Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात पावसाची झोड सुरूच; समुद्रही खवळला, मासेमारीच्या पाती उलटल्या
सध्या पडत असलेला पाऊस आणि पुढील दोन-तीन दिवस पावसाची शक्यता यामुळे आंबा, काजू पीक संकटात सापडण्याची शक्यता आहे.
वैभववाडी/मालवण : जिल्ह्यातील (Sindhudurg Rain) मालपे, पोंभुर्लेसह अन्य काही गावांना पावसाने कालपासून झोडपून काढले. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात विजांचा लखलखाट आणि गडगडाटासह सरी कोसळल्या. समुद्रातही अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्याचा जोरदार फटका किनारपट्टीला बसला. वाऱ्याच्या जोरामुळे दांडी किनारी मच्छीमारांच्या (Fisherman) काही पाती उलटल्या. जलक्रीडा, किल्ला प्रवासी वाहतूक काही काळ थांबवावी लागली.
गेले चार दिवस पावसाचे वातावरण आहे. बुधवारी (ता. १७) रात्री उशिरा काही भागात हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर शुक्रवारी (ता. १९) दिवसभर पावसाचे वातावरण होते. काल पहाटेपासून गडगडाट सुरू झाला. देवगड तालुक्यातील मालपे, पोंभुर्ले, पाटगाव, शिरगाव, पडेल परिसरात जोरदार पाऊस झाला. मालपेला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. वाऱ्याचा वेगदेखील वाढला होता.
कणकवली (Kankavali), कुडाळ, सावंतवाडी, देवगड, वैभववाडी, दोडामार्ग तालुक्यांच्या बहुतांशी भागात पाऊस पडला. काही भागांत पावसाची रिपरिप सुरू होती. जिल्ह्यात सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचे वातावरण कायम राहिले. चार-पाच दिवस असलेले ढगाळ वातावरण, सध्या पडत असलेला पाऊस आणि पुढील दोन-तीन दिवस पावसाची शक्यता यामुळे आंबा, काजू पीक संकटात सापडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आंबा हंगाम सुरू आहे. या वातावरणाचा मोठा परिणाम हंगामावर होणार आहे.
दमट वातावरणामुळे फळमाशीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यातील काजू पीकदेखील पावसामुळे संकटात सापडले आहे. दरम्यान, वादळी वाऱ्याचा जोरदार फटका किनारपट्टीला बसला. वाऱ्याचा जोर एवढा वाढला होता की, दांडी किनारी मच्छीमारांच्या काही पाती उलटल्या. जलक्रीडा, किल्ला प्रवासी वाहतूक काही काळ थांबवावी लागली. मालवण किनारपट्टीवर दुपारी साडेअकरापासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मच्छीमार, जलक्रीडा व्यावसायिकांची तारांबळ उडाली.
वातावरणात अचानक झालेल्या या बदलाची तत्काळ दखल घेत बंदर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात सर्व जलक्रीडा प्रकार, किल्ले प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याची सूचना दिली. वादळी वाऱ्यामुळे काही मच्छीमारांच्या पाती उलटल्या; मात्र मोठे नुकसान झाले नाही. दुपारनंतर वातावरणात बदल झाला. वाऱ्याचा जोर ओसरल्याचे दिसून आले. त्यानंतर पुन्हा किल्ले प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली.
सावट कायम
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत विजांच्या लखलखाटासह पाऊस आणि ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचादेखील अंदाज आहे. त्यामुळे जिल्ह्यावर पावसाचे सावट कायम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.