Gadgadi Dam : गडगडी धरण क्षेत्राजवळील 'इतक्या' गावांना टंचाईचा तडाखा; बंधाऱ्यातून झिरपत आहे पाणी
गडगडी धरणाची क्षमता १३.५२६ दशलक्ष घनमीटर आहे. पण, सद्यःस्थितीत ७.४४४ दशलक्ष घनमीटर एवढा जलसाठा केला जातो.
साखरपा : संगमेश्वर (Sangameshwar) तालुक्यातील गडगडी धरणाचा (Gadgadi Dam) पाणीप्रश्न गेले चाळीस ते पन्नास वर्षे प्रलंबित आहे. धरणाच्या दोन्ही कालव्यांचे काम अपूर्ण राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपते. यामुळे धरणा लगतच्या सुमारे दहा गावांत पाणीप्रश्न भेडसावत आहे. एप्रिल, मे या दोन महिन्यांत पाण्याच्या टंचाईची तीव्रता वाढणार आहे.
संगमेश्वर तालुक्यातील किंजळे, देवोळे, फणसवळे, कुळये वाशी गावांच्या दरम्यान गडगडी धरण बांधण्यात आले. १९७० च्या दशकात कै. भाई सावंत मंत्री असताना या धरणाची प्रथम संकल्पना मांडली गेली तर १९८० च्या दशकात कै. जगन्नाथराव जाधव मंत्री असताना मंजूरी मिळून कामाला सुरुवात झाली. या धरणाला रविंद्र माने पालकमंत्री असताना गती मिळाली. सुभाष बने, सदानंद चव्हाण आणि विद्यमान आमदार शेखर निकम (Shekhar Nikam) यांच्या काळातही काम पुढे गेले. परंतु या चाळीस वर्षांत अपेक्षित वेग राखता आला नाही. कूर्मगतीने काम सुरू राहिल्यामुळे धरणातील पाण्यावर अवलंबून शेतकऱ्यांना पाणी-पाणी करावे लागत आहे.
गडगडी धरणाची क्षमता १३.५२६ दशलक्ष घनमीटर आहे. पण, सद्यःस्थितीत ७.४४४ दशलक्ष घनमीटर एवढा जलसाठा केला जातो. प्रकल्पीय सिंचन क्षमता ९९६ हेक्टर आहे. या धरणावर अनेक गावे अवलंबून आहेत. या धरणाला दोन कालवे काढण्यात आले. ते मातीचे असल्यामुळे ठिकठिकाणी पाणी झिरपते आणि वाया जाते. माती, गाळ साचून कालवे बुजले आहेत. मुळातच कालवे पूर्ण न झाल्यामुळे धरण क्षेत्रातील गावांना अपेक्षित पाणीपुरवठा होत नाही. धरण क्षेत्रात काटवली, विघ्रवली, सायले, ओझरे, कोसुंब या लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे दरवर्षी पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे.
दोन्ही कालवे अपूर्ण आणि दुरवस्थेत असल्यामुळे भीषण पाणी टंचाईचे सावट आ वासून उभे आहे. त्याची सुरुवात झाली असून काही ग्रामस्थांना आतापासूनच पाणी काटकसरीने वापरावे लागत आहे. गतवर्षी पावसाळा जुलै महिन्यात सुरू झाला. त्यामुळे धरण क्षेत्रातील सुमारे दहा गावांमध्ये एप्रिल ते जून या तीन महिन्यांत मोठी टंचाई जाणवली. २०२३ च्या मान्सूनमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी होते.
एक नजर...
२०११ साली पूर्ण झालेल्या धरणाच्या कालव्याचा प्रश्न प्रलंबित
१० लाभार्थी गावांमध्ये अद्यापही पाणीटंचाई
शेतकऱ्यांनाही फटका
धरणाच्या कालव्याऐवजी पाईपलाईनची मागणी
अर्थमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा
कालव्याऐवजी पाईपलाईन हवी
धरणातून काढलेल्या कालव्यांऐवजी बंदिस्त पाईपलाईन टाकून त्याद्वारे पाणीपुरवठा व्हावा आणि त्यासाठी एक विशेष बाब म्हणून केवळ गडगडी धरण प्रकल्पासाठीच असा निधी शासनाने उपलब्ध करावा, अशी मागणी गडगडी धरण कृती समितीने केली आहे. पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केल्यास पाणी जमिनीत मुरून फुकट जाण्याचे प्रमाण नगण्य राहील, असे मत समितीने मांडले आहे. या समितीकडे वीस गावांच्या ग्रामपंचायतींचे ठरावही आलेले आहेत.
बांधून पूर्ण झालेल्या कालव्याच्या प्रश्नामुळे गडगडी धरणाचा उद्देश पूर्ण झालेला नाही. यासाठी पाईपलाईनद्वारे पाणी वितरण आवश्यक आहे. याबाबत आचारसंहिता लागण्यापूर्वी झालेल्या भेटीत अर्थमंत्री यांनीही निधी उपलब्ध करून देण्याविषयी चर्चा केली होती.
-संतोष घाग, अध्यक्ष, गडनदी धरण कृती समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.