Shantikaka Story
Shantikaka Storyesakal

Konkan : 'दोनच वाक्यात शांतीकाकानं मला त्याचं दुःख सांगितलं आणि धोतराच्या सोग्यानं नाक-डोळे पुसले'

मारवाडी रक्त अंगात भिनलेल्या शांतीकाकाने सचोटी आणि पक्के व्यापारी धोरण याची योग्य सांगड घालत ती पेढी नावारूपास आणली.
Published on
Summary

'मी बँकेचा नोकर होतो आणि मी काही शांतीकाकाचा नोकर नव्हतो. तरीही मी शांतीकाकाची ही सगळी कामे प्रेमाने करायचो.'

-राजा बर्वे, चिपळूण

एकदा खातेउतारा घेऊन मी शांतीकाकाकडे गेलो. शांतीकाकाचे शिक्षण (Education) कमी असले तरी तो जात्या हुशार.. खात्याचा उतारा पाहिला आणि काकाने एकदम आकांडतांडव सुरू केलं. मला काय झालं हेच कळेना. तिसरीकडेच रागाने बघत, ‘आमचा खाता तुमी लोक सीबीआयला कळवते काय रे राजाभाऊ?..आणि आम्हाला गोत्यात आणते काय?.. हे इथे सीबीआय (CBI) काय लिवले आहे ते आधी सांग नाहीतर उद्याला माझे सगळे खाते बंद करून सगळा पैसा आणून दे.’ शांतीकाका वेगळ्याच अनोळखी स्वरात माझ्याशी बोलू लागला.

आता मी तो उतारा घेऊन बघू लागलो. अचानक मला हसू आवरेना. त्याचं झालं होतं असं की, त्या वेळी हाताने उतारा लिहिताना आणि शिल्लक काढताना आणि लिहिताना चूक झाली होती म्हणून क्लार्कने सी/बी म्हणजे करेक्ट बॅलेन्स् असं लिहून बरोबर रक्कम खाली लिहिली होती आणि या सी/बी ला शांतिकाका ‘सीबीआय’ समजून बसला होता; पण तरीही शांतीकाकाच्या त्या अष्टावधानी स्वभाव आणि हुशारीला मी मनोमन मानलं होतं.

Shantikaka Story
Depression in Children Symptoms : लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतंय नैराश्य; काय आहेत कारणे?

वीसेक वर्षांपूर्वीपर्यंत कोकणचे (Konkan) समाजजीवन आणि अर्थचक्र हे एका विशिष्ट परिघात फिरत होतं. लोकांच्या काळजात फार मोठी भव्यदिव्य स्वप्ने नव्हती. कोकणात होणारी पिके, शेतीभाती, छोटे-मोठे परंपरागत उद्योगधंदे, भिक्षुकी, शिक्षकी पेशा, सरकारी नोकऱ्या (Government Jobs) इतकंच कोकण मर्यादित होतं. स्वास्थ्य, समाधान, शांतता आणि स्थैर्य होतं. कोकणातल्या मर्यादित जगात जगणारी माणसे सुशेगात जगत होती. आमचा शांतीकाका आणि त्याचं घराणेसुद्धा असेच सुशेगात जगत होतं.

शांतीकाका (Shantikaka) ही शेठ घराण्याची पाचवी पिढी. कोकणात नांदलेली. केव्हातरी शांतीकाकाचा पूर्वज, भैरवमल काठेवाडातून कोणाचा तरी हात धरून कोकणात आला. इथल्या निसर्ग, माणसे आणि महत्वाचं म्हणजे सुपारीने त्याला भुरळ घातली. दारोदार सुपारी खरेदी करून, सोलून, वाळवून आणि प्रतवारी करून मुंबईच्या दलालाकडे पाठवणे, हा भैरवमलचा व्यवसाय पुढच्या पाच पिढ्यांनी भरभराटीस आणला. शांतीकाकाच्या गोड स्वभावाने सुपारीचा हा तुरट व्यवसाय अजून वाढत गेला. मारवाडी रक्त अंगात भिनलेल्या शांतीकाकाने सचोटी आणि पक्के व्यापारी धोरण याची योग्य सांगड घालत ती पेढी नावारूपास आणली.

छोट्याशा त्या गावात शांतीकाकाकडे कधीही गेलं तरी दोन-चार माणसे पेढीवर बसलेली दिसायचीच. कोणी उचल न्यायला, कोणी सुपारीची पट्टी किती लागलीय ते बघायला तर कोणी हिशोबाची रूजवात घ्यायला आलेला असायचा. गिऱ्हाईक बघून शांतीकाका बायकोला, मीणाबाईला चहा द्यायची खूण करायचा. सगळं कसं नीटनेटके आणि छान. मीणाबाई पण अगदी नीटनेटकी असायची.. पेढीतून घरात जाणाऱ्या पायरीवर ती कायम बसलेली असायची.

