Konkan Tourism
Konkan Tourismesakal

Konkan Tourism : ..तर कोकणात मत्स्यपर्यटन नक्कीच यशस्वी होईल!

कोकण किनाऱ्यावरील मच्छीमारी व्यवसायात असणाऱ्या अनेकविध जनसमुदायांमध्ये, विविध प्रकारच्या मासेमारीच्या पद्धती अवलंबल्या जातात.
Published on
Summary

मच्छीमारांची अनोखी जीवनशैली लोककला, सण-उत्सव, लग्नसमारंभ यामधून व्यक्त होत असते.

-राजीव लिमये कर्ले, रत्नागिरी

कोकण किनाऱ्यावरील (Konkan Tourism) मच्छीमारी व्यवसायातील जीवनानुभवांमध्ये पर्यटकांना (Tourists) कोकणाकडे खेचून आणण्याची प्रचंड क्षमता आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मच्छीमारी जीवनातील वैविध्याचा कल्पकतेने उपयोग करून व्यावसायिक पद्धतीने पर्यटकांना आकर्षित केल्याने मच्छीमार व्यवसायाला मत्स्यपर्यटनाद्वारे उत्पन्नाची उत्तम जोड देता येईल; परंतु अजूनही या प्रकारे मत्स्यपर्यटनाची कल्पना कोणी फारशी गांभीर्याने उपयोगात आणलेली दिसत नाही. ती कशी आणता येईल, याची चर्चा येथे केली आहे.

कोकण किनाऱ्यावरील मच्छीमारी व्यवसायात असणाऱ्या अनेकविध जनसमुदायांमध्ये, विविध प्रकारच्या मासेमारीच्या पद्धती अवलंबल्या जातात. या विविध जनसमुदायांच्या विशिष्ट खाद्यसंस्कृती आहेत. विविध प्रकारच्या चालीरिती, वेगवेगळ्या विवाहपद्धती आहेत. कोकणी पर्यटनवृद्धीत मत्स्यपर्यटनात अनेक संधी आहेत. निसर्गावर हा व्यवसाय अवलंबून असल्यामुळे उत्पन्नामध्ये खूप चढ-उतार असतात. पर्यटनाची जोड मत्स्य व्यवसायाला (Fisheries) देण्यामुळे शाश्वत मच्छीमारीची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी गतीने चालना मिळेल. या कल्पनेला महेश नाटेकर, वासुदेव वाघे, राजन मोरे यांसारख्या मच्छीमारी व्यवसायाशी संबंधित लोकांसोबत बोलले असता दुजोरा मिळतो.

Konkan Tourism
Devbagh Beach : 'लोक गोव्यात जातात आणि पी पी पितात; पण तेथून थोड्या अंतरावर असलेला निसर्ग प्यायला विसरतात!'

मुंबईनजीकच्या वर्सोवा येथील मच्छीमार समाज पर्यटन व्यवसायामध्ये कार्यरत झाल्याचे उदाहरण डॉ. स्वप्नजा मोहिते देतात. वर्सोव्यातील महादेव कोळी समाजाच्या मच्छीमार समाजाचे इन्स्टाग्राम पेजही आहे. अशा प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्सोव्यातील मच्छीमार समाजाचे होमस्टे, त्यांचे विवाह समारंभ, उत्सव अशा इव्हेंट्समध्ये मुंबईचे पर्यटक सशुल्क सहभागी होतात. याकडे डॉ. मोहितेंनी लक्ष वेधले. वर्सोव्याच्या मच्छीमारी समाजाने त्यांच्या जीवनपद्धतीच्या अनुभवामध्ये पर्यटकांना सामील करून अर्थार्जनाचे साधन निर्माण केले आहे. आपल्याकडेही अनेक समुद्रकाठची, खाड्यांच्या किनाऱ्यावरील सुंदर गावे मस्त्य व्यवसायाबरोबर, जैवविविधतेने समृद्ध आहेत. या मच्छीमारांची खाद्यसंस्कृतीदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे.

Konkan Tourism
Health News : निसर्गानं दाताची निर्मिती केलीये, दात दागिना मानावा का?

केरळमधील समुद्रकाठावर लावली जाणारी मोठी जाळी पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. त्यातून पकडले जाणारे ताजे मासे तेथे असलेल्या फूडस्टॉलवर पर्यटकांसमोरच तयार करून दिले जातात. दापोलीतील हर्णै गावचा घाऊक मत्स्यबाजार प्रसिद्ध आहे. समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या बोटी, तेथील अगदी काठापर्यंत जाणाऱ्या बैलगाड्या मग किनाऱ्यावर लगेच होणारी माशांची लिलावाने होणारी विक्री पर्यटकांना आकर्षित करते. हर्णै बंदरामध्ये अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता आहे. अशा अनेक मच्छीमार बंदरांच्या आधाराने महिला बचतगटांनी, वैयक्तीक मच्छीमारांनी स्टॉल लावून ताज्या माशांच्या विविध खाद्यपदार्थांची लज्जत चाखायला पर्यटकांची नक्कीच झुंबड उडेल. या गावांमधील मासे बनवण्याच्या पारंपरिक पद्धती, त्यांच्या चवी देशावरच्या मत्स्यप्रेमींना वारंवार येण्यास प्रवृत्त करतील.

