Sahyadri Tiger Project : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने पर्यटन व्यवसायात संधी; सातारा, सांगली, कोल्हापूरसह रत्नागिरीत विस्तारला प्रकल्प
जंगलातील मातीच्या कच्च्या रस्त्यांविषयी जंगल अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती फार रोचक आहे.
-राजीव लिमये, कर्ले रत्नागिरी
नजीकच्या भविष्यात निर्माण होत असलेल्या पर्यटनामधील संधींमध्ये सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाचे (Sahyadri Tiger Project) स्थान महत्त्वाचे आहे. हा प्रकल्प सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांचे हद्दींमध्ये विस्तारला आहे. सह्याद्रीच्या कड्यांनी प्रकल्पाची पश्चिम दिशा सुरक्षित केली असून, पूर्वेकडे पुणे-बंगलोर हायवे, उत्तरेला आंबेनळी, तर दक्षिणेला आंबाघाट (Amba Ghat) आहे, कोयना बॅकवॉटर, चांदोली धरणाचे नैसर्गिक संरक्षण या व्याघ्रप्रकल्पाला लाभले आहे. जगप्रसिद्ध कास पठार (Kaas Plateau) यामध्येच समाविष्ट आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे (Chandoli National Park) गाभा म्हणजे कोअर क्षेत्र ३७५ चौरस कि. मी., तर कोयना अभयारण्याचे ३५० चौ. कि. मी. असे एकूण क्षेत्र सुमारे ७२५ चौ. कि. मी. इतके विस्तृत आहे याशिवाय या मुख्य गाभा क्षेत्राला धक्का लागू नये म्हणून ९०० चौ. कि. मी. एवढे बफर क्षेत्र संरक्षित म्हणून घोषित केले आहे. बफर क्षेत्रात टुरिझम झोन समाविष्ट आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी १९८५ ला सुरू झालेली स्थलांतराची प्रक्रिया जवळपास ९० टक्के पूर्ण झाली आहे. देवरूख-संगमेश्वर तालुक्यातील काही भाग या प्रकल्पात समाविष्ट आहे. प्रकल्पाचे क्षेत्र पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील अगदी कर्नाटक केरळचे जंगल क्षेत्रापर्यंत सलगरित्या जोडलेले आहे. प्रकल्पाचे घनदाट जंगल अर्धसदाहरित प्रकारचे असून, जैवविविधतेने समृद्ध आहे. त्यामध्ये मोठे वृक्ष, विपुल वनस्पती, गवते, फुलपाखरे पक्षी आहेत. विपुल पाऊस पडणाऱ्या या क्षेत्रात पाथरपुंज या ठिकाणी वर्षभरात चेरापुंजीइतका सुमारे ४ ते ५ हजार मिमीएवढा पाऊस पडतो.
व्याघ्रप्रकल्प क्षेत्रात चाळीसपेक्षाही अधिक प्राणी प्रजाती, तर २६० प्रकारचे पक्षी, २४२ प्रकारची फुलपाखरे आहेत. वनक्षेत्रात २२ प्रकारचे उभयचर, तर ४४ प्रकारचे सरपटणारे प्राणी आहेत. १४५० प्रकारच्या वनस्पती, तर ३७५ औषधी वनस्पती आढळतात. प्रामुख्याने अंजनी, बाभूळ, हिरडा, गेळा, कुंभा, नरक्या, वेत, धूप ओंब आदी वृक्ष आढळतात. नरक्या ही कॅन्सरवर औषधासाठी लागणारी वनस्पती इथेच आढळते. प्राणीजीवनही समृद्ध असून बिबट्या, रानमंजर, रानकुत्रे, ठिपकेवाले मांजर, बिबळ्यामांजर आदी शिकारी, तर तृणभक्षी सांबर, गवे, भेकर, रानडुक्कर, पिसोरी, चौशिंगा, हनुमान लन्गूर, लालतोंडी माकडे आदींचा अधिवास आहे. शेकरू, अस्वल, खवले मांजर, साळींदर, मुंगुसाचे प्रकार ही झाली इतर आकर्षणे, साहजिकच व्याघ्रराजाच्या कायम वास्तव्यासाठी अनुकूलता उपलब्ध आहे.
सह्याद्री टायगर प्रोजेक्ट २०११ मध्येच जाहीर झाला होता. आता या क्षेत्रात वनराज वाघाचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे; मात्र तो पाहुण्यासारखा येतो आहे, असे संबंधितांचे निरीक्षण सांगते. स्पॉटेड हरणांची संख्या वाढवण्यासाठी ८० हेक्टर क्षेत्रावर प्रजनन केंद्र उभारले आहे. त्यामुळे वाघांसाठी खाद्य उपलब्धता वाढणार आहे. नैसर्गिकरित्या वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे वास्तव्यासाठी स्थलांतर करण्याची मोठी शक्यता आहे. त्याशिवाय ताडोबा व्याघ्रप्रकल्पात व्याघ्रसंख्या वाढत असल्याने तेथे अतिरिक्त असणारे वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात शास्त्रोक्त पद्धतीने स्थलांतरित करण्याच्या प्रकल्पाचे नियोजन केले जात आहे.
