Koyna Dam : कोयनेतील वीजनिर्मिती चिपळूणच्या पथ्यावर; MIDC सह शहराला मुबलक पाणी, नागरिकांची मचूळ पाण्यातून सुटका
मध्यंतरी कोयना वीजनिर्मिती प्रकल्पातील वीजनिर्मितीवर मर्यादा आली होते. त्यामुळे वाशिष्ठी नदीचे पात्र कोरडे पडले होते.
चिपळूण : महाराष्ट्रात विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे कोयना प्रकल्पातून (Koyna Project) पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू आहे. त्याचा फायदा चिपळूण शहर आणि वाशिष्टी नदीवर (Vashti River) अवलंबून असलेल्या नळपाणी योजनांना झाला आहे. खेर्डी, खडपोली, लोटे येथील उद्योगांना लागणारे पाणी एमआयडीसी मुबलक प्रमाणात वाशिष्टीतून उचलत आहे. त्यामुळे कोयना प्रकल्पात सुरू असलेली वीजनिर्मिती चिपळूणच्या पथ्यावर पडली आहे.
कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती (Power Generation) झाल्यानंतर कोयनेचे अवजल वाशिष्टीत नदीला सोडले जाते. हे पाणी चिपळूण पालिका उचलते आणि शहरातील लाखाहून अधिक नागरिकांची तहान भागवते. लोटे, खेर्डी, खडपोली येथील उद्योगांसाठी लागणारे पाणीसुद्धा एमआयडीसी नदीतून उचलते. तालुक्यातील पिंपळीपासून चिपळूण शहराचे उपनगर असलेल्या कालुस्ते गावापर्यंत वाशिष्ठी नदीचे पाणी वापरले जाते.
राज्यातील इतर वीजनिर्मिती प्रकल्पाच्या तुलनेत कोयना प्रकल्पातून जलद वीजनिर्मिती मिळते. त्यामुळे मागणीच्या काळात म्हणजेच सकाळ आणि संध्याकाळी कोयना प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जाते. वीजनिर्मितीनंतर सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वाशिष्ठीचे पात्र तुडुंब भरून वाहते. मध्यंतरी कोयना वीजनिर्मिती प्रकल्पातील वीजनिर्मितीवर मर्यादा आली होते. त्यामुळे वाशिष्ठी नदीचे पात्र कोरडे पडले होते. वाशिष्ठी खाडीला भरती आल्यानंतर खाडीचे मचूळ पाणी पालिकेच्या जॅकवेलच्या माध्यमातून नागरिकांना पुरवले जात होते. त्यामुळे शहरातील नागरिकांना उलटी जुलाबसह पोटाचे विकार सुरू झाले होते.
नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला होता. त्यावेळी पालिकेकडून महानिर्मिती कंपनीला पत्र व्यवहार करून किमान पालिकेला पिण्यासाठी पाणी उचलता येईल एवढी वीज निर्मिती करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी कोयना प्रकल्पातून साडेतीनशे ते पाचशे मेगावॅट वीज निर्मिती केली जात होती. मागणीनुसार हा आकडा कमी जास्त होत होता. मात्र कडक उन्हाच्या काळात कोयना प्रकल्पातून नऊशे ते हजार मेगावॅट वीज निर्मिती सुरू आहे. वीज निर्मिती सुरू असताना वाशिष्ठीच्या पात्रात मुबलक पाणी असल्यामुळे मे महिन्यात शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागला आहे.
उन्हाळ्यात दरवर्षी चिपळूण शहराला मचूळ पाणी आणि पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावतो. त्यावर मार्ग काढण्यासाठी पालिकेने खेर्डीच्या जॅकवेलमधून आलेल्या पाईपलाईनचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे, वर्षभरात हा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.
-नागेश पेठे, पाणीपुरवठा विभागप्रमुख, चिपळूण पालिका
कोयनेच्या पाण्यावर चिपळूण शहर आणि परिसरातील गावच्या नळपाणी योजना अवलंबून आहेत. त्यामुळे किमान पिण्यासाठी पाणी मिळेल एवढी वीजनिर्मिती करा आणि कोयनेचे पाणी वाशिष्ठी नदीला सोडा, अशी मागणी वारंवार पालिकेकडून सुरू होती. पालिकेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही वेळोवेळी निर्मिती केली. आता वीजनिर्मिती सातत्याने सुरू असल्यामुळे वाशिष्टी नदीला मुबलक पाणी आहे.
-संजय चोपडे, मुख्य अभियंता, महानिर्मिती कंपनी, पोफळी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.