Konkan Marathi News
Konkan Marathi Newsesakal

Konkan News : आदरणीय उत्सवबाळू - अण्णा छत्रे

अण्णा लग्नकार्याच्या (Marriage Ceremony) भानगडीत पडले नाहीत.
Published on
Summary

‘‘अण्णा, तू आम्हाला हव्या तेवढ्या शिव्या दे रे; पण आम्हाला सांग की, गेले महिनाभर तू अंथरूणावरून उठत नव्हतास तो इतका अचानक इतक्या लांबवर धावत कसा काय आलास?’’

-राजा बर्वे, परशुराम

अण्णा लग्नकार्याच्या (Marriage Ceremony) भानगडीत पडले नाहीत. ‘‘शिवरामा, अरे हनुमंताचा उपासक मी, तो सुद्धा ब्रह्मचारीच हवा. आम्ही बारा वडावरचे मुंजे, आज इथे तर उद्या सज्जनगड, तर परवा केळशीत, अशावेळी बायकोला तिष्ठत घरी ठेवण्यापेक्षा न केलेली काय वाईट? आणि योगक्षेम म्हणशील तर लोकच चालवतात, ‘आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो..’’ माझ्या वडिलांना अण्णा जगण्याचे अजब तत्त्वज्ञान सांगत असत. कधीही बघावं तेव्हा निर्व्यसनी अण्णांच्या मुखात सतत विष्णूसहस्रनाम असे.

कोकणातली संस्कृती, उत्सव, सण, समारंभ, मेळे, खेळे, दहीकाला, नमन, भारूड, पालख्या आणि दक्षिण कोकणातला दशावतार हे सारे कोकण, कोकणी माणूस (Konkani Man) आणि कोकणी मनाचे अविभाज्य अंग आहेत. काळानुसार त्यामध्ये थोडा बदल होत गेला असला तरीही त्याचा मूळ बाज अजूनही टिकून आहे. कोकणी माणूस सहसा बदल स्वीकारत नाही आणि तो असलेल्या प्रथा जीवापाड जपत आपलं सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन समृद्ध ठेवत असतो. कोकणात अनेक गावांमधून असे वार्षिक उत्सव आणि समारंभ नित्यनेमाने साजरे होत आले आहेत.

Konkan Marathi News
कृष्णाची जीवनगीता! 'मुंबादेवीने ती पोर माझ्या संगती पाठवली नसती, तर मी आज बी मुंबईतच असतो'

चिपळूण, खेड, गुहागर पंचक्रोशीतील अनेक गावांमधील अशा उत्सवात सुमारे चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी अण्णा छत्रे हे एक पात्र अनेक वर्षे वावरत होते. त्याची आठवण साठी उलटून गेलेले अनेक लोक आजही काढतील. अण्णा छत्रे हे माझ्या वडिलांचे सख्खे मामा. त्यांचं घर चिपळूणला (Chiplun). त्या वेळी त्यांचे वय सुमारे चाळीशीच्या आत. गुढीपाडवा यायच्या आधी नवीन पंचांग आणून पाडव्याला रितसर त्याची पूजा झाली की, अण्णा त्या वर्षात वेगवेगळ्या गावांमधले उत्सव कधी येतात याची नोंद त्यावर करून ठेवत. अण्णांना उत्सवाचे आमंत्रण कधीच गरजेचे वाटत नसे. ज्या गावात उत्सव सुरू होई त्याच्या नेमके आदल्या दिवशी अण्णा त्या गावात हजर होत. गावोगावी त्यांच्या मुक्कामाची घरे ठरलेली असत.

अण्णा आलेले कळले की, उत्सव आयोजकांचा जीव भांड्यात पडत असे. जवळपासच्या गावातून ठरलेले लोक हमखास एकमेकांकडे उत्सवाला जात-येत असत, अगदी आठवडाभर राहून 'आवारी' आणि कष्टभोजन झाले की, मग आपापल्या गावी परत जात. अशा लोकांना उत्सवबाळू म्हणण्याची पद्धत कोकणात रूढ होती. अण्णा मात्र या तीन तालुक्यातील जवळपास सर्वच गावाचे उत्सवबाळू होते. उत्सवबाळू हे नाव थोडे उपेक्षा करणारे वाटत असले तरी अण्णांचा मात्र एक वेगळा मान त्या त्या गावातले लोक आदराने करत असत. अण्णांचे वर्षाकाठी शंभर एक दिवस अशा उत्सवात निघून जात.

Konkan Marathi News
Health News : मुलांमधील स्थूलतेचा वाढता प्रकोप; कोणती आहेत कारणे, कशी घ्याल काळजी?

अण्णांनी आयुष्यात फार काही केलं नाही. लहानपणी जोर, बैठका, सूर्यनमस्कार यातून अण्णांची तब्येत मात्र दगडासारखी. बेतवार उंची, गळ्यात काळा दोरा, दंडावर कसलातरी तावीज कायम बांधलेला, नेसुला पंचा, डोक्याला कायम एक उपरणे मुंडाशासारखे बांधलेले, एक गमशा कमरेला घट्ट बांधलेला असे अण्णा पहेलवान दिसायचे. त्या काळात परशुराम मंदिरात होणाऱ्या अक्षय तृतीया उत्सवातल्या शारीरिक खेळांमध्ये अण्णा तिथली दगडाची शंभर-दीडशे किलो वजनाची गोटी लिलया उचलून खांद्यावरून मागे टाकत. ते पाहायला गर्दी होत असे. दांडपट्टा आणि लाठीकाठी फिरवत ते पाहताना नजर ठरत नसे.

