Konkan News : पावसाळ्यात 'तिवडी गाव' नव्या नवरीसारखं सजतं; काय आहे गावाची खासियत?
फार पुरातन गाव, गावातील घरटी एक तरी व्यक्ती भारतीय सैन्यदलात (Indian Army) असलेला किंवा निवृत्त असा आहे.
-पराग वडके, चिपळूण parag.vadake@gmail.com
सह्याद्री आपल्याला त्याच्या कडांवरून अलगद उंच उंच झोके देत वर वर नेत असतो. अचानक एका वळणावर गार गार वारा येऊ लागतो, हीच ती खूण. आपण सह्याद्रीच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आहे, असे समजण्याची. नंतर एका बाजूला खोल दरी आणि पिटुकली गावे तर एका बाजूला उंच शिखरे. असे करत आपण गावाच्या चिंचोळ्या गेटमधून प्रवेश करतो...!
मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी
घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा
या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे
रानात एककल्ली सुनसान सांजवेळी
डोळ्यांत गलबताच्या मनमोर रम्य गावी
केसात मोकळ्या या वेटाळूनी फुलांना
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे
मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले
ना. धो. महानोर यांची ही कविता जगायची असेल तर कार, बाईक, सायकल काय मिळेल ते वाहन घ्यावे आणि चिपळूण तालुक्यातील दसपटी भागातील तिवडी गावाला भेट द्यावी. तुम्हाला कधी वाटले सालं आयुष्य खूपच रूटिन झाले आहे, मरगळ आली आहे आणि काही सुचत नाहीये तर हे गाव तुम्हाला जवळ करते, कुशीत घेते, गोंजारते आणि पुन्हा नव्याने उभारी देते नव्याने झेप घेण्याकरिता.
या गावाशी माझा संबंध आला तो आमच्या वृद्ध निराधार लोकांसाठी काम करणाऱ्या सांजसोबत संस्थेमुळे. या गावात साधारण सात वृद्ध होते, जे निराधार होते. त्यांना दरमहा संपूर्ण किराणा द्यायचा होता; पण गाव आहे चिपळूणपासून ३५ किमी अंतरावर. अतिशय दुर्गम अशा सह्याद्रीच्या कड्यावर. कोणी कार्यकर्ता मिळत नव्हता म्हणून मी हे गाव स्वतःकडे घेतले. आज सात वर्ष झाली. दरमहा एकदा या गावात जाणे होते. पहिल्या दिवशी जो उत्साह होता तोच आजही उत्साह आहे. माझ्यामुळे या गावाचे अनेकजण चाहते बनले. कधी जायचे असले की, नंबर असतात गाडीत बसायला.
आपण चिपळूण (Chiplun) सोडले की, कराड दिशेने गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीकडे जायचे आणि सरळ ३५ किमी उंच उंच चढत जायचे. सह्याद्री आपल्याला त्याच्या कड्यांवरून अलगद उंच उंच झोके देत वर वर नेत असतो. अचानक एका वळणावर गार गार वारा येऊ लागतो, हीच ती खूण. आपण सह्याद्रीच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आहे असे समजावे. नंतर एका बाजूला खोल दरी आणि पिटुकली गावे तर एका बाजूला उंच शिखरे. असे करत आपण गावाच्या चिंचोळ्या गेटमधून प्रवेश करतो.
हा प्रवास आणि गावाचे गेट तेथून दिसणारा अतिशय कोरीव काम केलेला सह्याद्री आणि आपण त्याच्या गर्भगृहात नतमस्तक झालेलो. सोबत वारा एवढा जोरात असतो की, तुम्ही ढकलले जाता. संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातील सर्वात शुद्ध हवेचे गाव. कडांना धरून प्रवेश केला की, आत वाड्या आहेत. गावाला सर्व बाजूंनी जंगलाने व्यापलेले आहे; पण आपण अत्यंत टोकावर असल्याने सह्याद्रीच्या तासलेल्या कडा अगदी हाताला येईल, अशा दिसतात. सर्वात इथले प्रचंड आकर्षण काय असेल तर जगातील सर्व फोटोग्राफरना आकर्षित करेल, असा सूर्योदय. वातावरणात धूलीकण नाहीत आणि कडा दिसत असतात.