सुरुवातीस मर्यादित बंदिस्त क्षेत्रात वाघांना ठेवले जाईल. तेथे रूळल्यावर रेडिओ कॉलर लावून कायम अधिवासासाठी मोकळे केले जाईल, असा सर्वसाधारण आराखडा आहे. अशा प्रकारे व्याघ्र प्रकल्पाची प्रक्रिया पूर्णत्वाला पोहोचल्याने एकंदरच या क्षेत्रातील प्राणीजीवनाला नैसर्गिक समतोल प्राप्त होईल, असे विवेचन नीलेश बापट करतात. शाश्वत विकासासाठी, निसर्ग समतोल जैवविविधता टिकण्यासाठी अशा घनदाट जंगलांची गरज आहे. गवे, बिबट्यांच्या मानवी वस्तीत होणाऱ्या उपद्रवातून मानव व प्राणी संघर्ष तीव्र होत आहे. वनांमध्ये वाघांच्या पर्याप्त संख्येतील उपस्थितीमुळे, अस्तित्वामुळे, गव्यांच्या, बिबट्यांच्या, तृणभक्षींच्या, रानडुकरांच्या संख्येत होणारी अतिरिक्त वाढ थांबून त्यावर नैसर्गिक नियंत्रण येणार आहे. या सर्व बाबींमुळे सम्यक दृष्टिकोनातून सह्याद्री व्याघ्रप्रल्पाचे खुल्या मनाने स्वागत होईल, अशी खात्री वाटते.
या प्रकल्पामुळे विविध संधी प्रकल्पातील इको टुरिझम क्षेत्रात उपलब्ध होत आहेत. २८ जानेवारी २०२४ ला कोयना क्षेत्रात पर्यटकांसाठी सशुल्क जीप सफारी सुविधा सुरू झाली. त्यामध्ये मी सहभागी झालो. या प्रकारच्या खासगी जीप सफारी पर्यटन व्यावसायिकांना सुरू करता याव्यात यासाठी वनखात्याची जीप सफारी पथदर्शी प्रोजेक्ट आहे. अशा खासगी जीप जंगल सफारी सुरू करण्याचा व्याघ्र प्रकल्पाच्या नजीकच्या स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी जरूर अभ्यास करावा. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणी देवरूख भाग व्याघ्रप्रकल्पाला लागून आहेत. या वनक्षेत्राचे बफर झोनमध्ये वासोटा, जंगली जयगड, भैरवगड, प्रचितगड, दातेगड-बागेश्वर असे वनदुर्ग आहेत. येथे जंगल ट्रेल्स आयोजित करता येतात. वनखाते तरुणांसाठी गाईड प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत असते. त्याचा लाभ स्थानिक तरुणांनी जरूर घ्यावा.
अशा कार्यक्रमातून प्रशिक्षण घेऊन स्थानिक तरुण हौशी गिर्यारोहकांसाठी तसेच पर्यटकांसाठी व्यावसायिक सेवा देऊ शकतील. येणाऱ्या पर्यटकांना लागणारे खाणे, पाणी, जेवण, वाहने पुरवण्याचा किफायतशीर व्यवसाय या व्याघ्र प्रकल्पामुळे निर्माण होईल. वनक्षेत्रातील पक्षीजीवनाच्या वैविध्यामुळे हौशी पक्षी निरीक्षक आकर्षित होत आहेत. आम्हांला फुलपाखरांचे थवेच्या थवे वनक्षेत्रात दिसले. वनस्पतीजीवनाचा गाढा अभ्यास असलेले रोझ सोसायटीचे अध्यक्ष मुळे जंगलातील सफारीसाठी आवाज न करणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेइकल्सची कल्पना सुचवतात.
जंगलातील मातीच्या कच्च्या रस्त्यांविषयी जंगल अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती फार रोचक आहे. धुळीच्या रस्त्याने जाणे प्राणी पसंत करतात शिवाय प्राण्यांच्या पाउलखुणा मातीच्या रस्त्यावर उमटल्याने माग काढणे सोपे होत असते. पर्यटकांसाठी नजीकच्या गावातून हॉटेल्स होमस्टेजचा व्यवसाय यशस्वी होईल. फोटोग्राफी स्मरणवस्तू विक्री आदी अनेक तद्नुषंगिक व्यवसायांच्या संधी निर्माण होतील. कोयना धरण क्षेत्रात नुकताच वॉटर टुरिझम प्रोजेक्ट घोषित झाला आहे. त्यातही व्यवसायाच्या संधी आहेतच. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातून अनेकविध संधी निर्माण होणार आहेत.
(लेखक पर्यटन क्षेत्राचे अभ्यासक आहेत)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.