Konkan : लाय् लाय् लाय् लाय् लायेकरनी.. गाण्याचा अर्थ समजला अन् कोळीवाडा नव्यानं समजायला लागला!
समुद्रावरून येणारा खारा वारा, मासळीचा वास घेऊन येतो आणि बंदराकडून येणारा रस्ता माशांच्या टोपल्यांमधून गळणाऱ्या पाण्यानं भिजून जातो.
-डॉ. स्वप्नजा मोहिते, रत्नागिरी
पारुमावशीचं छोटंसं तरीही नेटकं घर, समोर खुंटीला टांगलेली जाळी, खाली रांगेत मांडून ठेवलेल्या भल्यामोठ्या टोपल्या. मी हळूच डोकावले तिच्या घरात. जेमतेम दोन खोल्या .... बाहेरच्या बैठकीच्या खोलीत गाद्यांची रास रचलेला एक पलंग, दोन चार लाकडी खुर्च्या आणि मागल्या भिंतीवर एकविरा देवी (Ekvira Devi), हिंगलाय देवी आणि कुठल्या कुठल्या देवांच्या, काही देवाघरी गेलेल्या माणसांच्या, हार घातलेल्या जुनाट तसबिरी.
घरातल्या सुना-मुलींनी केलेल्या चॉकलेटच्या (Chocolate) चांदीच्या, मण्यांच्या कलाकुसरीतून केलेल्या काही कलाकृतीही! माझं लक्ष मधल्या दारातून दिसणाऱ्या स्वयंपाकघराकडे गेलं. अगदी सोन्याची वाटावी अशी लखलखती पितळी लहान मोठी भांडी, पराती आणि त्यांच्या वर, शिंकाळ्यात अगदी शिस्तीत लावलेले तांब्या आणि पेले! घरी एव्हढी पितळी भांडी हे वैशिष्ट्य मनात बसलं.
गंगा जमुना दोघ्या बयनी गो पानी झुलझुल व्हाय ....
दर्या किनारी एक बंगला गो पानी जाय जुई जाय .....
रेडिओवर अकरा वाजताच्या कार्यक्रमात हे गीत वाजायला लागलं की निघायचं … हा माझा आणि माझ्या बरोबरीच्या सगळ्या मैत्रिणींचा रोजचा शिरस्ता. रस्ता चालतानाही तेच गाणं डोक्यात असायचं. दर्या किनारी असलेल्या त्या बंगल्याचं जाम अप्रूप वाटायचं तेव्हा मला. कसा आणि कोणी बांधला असेल हा बंगला? कोण राहत असेल त्यात?
माशानं मारलाय दनका गो पानी तलाला जाय ....
कोल्याची पोर एक सोबेची तया उबीच हाय ....
हे ऐकताना मनात पक्क बसायचं की अरे हो... त्या कोळ्याची पोर तिथे राहतेय आणि कसली भारी पोर आहे ही... माशाने दणका मारल्याने पाणी पार तळाला पोहोचलंय आणि तरी ही तिथे उभीच आहे. माझ्या डोळ्यासमोर ते सगळं चित्र त्यातल्या सगळ्या डिटेल्स सकट उभं राहायचं. अगदी तिच्या त्या पैठणी साडी आणि गजनीच्या चोळीसकट! हे डिटेल्स येव्हढे फिट्ट होते ना की गॅदरिंगला हाच कोळी डान्स बसवताना, त्या कोळी स्त्रियांची ड्रेपरी मीच ठरवणार हे अगदी ठरलेलंच. पायाच्या अंगठ्यापर्यंतची नाहीतर गुढग्यापर्यंतची साडी, दंडापर्यंतची चोळी, तिच्या अंबाड्याची स्टाईल, त्यावरचा भरगच्चं गजरा, गळ्यात गाठलं किंवा गंठण!
नेसली पैठण सारी गो पदर वाऱ्यानं जाय ..
अंगानं चोली गजनीची पोरी ठुमकत जाय .....
यातली पैठणी समजायची पण ही गजनीची चोळी कशी हे विचारायला मी तेव्हा जवळच्या कोळीवाड्यात पोहोचले होते आणि एक नवी दुनिया माझ्या समोर खुली झाली होती. कोळीवाड्यात बहुतेक वेगळीच वाटली असणार त्यांना. ‘ पोर आलिया इचारायला .... या बया .... लई झ्याक दिसतीस गो पोरी .... चाय पिशील का वाईच माज्या हातची?’ कोळीवाड्यातल्या त्या छोट्याशा घरासमोर उभी राहून, मी आता कुठे जायचं या विचारात. समोर उभ्या असलेल्या पारू मावशीशी माझा हा पहिला परिचय.
