Konkan News
Konkan Newsesakal

Konkan News : चिपळूणचा शामू धनगर 'असा' बनला सह्याद्रीचा ढाण्या वाघ!

शामराव हे थोडं आदरार्थी नाव असलं तरी तो शामू धनगर (Dhangar) म्हणून चिपळूण पंचक्रोशीत अधिक प्रसिद्ध आहे.
Published on
Summary

आयुष्याभर उघड्या जंगलात प्रातर्विधी उरकणाऱ्या शामूचा असा नागरी सुविधांनी घात केला होता.

-राजा बर्वे, चिपळूण

शामराव आमच्या परशुरामला पहिल्यांदा कधी आला ते आठवत नाही. माझा जगमित्र रघुनाथ याच्याकडे तो येत असे. आणि माझा चिपळूणचा (Chiplun) निसर्गप्रेमी भाचा योगेश भागवत याचा तो अगदी घरातला माणूस. माळकरी असल्याने तो खूपवेळा आषाढी, कार्तिकी आणि माघी वारी म्हणून पंढरपूर (Pandharpur) ऐवजी परशुरामला येत असे आणि आला की एक दोन दिवस मुक्काम रघुनाथकडे असायचा. लोक आपोआप त्याच्या भोवती जमायचे आणि सह्याद्रीतल्या मालदेव आणि कंदाटी या अति घनदाट जंगलाने (Forest) वेढलेल्या कोयना खोऱ्यातल्या त्याच्या एकेक गप्पा कानात प्राण आणून ऐकायचे....!

शामराव हे थोडं आदरार्थी नाव असलं तरी तो शामू धनगर (Dhangar) म्हणून चिपळूण पंचक्रोशीत अधिक प्रसिद्ध आहे. चिपळूण मधल्या निसर्गप्रेमी तरुण मंडळींचा शामू दुर्गम अशा सह्याद्रीतल्या कोयना खोऱ्यातील वाटांचा वाटाड्या आहे. पार अगदी खोपी, साखर, बिरमणी, कांदोशी, चोरवणेपासून कुंभार्लीपर्यंत पसरलेल्या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात शामूचा संचार आहे. शामूची आता पंचाहत्तरी उलटून गेली असावी, तो आता थकलाय. परंतु आयुष्यभर निर्मळ हवा पाणी आणि जंगलात राहून देखील निर्व्यसनी आणि शुद्ध शाकाहारी असलेल्या शामूची ऊर्जा आजही भल्याभल्यांना लाजवेल अशी आहे.

Konkan News
Arthritis Symptoms : सांधेदुखी असेल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा मोठं नुकसान होईल!

शामूला मी प्रथम पाहिला तो वीस-पंचवीस वर्षांपूर्वी योगेश भागवतकडे. योगेश गेली अनेक वर्षे निसर्गमित्र, गिरिभ्रमण, लहान मुलांची उन्हाळी शिबिरे, वृक्ष संवर्धन यात खूप काम करतो. शामूवर योगेशने अनेक लेख, आकाशवाणीवर मुलाखती असे कार्यक्रम देखील केलेत. त्यामुळे शामूचा त्याच्याकडे नेहमीचा मुक्काम. माझी ओळख झाल्यावर मला समोर घेऊन बसला. पशु-पक्ष्यांचे आवाज काढून दाखवले आणि मी विचार करत असतानाच भरघोस पोस्त उकळले.

उंच, किडकिडीत आणि चपळ देहयष्टी, सावळा रंग, अशिक्षित असूनदेखील डोळ्यात दिसणारी व्यवहारी हुषारीची चमक, अनिर्बंध वाढलेल्या दाढीमिशा, गळ्यात तुळशीची माळ, अंगात जुने धोतर आणि बंडी. एकाकी निसर्गाच्या सान्निध्यात शामूचा संसारदेखील बहरलेला. पत्नी धोंडी आणि एकूण तेरा मुले, पैकी अकरा जिवंत. असंख्य गायी म्हशी, बकऱ्या, कोंबड्या असा शामूचा भरगच्च संसार. शामू उपजीविकेसाठी दूध, लोणी, तूप, मध, रानातल्या झाडपाल्याच्या औषधी मुळ्या, बिब्बे असं काही बाही विकत असे. त्याला औषधी वनस्पतींची खूप चांगली माहिती आहे. काही लोकांच्या मते तो धूर्त, लाचार आणि अवसानघातकी आहे. परंतु एकाकी, निर्जन, भयाण अरण्यात अकरा पोरं आणि बायको यांचा संसार ओढत जगताना या गोष्टी साहजिक आणि क्षम्य आणि दुर्लक्ष कराव्यात अशाच.

