दाभोळ ः  रामदास कदम यांची वक्तव्ये दापोलीत भोवली

दाभोळ ः रामदास कदम यांची वक्तव्ये दापोलीत भोवली

रामदास कदम यांची
वक्तव्ये दापोलीत भोवली

केदार साठे : कदम पिता-पुत्रांविषयीचा रोष नडला

सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. २८ : रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना आघाडी न मिळण्याचे कारण शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी प्रचारसभेत केलेली वक्तव्ये असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
दापोलीमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल वक्तव्य करणे, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर टीका करणे, विरोधी उमेदवारावर अत्यंत वाईट पद्धतीने भूमिका घेणे, हा सगळा विषय महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या कानावर आम्ही पहिल्या सभेतच घातला होता. रामदास कदम असेच बोलत राहिले तर महायुतीचे मोठे नुकसान होणार, असे आम्ही त्यांना सांगितले होते; मात्र तटकरे यांची मजबुरी होती. अशाच पद्धतीची विधाने त्यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातही केली. मी २५ हजार मतांचे लीड मिळवून देईन, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, भाजप कार्यकर्त्यांना हिणवणे, प्रचारयंत्रणा नीट न राबवणे अशा अनेक मुद्द्यांमुळे गुहागरमध्येही महायुतीचे उमेदवार मागे राहिले. या सगळ्यांचा अहवाल पक्षातर्फे आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला आहे.
‘मी उमेदवार आहे, असे समजून तटकरे यांना मतदान करा’, असे रामदासभाई कदम मतदारांना सांगत होते. तरीही दापोली व गुहागर विधानसभा मतदारसंघात फटका बसला. आमदार योगेश कदम व रामदासभाई कदम यांच्याबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष असल्याने महायुतीच्या उमेदवाराला या दोन विधानसभा मतदारसंघांत कमी मते मिळाली, असा आरोप साठे यांनी केला.
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व कोकणातील भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने पुन्हा करण्यास रामदास कदम यांनी सुरुवात केली आहे. दापोली ही काय तुमची मालकी झाली का? या मतदारसंघात अन्य कुणी विकासकामांची भूमिपूजने करायची नाही का? असे सवाल करून हा मतदारसंघ म्हणजे कोणाची जहांगिरी नसल्याचेही साठे यांनी सांगितले. दापोली मतदारसंघात स्वतःच्या नावाने मते मागितल्याने हा मतदारसंघ महायुती म्हणून अडचणीत आला असल्याने ही जागा शिवसेनेने न लढता भाजपने लढली, तरच या जागेवर विजय मिळू शकतो, असा आमचा विश्वास असल्याने आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आम्ही ही जागा भाजपने लढवावी, असे कळवले आहे.
‘फोडा, झोडा’ ही भाषा भाजप कार्यकर्त्यांच्या बाबतीत वापरणे रामदासभाई यांनी थांबवले पाहिजे. आम्ही कोणाचे पगारी नोकर नाही. आम्ही भाजपचे वर्षांनुवर्षे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. गुहागर विधानसभा कुणी लढवायची, हे रामदासभाई कोण ठरवणार? ते ठरवण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. २००९ पासूनची आकडेवारी आहे आमच्याकडे. अशाच पद्धतीने नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न रामदासभाई यांनी केला, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही साठे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला विठ्ठल भालेकर, स्मिता जावकर, संजय सावंत, नीलेश सुर्वे, अप्पा मोरे, श्रीराम शिंदे, भाऊ इदाते यांच्‍यासह भाजपचे पदधिकारी उपस्थित होते.
-----------------------------
चौकट
योगेश कदम यांची भूमिका काय?
रामदासभाई कदम मंत्री रवींद्र चव्हाण व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अनुद्‍गार काढतात व विनाकरण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा मुलगा व दापोलीचे आमदार योगेश कदम यांनीही एकदा याबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की त्यांचेही हेच मत आहे, असा सवाल साठे यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com