जगभरातील, देशभरातील पर्यटकांचे लक्ष वेधण्यासाठी या सगळ्या वेगळेपणाचा सोशल मीडियामधून यु ट्युबवरून डॉक्युमेंटरीद्वारे प्रसार करायला पाहिजे. स्थानिक मच्छीमारी समाजाचा जवळून परिचय असणाऱ्या डॉ. सुहास वासावे यांच्या मते पर्यटकांना मासेमारी पद्धतींबद्दल औत्सुक्य असते. स्थानिक मच्छीमारी पद्धती वैविध्यपूर्ण असून पर्ससीन, ट्रॉलर, गिलनेट, रापण, डोलनेट, पाग अशा अनेक प्रकारांचा पर्यटकांना परिचय देता येईल. पर्यटकांना बोटींवरून घेऊन जायचे आणि विशिष्ट मासेमारीबद्दल संपूर्ण शास्त्रीय माहिती द्यायची. त्याचबरोबर पर्यटकाना जाळ्यांचे निरनिराळे प्रकार, बोटीवर असणारी फिश फाइंडरसारखी उपकरणे दाखवायची.

Konkan Tourism
'आई-वडिलांची दहशत एवढी वाटली की, ती घराची सुरक्षित चौकट ओलांडून बिनभरवश्याच्या ठिकाणी निघून गेली?'

मच्छीमारांच्या बोटीवरील दिनक्रमासंबंधी माहिती द्यायची. माशांची साठवणूक, माशांच्या विविध जाती, गुणवैशिष्ट्ये, चव, बाजारातील मागणी, दर आणि पोषणमूल्ये यांचीही माहिती द्यायची. अशा प्रकारचे पर्यटन पर्यटकांना अनुभव समृद्ध करेल. अनुभवजन्य पर्यटनाचे ते उत्तम उदाहरण ठरेल. समुद्री खाड्यातील छोट्या-मोठ्या गटांसाठी आयोजित सफरी, कुटुंब, कपल्ससाठी स्वतंत्र सफरी आयोजित कराव्या. मच्छीमार जमातीतील अनुभवी लोक स्वतः या सफरींमध्ये वैविध्यपूर्ण खाजण, पक्षी, मासे, जैवविविधता यांबाबत माहिती देतील. दैनंदिन जीवनात मच्छीमारी करणाऱ्या लोकांकडून असे प्रत्यक्षदर्शी अनुभव ऐकायला मिळाल्यामुळे अशा सफरी प्रचंड लोकप्रिय ठरतील. यासाठी मच्छीमार कुटुंबातील तरुणांनी गाईड्सचे काम करण्याने घराजवळच रोजगारही उपलब्ध होईल. गळ टाकून मासे पकडण्याचा छंद असणाऱ्यांना त्यासाठी योग्य जागांच्या ठिकाणी त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करता येतील.

ताजे पकडलेले मासे पर्यटकांच्या आवडीप्रमाणे बनवून द्यायचे. माशांची उकड, कोळंबीची उकड, माकूळ उकड असे नावीन्यपूर्ण आणि पारंपरिक पदार्थ बोटीवरच पर्यटकांना तयार करून खिलवले तर पर्यटक आनंदी होतील. नेहमीची मासेमारी झाल्यावर किफायतशीर जोडधंदा म्हणून नौकांचा, छोट्या ट्रॉलर्सचा अशा सफरींसाठी उपयोग केल्यास वेगळी गुंतवणूक करायची गरज नाही. मच्छीमार गावे पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करतील. होमस्टे पद्धतीने पर्यटकांची मच्छीमारांच्या पारंपरिक घरात राहण्याची व्यवस्था करावी. दाभोळ, जयगड भाट्ये खाडीसारख्या खोल खाड्यांमध्ये हाऊस बोटींनाही चांगला वाव आहे.

मासे पकडण्यापासून ते त्यांचे पुढील प्रोसेसिंग वाळवणे, खारवणे अशा प्रक्रिया डॉक्युमेंटरी फिल्मच्या माध्यमांतून दाखवता येतील. खाजणात प्रसंगी भरतीच्या पाण्यात भिजत राहून मच्छीमार महिला कष्टाने कालवे, मुळ्ये कशा काढतात याचा अनुभव पर्यटकांना देता येईल. मच्छीमार महिलांकडे त्यांच्या कष्टपूर्वक जीवनपद्धतीकडे लक्षही वेधले जाईल.

Konkan Tourism
Konkan News : आयुष्यभर लोकांच्या डोक्यावर कौलाचं छत्र धरणारा डाह्याभाई 'बेसहारा' होऊन निघून गेला!

मच्छीमारांची अनोखी जीवनशैली लोककला, सण-उत्सव, लग्नसमारंभ यामधून व्यक्त होत असते. अभिनय आणि नाट्यक्षेत्रातील जाणकारांकडून प्रशिक्षण घेऊन नियोजनपूर्वक पर्यटकांना यामध्ये सामील करता येईल. शंखशिंपल्यापासून बनवण्यात येणारी आभूषणे आणि शोभेच्या वस्तूंची विक्री करून उत्पन्नाला जोड देता येईल. मोठ्या शहरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मच्छीमार महोत्सवाचे आयोजन आवश्यक आहे. यासाठी मच्छीमार गावांतील ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यायला हवी. मत्स्यव्यवसाय खात्यानेही मत्स्यपर्यटनाचा अंतर्भाव त्यांच्या कार्यक्रमात करावा. सर्वांच्या एकत्रित प्रयत्न आणि इच्छाशक्तीतून कोकणात मत्स्यपर्यटन नक्कीच यशस्वी होईल!

(लेखक पर्यटनक्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.