Black Panther : कोकणात काळ्या बिबट्याचा मुक्त वावर; राजापूर, गुहागरात आढळला 'ब्लॅक पँथर'
आंबोली, तिल्लारी या घनदाट जंगले असणाऱ्या भागात काळ्या बिबट्यांची संख्या आणि वावर सातत्यपूर्ण असल्याचा संशोधक आणि स्थानिक निसर्गप्रेमींचे निरीक्षण आहे.
-प्रतिक मोरे, देवरूख
‘‘जंगल जंगल (Forest) बात चली हैं पता चला हैं….’’ नव्वदीच्या दशकात जन्मलेल्या मिलेनियल तरुणाच्या भावविश्वातलं हे अजरामर गाणं. रविवारी लागणाऱ्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर मोगली लागलं की बाहेर खेळायला धावणारी पावलं टीव्हीसमोर अडखळायची. यातली सगळीच पात्र शेरखान, मोहिनी, बल्लू, सगळे मोगलीचे जंगली भाऊबंद आज पण डोळ्यासमोर येतात. परंतु सगळ्यात जास्त ज्याच लहानपणापासून आकर्षण आहे तो म्हणजे बघिरा. बिबट्याचे सगळे स्वभाव गुण जणू कोळून प्यायलेला, शांत, सय्यमी आणि भेदक नजर, जी काळजात आरपार जाईल, अत्यंत चपळ आणि तितकाच लॉयल.
साहित्यात अत्यंत अजरामर झालेलं हे पात्र ब्लॅक पँथर (Black Panther) नावाने जगभरात प्रसिद्ध आहे. मध्य भारतात घडलेल्या या कहाणीसारख्या अनेक आख्ययिका, गोष्टी आणि या प्राण्यांविषयी असलेले वलय मात्र जगभर पसरले आहे. रात्री सावलीसारखा फिरणारा आणि अंधारात सुद्धा सहजतेने न दिसणारा हा प्राणी अख्यायिका आणि गजालींचा भाग न होईल तरच नवल....
“ब्लॅक पँथर” या नावाचा विचार केला तर ती एक संयुक्तिक टर्म म्हणता येईल. यात भारत आणि आफ्रिकेत मिळणारा काळा बिबट्या, साऊथ अमेरिकेतले काळे जग्वार यांचा समावेश होतो. यांचं लॅटिन भाषेतील कुळ panther असल्यामुळे ही व्याख्या रूढ झाली असावी. परंतु प्रत्यक्षात मात्र ही प्राण्यांची वेगळी प्रजाती नसून काळया रंगाचे प्रमाण जास्त असणारा बिबट्या किंवा जग्वार हाच ब्लॅक पँथर नावाने ओळखला जातो. भारतात फक्त बिबट्याच आढळत असल्याने आपल्याकडे काळया रंगाचा बिबट्या म्हणजेच ब्लॅक पँथर होय. शरिराचे रंग ठरवणारे मेलानीन हे रंगद्रव्य वाढल्यामुळे, म्हणजेच शास्त्रीय भाषेत मेलानिसम (Melanism) यांचे शरीर काळया ठिपक्याऐवजी पूर्णतः काळे किंवा अधिक काळे दिसते.
याउलट मेलानीन कमी झाल्यामुळे ल्युकिझम (Leucism) म्हणजेच पांढरा बिबट्या ही दिसू शकतो. जरी काळा रंग जास्त प्रमाणात असला तरी ठिपके बऱ्याच वेळेला दिसतात. ही एक जेनेटिक कंडीशन आहे कोणत्याही प्रकारचा रोग नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. मेलानिझम हा एका रेसेसिव जनुकामुळे होतो. एका मादीला काही पिल्ले मेलानिस्टिक तर काही नॉर्मलही होऊ शकतात. बऱ्याच ठिकाणी असं दिसून आलेलं आहे की हे एका प्रकारच चांगलं उत्परिवर्तन आहे. दाट झाडी आणि जंगल असणाऱ्या प्रदेशात काळा रंग लपण्यासाठी फायदेशीर ठरत असल्यामुळे या भागात या रंगाचं प्रमाण जास्त दिसून आलेलं असल्याचा एक अभ्यास सांगतो.
प्राथमिक अभ्यासात हे नैसर्गिक प्रतिकार क्षमतेचे फायदेशीर उत्परिवर्तन ( beneficial mutation) असल्याचे दिसून आले आहे. बिबट्याचे टिपिकल काळया रंगाचे ठिपके मेलानिझममुळे लपले जाऊन जे काळया रंगाचे नवीन पॅटर्न तयार होतात त्यांना घोस्ट रोसेटी अशी म्हणतात. साधारणतः एकूण लोकसंख्येच्या ११ टक्के एवढं काळया बिबट्याचे प्रमाण असू शकते. कॅमेरा ट्रॅप स्टडीमध्ये या बिबट्याचे प्रमाण हे सदाहरित आणि निमसदहरित वनांमध्ये जास्त प्रमाणात आढळले आहे.
कोकणात सुद्धा आतापर्यंत खूप वेळा काळया बिबट्याचा वावर दिसून आला आहे. काही वर्षांपूर्वी राजापूर आणि गुहागर अशा दोन ठिकाणी ब्लॅक पँथर विहिरीत पडल्याचे आढळून आले आणि यांना वन विभागाने यशस्वीरित्या जंगलात पुन्हा सोडून सुद्धा दिले होते. राजापूर गोठीवरेच्या परिसरात आजही अश्या एका बिबट्याचा मुक्त वावर असल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शीनी पाहिले आहे. नुकताच संगमेश्वर तालुक्यातील आरवली आणि कोंडीवरे गावाच्या पंचक्रोशीमध्ये याच दर्शन वारंवार लोकांना होत आहे. या ठिकाणी वन विभागाने ट्रॅप कॅमेरेसुद्धा लावून याचे पुरावे गोळा करणे सुरू केले आहे.
आंबोली, तिल्लारी या घनदाट जंगले असणाऱ्या भागात काळ्या बिबट्यांची संख्या आणि वावर सातत्यपूर्ण असल्याचा संशोधक आणि स्थानिक निसर्गप्रेमींचे निरीक्षण आहे. यांच्याप्रती असणारे आकर्षण आणि फोटो काढण्यासाठी येणारे पर्यटक यामुळे या परिसरातील हॉटेल व्यावसायिकसुद्धा फायद्यात असतात. तसेच दोडामार्ग तालुका निसर्गसंपन्न असून पर्यावरण संवेदनशील भागातून वगळला गेला आहे. हा भाग संवेदनशील करावा आणि येथील निसर्गसंपत्तीचे संरक्षण करावे अशी मागणी वाढत आहे.
रुडयार्ड किपलिंगचे जंगल बुक, अश्याच नावाच्या मार्वल युनिवर्स मधल्या एका हीरोचे नाव आणि बास्केट बॉल मधली सुप्रसिद्ध टीम कॅरोलिना पँथर्सचे मानचिन्ह असलेला हा ब्लॅक पँथर कवी कल्पनेतला नसून प्रत्यक्षात असलेला एक सुंदर आणि मनमोहक प्राणी आहे हेच सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच.. आणि हेच प्रसिद्ध फोटो ग्राफर शान जंग यांनी काबिनी मध्ये काढलेल्या आणि अत्यंत प्रसिद्ध झालेल्या विविध फोटो मधून आपल्याला दिसून येते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.