कोळीवाड्यातला तो छोटासा रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला गिचमिडीत असलेली ती घरं, मधूनच वाहणारं गटार आणि मुक्तपणे फिरणारी कुत्री - मांजरं, आजूबाजूने धावणारी वाहनं, हातगाड्या आणि त्यावरून नेल्या जाणाऱ्या मासळीच्या टोपल्या, त्यातूनच वाट काढत चालणारी माणसं आणि तिथेच रस्त्याच्या कडेला बसलेला मासळी बाजार. माझ्यासाठी हे एक वेगळंच जग होत. या साऱ्याकडे कुतूहलानं बघणारी मी आणि माझ्याकडे तेवढ्याच कुतूहलानं बघणारी माणसं ! मासळीने भरलेल्या टोपल्या सहजपणे डोक्यावरून नेणाऱ्या त्या कोळणी न्याहाळताना मला जाणवली त्यांची लयबद्ध पावलं! डोक्यावरचं चुंबळ, त्यावर माशाचं पाणी अंगावर पडू नये म्हणून टोपलीखाली ठेवलेली टोपलीपेक्षा मोठी असलेली थाळी, त्यावर ठेवलेली ती टोपली आणि हे वजन सांभाळत, त्यांचं ते एका लयीत चालणं.
अंगाला चपखल बसलेली बारा वार साडी आणि तरीही त्यात कुठेही अंग प्रदर्शन होणार नाही याची घेतलेली काळजी .... ग्रेस म्हणजे काय हे त्यादिवशी डोक्यात बसलं. त्यात ते अगदी लक्षात येतील असे ठसठशीत दागिने. पाटल्या, तोडे, लकपक हार, डोरलं, कंठी आणि कानातले काप किंवा गाठी.... कानाच्या पाळीचे छिद्र कितीही मोठं झालं तरी चालेल... पण ती जाड आणि जड गाठी पाहिजेच. बापरे, किती हे दागिने?
पारुमावशीच्या घरातल्या छोट्याशा देव्हाऱ्यात लावलेलं निरंजन मंदपणे तेवत होतं आणि तिनं लावलेल्या उदबत्तीचा गंध घरभर पसरला होता. मला तिच्या पडवीत चहा पिताना पाहून आजूबाजूच्या आणखी सात-आठजणी जमा झाल्या. तिथे आणि सुरू झाली माझी शाळा. त्यातील अभ्यास कोळी स्त्रियांच्या साड्यांचा .... दागिन्यांचा आणि रीती रिवाजांचाही! साडीचा तो धोतरासारखा पायापर्यंत येणारा सोगा म्हणजे शेगली. पारुमावशी सांगत होती. लांब सोग्याच्या येसावकरणी, पोरी येसावकारणी. लाय् लाय् लाय् लाय् लायेकरनी..काल्या टिकल्या दांडेकरनी..... येणीला गोंडा मालवणकरनी पोरी मालवणकरनी .... लाय् लाय् लाय् लाय् लायेकरनी.... गाण्याचा अर्थ आता समजायला लागला होता. कोळीवाडा आता नव्यानं समजायला लागला होता.
समुद्रावरून येणारा खारा वारा, मासळीचा वास घेऊन येतो आणि बंदराकडून येणारा रस्ता माशांच्या टोपल्यांमधून गळणाऱ्या पाण्यानं भिजून जातो. त्याच्या कुशीत वसतो कोळीवाडा. समुद्राच्या भरती ओहोटीवर चालतं इथलं जनजीवन. तिथल्या किनाऱ्यावर नसतो स्वप्नातला बंगला! मात्र किनाऱ्यावर कोळ्याची पोर, डोलीला म्हणजे मासेमारीसाठी गेलेल्या नाखवाची वाट पाहत उभी असते! आपल्या नाखवाबरोबर तेव्हढेच कष्ट उपसणारी ही पोर, नुसती सोबेची म्हणजे शोभेची नसते. आंब्याच्या डांगलीवर बसलाय मोर, नवरीचा बापूस कवठं चोर असं तेव्हा तिला करवल्या चिडवत असतात. करवल्या आंब्याच्या डांगल्या खुडत राहतात आणि तिला माहेरी जायला सांज होत असते. माहेरी जायची आस लागली असतानाच तिचा नाखवा येतो आणि करवल्या, नवऱ्यानं नवरीला पलविली म्हणत असतानाच, कोळ्याची पोर, नवा सारा नेसून दर्याच्या पुंजेला निघते.
(लेखिका ललित लेखन आणि चित्रकारही आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.