Konkan News
'लग्न मांडवातल्या हाय हॅलोमध्ये विराजमान होण्याचा मान मिळालेला दुसरा प्राणी म्हणजे बिबट्या!'

गेल्या २०-२५ वर्षांत शामूच्या उत्पन्नाचे अजून एक दालन खुले झाले. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरणाऱ्या निसर्गप्रेमींचा वाटाड्या म्हणून शामूची कमाई होते. आयुष्य जंगलात गेल्याने शामू अनेक बाबतीत अगदीच अनभिज्ञ होता. एकदा रघुनाथकडे आला असताना भल्या पहाटे कोणी जागे झाले नव्हते. तेव्हा हा जुन्या संडासात गेला, कडी लावली आणि कार्यक्रम आटोपल्यावर दरवाजा काही केल्या उघडेना. शामू दरवाजा बाहेरच्या बाजूला जोरजोरात ढकलत होता. थोडा वेळ झाल्यावर हा रांगडा गडी जरासा घाबरला आणि एकदाच जोर लावून दरवाजा ढकलला. जुना संडास आणि दरवाजा खालून सडलेला..

चौकटीसकट दरवाजा निखळून शामूच्या हातात आला. दरम्यान, जोरजोरात झालेला आवाज ऐकून जागा झालेला रघुनाथ पाहतो तर शामू चौकटी सकट दरवाजा हातात घेऊन उभा.. ‘शामू, काय रे हे, अरे आत उघडणारा दरवाजा ढकलून कधी उघडेल का तुझ्या बापजन्मात? आता असे कर, असाच दरवाजा प्रभाकर मेस्त्रीकडे जा आणि चौकट नीट करून आण’. आयुष्याभर उघड्या जंगलात प्रातर्विधी उरकणाऱ्या शामूचा असा नागरी सुविधांनी घात केला होता. एकदा कोरोनानंतर तो घरी आला होता. सहज गमतीत त्याला विचारलं ‘शामू, काय रे, तुमच्याकडे सगळे ठीक ना? कोरोना सह्याद्रीत नाही ना शिरला? हसून शामूने दिलेले उत्तर त्या काळात बिळात दडून बसलेल्यांसाठी चपराक ठरावी. शामू म्हणाला, ‘भाऊ, त्याचा काय हाय, मानसाच्या अंगातना रोज तांब्याभर घाम भाईर पडला की समदा आतला वंगाल भाईर पडतो.

Konkan News
'स्वराज्यासाठी उपयुक्त ठरू शकतील अशीच माणसं छत्रपती शिवरायांनी पारखून, आजमावून घेतली!'

तुम्ही नुसतं नाकाला फडकं लावून चिडीगप बसलव आनी तुमच्या कडवं तो येऊन बसला. मानसाला म्हेनत नूको वाईच काय झाला की खा गोल्या. जरा धीर धरून बॉडीला टाइम द्याल का न्हाई’. शामू त्याची बायको धोंडी आणि अकरा मुले. शामूचा जीवनपट हा असा भरगच्च आहे. कधी-कधी मी जेव्हा त्याच्याकडे पाहतो आणि त्याने आणि धोंडीने या जीवन प्रवासात काय काय सहन केलं असेल याचा विचार करतो तेव्हा नकळत आजच्या नव्या रेडिमेड पिढीने त्याच्याकडून बरंच शिकावं असं वाटत राहतं. शामू आता थकलाय, पंचाहत्तरीत आलाय. मालदेवमध्ये राहतो. एकेकाळी चित्त्याच्या वेगाने सह्याद्री पालथा घालणारा शामू आता संथावला असला तरी त्याने सोसलेला, अनुभवलेला सह्याद्री, त्याची औषधी वनस्पतींची जाण हे सारं कुठेतरी डॉक्यूमेन्ट फॉर्ममध्ये जतन करावं, असं मात्र वाटत राहतं...!

(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.