पहाटे साडेपाचला हजर राहायचे. एकावेळी दोन-तीन कॅमेरे लावून ठेवायचे का तर एका मर्यादेत टाईमपास मोड लावायचा म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वीचे रंग ते सूर्योदय पाहायला मिळतो. दुसरा कॅमेरा सभोवताली सह्याद्रीच्या सर्व कडा वेगवेगळ्या रंग फेकत असतात आणि पहिली सूर्यकिरणे सह्याद्रीवर पडताना विविध रंगांचे संमेलन भरलेले असते. या गावात कितीतरी वेळा नुसता सूर्योदय टिपायला रोज सकाळी साडेपाचला उठून मी ३५ किमी प्रवास करून एकटाच सह्याद्रीच्या कडांवर बसलेला आहे. संध्याकाळ तर बेफाट असते. प्रचंड ढग, चर्चगेटवरून बोरिवलीला जावे प्रचंड गर्दीने तसे धावत सुटलेले असतात. हे गाव ढगांच्या रेषेत समांतर येते. मी माझे काम आटपून सहज रस्त्याला उभा होतो.
समोर प्रचंड खोल दरी आणि समोर सर्व डोंगररांगा. कुठूनतरी एक प्रचंड मोठा ढग आला. जणू काही तू आमच्या गेटमध्ये का घुसलास, असे कोकणी भांडण करायला. तो माझ्या समांतर होता. साधारण अर्धा किमी हवाई अंतर असेल. ढग आला, स्थिरावला आणि मस्त आपली पोटलीची गाठ सोडली आणि साठवलेला पावूस धो धो पाडू लागला. मी अक्षरशः ढगातील धबधबा पाहत होतो. एकदा रात्री कोजागिरीला दहा वाजण्याच्या दरम्यान या गावात गेलो होतो. उंचीवरचे कडे आणि रस्ता सुरू झाला तर कारच्या पुढ्यात निळा जांभळा लाईट लागलेला रस्त्यात दिसला. पुढे पुढे निघालो तर अखंड लायटिंग. नंतर कोणीतरी माहिती दिली हा नाईटजार पक्षी लोकल भाषेत, जारवा पक्षी जिथे प्रदूषण कमी असते तिथे दिसतो; पण एवढ्या मोठ्या संख्येने तो तिवडीमध्येच दिसतो.
हा पक्षी रात्री उडताना डोळे मिचकावतो त्या वेळी त्याचे डोळे निळे, जांभळे दिसतात आणि ग्रामीण भागात बऱ्याचवेळा भूत दिसले भूत दिसले, अशी आवई उठते. तिवडी गाव (Tiwadi Village) पावसाळ्यात नव्या नवरीसारखे सजते. प्रचंड पाऊस आणि हिरवा रंग यात रंगलेले गाव. पावसात थेट सह्याद्री इथे प्रत्येक ढग अडवतो. शस्त्रक्रिया करतो, पाऊस काढून घेतो आणि ढगांना पुढे पाठवतो. त्यामुळे तुफान पाऊस पाहायचा असेल तर हे गाव गाठायचे. फक्त पावसात या गावात बऱ्याचवेळा दरडी कोसळतात. पाऊस संपला की, हे गाव कासपठार बनते. असंख्य फुललेली रानफुले, झुळझुळवाला आणि एकालयीत लाटा आदळणारा गवताचा समुद्र. कितीतरी चित्रपट शूट होतील, अशी प्रत्येक वळणावरची लोकेशन या गावाला लाभलेली आहेत.
गावाचे सरपंच रमेश पवार गावासाठी धडपडत असतात. विविध योजना मिळवून देणे वगैरे काम करतात. गावात वृद्ध एकाकी राहतात आणि काही गावकरी. या गावातील देवी पद्मावतीचा शिमगा हा सण प्रसिद्ध आहे. तसे गाव आहे छोटेखानी. फार पुरातन गाव, गावातील घरटी एक तरी व्यक्ती भारतीय सैन्यदलात (Indian Army) असलेला किंवा निवृत्त असा आहे. अर्थात, सध्या गावात रोजगार नसल्याने बहुतांश गावातील तरुण हे नोकरीसाठी मुंबई-पुणे-चिपळूण या भागात पसरलेले. गावच्या आजूबाजूला जंगलतोडीचा शाप आहेच, जसा तो कोकणात प्रत्येक गावाला आहे. इथून पुढे जंगलात शिरायचे असेल तर वनविभागाची परवानगी लागते. तासलेला सह्याद्री, नेत्रसुखद निसर्ग, तुफान पाऊस, बेभान वारा अंगावर घ्यायचा असेल तर एकदा या गावाला भेट द्या.
(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.