Shantikaka Story
Konkan Tourism : हॉलिवूड, थायलंड, पट्टाया इथला समुद्र कोकणी माणसासाठी निसर्गानं 'या' गावाला दिलाय!

शांतीकाकाची पेढी मला कायम आवडायची. माझ्या बँकेत शांतीकाकाचे त्या काळातले मोठे खाते. मुळजी विरजी आणि कंपनीकडून त्या काळी शांतीकाकाला डिमांड ड्राफ्टने दर आठवड्याला पैसे यायचे. शांतीकाका गोरापान, किंचित स्थूल, विरळ शुभ्र केस नीट मागे वळवलेले, गळ्यात सोन्याचा जाड गोफ, प्रत्येक हातातील तीन बोटांमध्ये कसल्या कसल्या खड्ड्यांच्या टपोऱ्या अंगठ्या, कपाळाला उभे दुबोटी गंध, डाव्या दंडात वेटोळे घातलेला पंचधातूचा नागोबा, सतत पानसुपारी, काथ आणि जर्दा घातलेले पान खाल्ल्याने झालेले लालचुटुक ओठ, जीवणीच्या दोन्ही टोकांना चिकटलेले बारीक सुपारीचे कण, तुंदीलतनू अर्धी उघडी अशी अंगात बंडी, तिचा पोटखिसा नोटांनी भरलेला, नेसुला धोतर असा शांतीकाका पेढीवर अगदी शोभून दिसायचा.

शांतीकाका, विड्या आणि पान सुपारी ही व्यसने किती वर्षे करताय?’.. माझा प्रश्न ऐकून मग शांतीकाका मिश्कील हसून सांगायचा.. ‘अरे राजाभाऊ, ते काय विचारू नको, लहानपणी सुपारी खरेदीला मी आणि धाकटा मोतीलाल आम्ही दोघे बैलगाडी घेऊन जायचो. दिवसभर गावागावांत जाऊन मापे करून सुपारी भरायची. कंबर वाकून वाकून मोडायची. मग सारखा चहा आणि वर विड्या हा उद्योग पंधरा-सोळाव्या वर्षांपासून सुरू.

Shantikaka Story
Sahyadri Tiger Project : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने पर्यटन व्यवसायात संधी; सातारा, सांगली, कोल्हापूरसह रत्नागिरीत विस्तारला प्रकल्प

एकदा शांतीकाकाला विचारलं, ‘काका, तुमचा मुलगा, वसंता इथे का नाही राहात? मेवाडला जायच्याऐवजी इथे राहिला असता तर तुम्हाला मदत झाली असती ना? ‘राजाभाऊ, एक पेढी, एक मारवाडी अशी आमच्यात म्हण आहे आणि आता पहिले दिवस राहिले नाहीत. आता इथे मुतात माशा मारून काय मिळणार? पूर्वीचे दिवस गेले आता..आणि सांभाळायचं म्हणशील तर आमच्या माहेश्वरी समाजात एक म्हण आहे. धंदा करायचा तर चार अक्षरे लक्षात ठेव, ‘लिख दे ले लिख’, मला काही उलगडा झाला नाही. ‘राजाभाऊ, गल्ला उघडला की, चोपडी वर आधी काढायची. कोणाला पैसा द्यायचा असेल तर आधी चोपडीवर लिहायचा. मग गल्ल्यातून काढून द्यायचा आणि पैसा आला की, आधी मोजून गल्ल्यात टाकायचा आणि नंतर चोपडीवर लिहायचा. म्हणून लिख दे, ले लिख ही म्हण. हे आणि अशी अनेक बोधमृते मला वेळोवेळी शांतीकाकाने पाजली आहेत.’

Shantikaka Story
ग्राहक मिळवण्याची किंमत उद्योजकांनी लक्षात घ्यायला हवी, अन्यथा नुकसान होण्याची भीती!

खरंतर, मी बँकेचा नोकर होतो आणि मी काही शांतीकाकाचा नोकर नव्हतो. तरीही मी शांतीकाकाची ही सगळी कामे प्रेमाने करायचो. मला त्याचे घर, तो, त्याची पेढी आणि त्याच्या अनुभव शिकवणाऱ्या गप्पा आवडायच्या.. माझी बदली झाली आणि मी शांतीकाकाला भेटायला गेलो. बदली झाल्याचं सांगितलं. शांतीकाका पेढीवर आणि मीणाबाई पायरीवर बसली होती. पायरीवरून उठून ती चहा टाकायला आत गेली..शांतीकाकाने एकदा माझ्याकडे पाहिलं आणि ‘का रे, चालला तू राजाभाऊ?, तू होतास तर मला वसंताची आठवण कमी यायची.’ दोनच वाक्यात शांतीकाकाने मला त्याचं दुःख सांगितलं आणि धोतराच्या सोग्याने नाक डोळे पुसले. आता या गोष्टीला खूप वर्षे उलटून गेली. शांतीकाका असाच निघून गेला. मीणाबाई वसंताकडे, मुलाकडे निघून गेली. उरल्या त्या आठवणी.

(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.