला अशा जागी आणले की, तिथून सिंधुदुर्ग किल्ला दिवाळीच्या किल्ल्याएवढा दिसतो आणि आपण समुद्राच्या मध्यभागात. यशवंतने आम्हाला प्राथमिक ट्रेनिंग दिले. अंगठा वर केला की, मला अस्वस्थ वाटत आहे. वर घेऊन चल, अंगठा खाली केला की, मी आता ओके आहे पुन्हा मला खाली घेऊन चल आणि छान छान असे हाताने दाखवले की, आपण समुद्रसफारी एन्जोय करतोय, अशा खुणा.

सोबत दोन गाईड असतात. एक तुम्हाला खाली तळाशी घेऊन हात धरून समुद्रीसंपत्ती दाखवतो आणि एकजण समुद्राच्या पृष्ठभागावर हातात सुरक्षाट्यूब घेऊन पोहत असतो. तुम्ही वर येताना दोन्ही हात ताठ करून त्या ट्यूबमधून बाहेर काढायचे आणि दम खायचा. मला यशवंतने श्वास घ्यायला शिकवले आणि मी हळूच समुद्रात डोकं खुपसले आणि एका मिनिटात डोके बाहेर काढले. माझी तंतरली होती. वर वर सोपे वाटणारे तोंडाने श्वास घ्यायचा प्रकार लय अवघड होता भाऊ! मी पुन्हा दम खाऊन जर खाली जायला बघितले आणि हाशहुश करत पुन्हा बाहेर आलो आणि चोख त्याला सांगितलं, आपल्याला जमणार नाही. मला पुन्हा बोटीत सोड; पण त्याला या प्रकारची सवय असावी. त्याने मला धीर दिला.

Devbagh Beach
भारतातील 'ही' पहिली बुलेट ट्रेन वाऱ्याशी करणार स्पर्धा; बंदुकीतील गोळीच्या वेगाचाही चुकवणार अंदाज!

मला सांगितले, तुम्ही आयुष्यात बिननाकाचे जन्माला आला आहात आणि तोंड हेच नाक, असे समजून श्वास घ्या आणि हेच आपले जीवन असे समजून एक मासा व्हा आणि शांतपणे माझ्याबरोबर चला. मी मासा झालो. तोंड माशाचे कल्ले झाले आणि यशवंतच्या हातात माझ्या आयुष्याची दोरी देऊन त्याच्या साथीने खोल समुद्रात शिरलो. हळू एकेक फूट तळाशी जात होतो आणि जाणवले पाठीवर पाच किलोची लॅपटॉपची बॅग असली की, कधी एकदा उतरवतो असे होते आणि इथे मी अक्खी जगातील सर्वात मोठी पाण्याची टाकी घेऊन फिरत होतो. थोडे कानावर पण दाब येतो. दुखतात; पण हळूहळू सवय होते आणि यशवंतने मला समुद्र काय काय लपवून आहे ते दाखवले. समुद्री फुले, समुद्री काकडी, काटेरी मासे निमो, हजारो रंगाचे मासे.

कदाचित आता ते यशवंतला ओळखू लागले असतील. हा आला की, आपल्याला खाणे मिळते कोठून कोठून. मासे अंगावर येत होते. ए मला पण बघ. ए माझी साडी बघ ए जाड्या माझा टी शर्ट बघ. अरे बापरे बाप, हा बघ कोणीतरी खडूस माझ्याकडे बघतो. असंख्य प्रकार मला एक जाणवले. हळूहळू आपण जमिनीवर आलो त्यामुळे खालचे चेहरे ओळखीचे वाटू लागले. तेवढ्यात यशवंतने हात सोडला आणि कॅमेरा काढला, मग मस्त पोझ दिल्या आणि फोटोसेशन झाले.

Devbagh Beach
Konkan Tourism : समृद्ध पक्षीजीवनातून पर्यटन व्यवसायाला मोठी संधी!

लोक गोव्यात जातात आणि पी पी पितात; पण तेथून थोड्या अंतरावर असलेला निसर्ग प्यायला विसरतात. त्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग पकडायचा आणि मालवण गाठायचे; पण मालवणात मुक्काम करण्यापेक्षा देवबागला मुक्काम करा. तुम्ही समुद्राच्या खांद्यावर डोके खुपसून असता आणि जाताना शिवराय आणि हिरोजी इंदुलकर यांचा निसर्गाच्या छातीवर मस्त कोरलेला, सिंधुर्दुग बघायला विसरू नका. आपण शिवराय जिथे जन्माला आले, वाढले, स्वराज्य निर्माण केले त्या साक्षात शिवराज्यात शिवाला स्पर्श करत आहोत, ही भावनाच तुम्हाला मोहवून टाकते आणि आपली महाराष्ट्रीयन लोकांची हीच संपत्ती अनुभवा.

(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()