कोणत्याही गावात उत्सवाला अण्णा गेले की, तो उत्सवच ताब्यात घेत. बारीकबारीक तयारी, कीर्तनकार, साथीदार यांची सरबराई, सतरंज्या, रोषणाई, हार, फुले, आचारी, वाण सामान एक ना दोन अशी सगळी व्यवस्था झाल्याचा अखेरचा हात अण्णांचा फिरत असे. त्या काळी कोकणात पाऊस भरपूर असला तरी शिमगा होईपर्यंत पाण्याचा दुष्काळ होई, मैलावरून पाणी आणावे लागे. कल्याणस्वामीसारखे अण्णा मग मणामणाचे दोन हंडे दोन खांद्यावर घेऊन उत्सवाला लागणारे पाणी तरुण पोरांना बरोबर घेऊन भरत असत. तरुण मुलाना संध्याकाळी लाठ्याकाठ्या, हुतुतू, दांडपट्टा शिकवत. विष्णू सहस्रनामाची लहान मुलांना संथा देत. अण्णांचा आहारदेखील जेऊ घालणाऱ्याचे समाधान व्हावे असाच.

Konkan Marathi News
खाडीत लालभडक उगवता सूर्य, मगरीने भरलेले जगबुडीचे खोरे अन् बरंच काही; मालदोलीत असं नेमकं आहे तरी काय?

अण्णा एकदाच दुपारी जेवत असत; पण दीड शेराचा भात, वरण, तूप असा गारा करून मनसोक्त जेवत. तीस-चाळीस जिलब्या, पंधरा-वीस पुरणपोळ्या सहज खात असत. अण्णा ज्या गावात जात त्या गावचे होऊन जात, तिथल्या लोकांचे होऊन जात. एकदा अण्णांना ढोपरीचा आजार झाला. ते एका गावात उत्सवात होते. गावातल्या लोकांचे अण्णांवर विलक्षण प्रेम. बघता बघता आजार बळावला. अण्णा खाटेवर आडवे पडले ते उठेनात. ढोपर सुजून वेदना असह्य झाल्या. त्या काळी जवळपास डॉक्टर नसे त्यामुळे फक्त गावठी औषधोपचार. कळकीचा डाग हा त्या रोगावर जालीम उपाय. कळक हा बांबूचा एक प्रकार, आतून पोकळ. रसरसलेल्या चुलीत कळकीचा लांब दोन पेरे असलेला तुकडा चांगला गरम करायचा आणि झटक्यात पेरावर कोयतीने घाव घालून आतली गरम वाफ दुखऱ्या भागावर चेपून ठेवायची, असा हा अघोरी परंतु जालीम उपाय.

अण्णा दोन-चार लोकांना आवरण्यातले नव्हते. मग गावकऱ्यांनी कट रचून हा उपाय करण्याचे ठरवले. नाभिक समाजाचा अनंता हे काम करत असे. त्याला सज्ज राहायला सांगून चार-पाच गावकरी अण्णांच्या आजाराची चौकशी करण्याच्या बहाण्याने त्यांच्या उशापायथ्याशी बसले. ‘‘अण्णा, अरे असा किती दिवस पडून राहणार आहेस, बरं व्हायचंय ना यातून.., अजून रामाचे बरेच उत्सव करायचेत तुला’’, असे संवाद रंगात आल्यावर हळूच खाणाखुणा, इशारे झाले आणि क्षणार्धात बसलेल्या लोकांनी अण्णांना घट्ट दाबून धरले, उरलेले काम अनंताचे चोख बजावले. वाफेचा अतिउच्च भपकारा ढोपरात घुसला आणि अण्णा सगळ्यांना ढकलून तोंडाने ब, भच्या बाराखड्या बडबडत जे उठले ते दोन-तीनशे मीटरवर जाऊन उभे राहिले. पाठोपाठ गावकरी धावले. ‘‘अण्णा, तू आम्हाला हव्या तेवढ्या शिव्या दे रे; पण आम्हाला सांग की, गेले महिनाभर तू अंथरूणावरून उठत नव्हतास तो इतका अचानक इतक्या लांबवर धावत कसा काय आलास?’’

Konkan Marathi News
Computer Vision Syndrome : कॉम्प्युटरचे दृष्टिदोष टाळा अन् 20-20-20 चा नियम पाळा

.. अण्णा पुढे त्या आजारातून उठले, केवळ उठलेच नाहीत तर त्यानंतर पाच -दहा वर्षे सगळ्या गावातून उत्सव करत राहिले. कोकणाने त्या काळात अशी अनेक कलंदर मनस्वी माणसे प्रेमाने आणि मायेने जपली, सांभाळली. आज नातेसंबंध आक्रसून गेलेल्या जगात आपल्याच जवळच्या नातेवाईकांकडे कसे जायचे, अशी विवंचना पडते. अशा वेळी अण्णांसारखी ही अशी माणसे गावोगावी मुक्काम ठोकत आपल्या गुणांनी तिथल्या लोकांना जिंकून घेत. पोशाखी शिष्टाचारांना त्यांच्या जगात स्थान नसे. ‘आम्ही काय कुणाचे खातो रे’, अशी ही आरस्पानी, स्वच्छ, निर्मळ मनाची माणसे आठवतात तेव्हा आज केवळ पैसा, बडेजाव आणि प्रसिद्धी या आसाभोवती फिरणाऱ्या दुनियेत या माणसांची पार घुसमट झाली असती, असे वाटत राहते आणि जन्माला आलेला जीव इथून एक दिवस निघून जातो, ही व्यवस्था परमेश्वराने का लावून ठेवली असावी, याचे देखील नकळत उत्तर मिळून जाते.

(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.