US Woman Sindhudurg: अमेरिकन महिला सिंधुदुर्गातील जंगलात पोहोचली कशी? मोबाईलमुळे गूढ उलगडणार
US Woman Chained to Tree Sindhudurg Forest
बांदा : सोनुर्ली रोणापाल सीमेवरील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत सापडलेली अमेरिकन महिला नागरिक ललिता कायी कुमार एस हिला अधिक उपचारासाठी पोलिस बंदोबस्तात आज दुपारी गोवा मेडिकल कॉलेज (गोमेकॉ) रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिस तपासात अनेक गोष्टीचा उलगडा झाला असून तिच्याकडे सापडलेला मोबाईल व टॅबमधील माहिती मिळण्यासाठी सायबर विभागाकडे पाठविला आहे. या प्रकरणात अमेरिकन दुतावासाने जलदगतीने तपास करण्याची विनंती भारत सरकारला केल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. अधिक तपासासाठी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण व बांदा पोलीस पथके गोवा व तामिळनाडू येथे रवाना केली आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी (ता.२७) दुपारी तामिळनाडू येथील व मुळ अमेरिका येथील महिला रोणापाल जंगलात साखळदंडाने बांधलेल्या स्थितीत गुराख्यांना आढळली. सावंतवाडी व बांदा पोलिसांनी या महिलेला ‘सामाजिक बांधिलकी’च्या मदतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तिने कागदावर इंग्रजी भाषेतून लिहून देत आपल्यावर पतीने अत्याचार करून घातक व चुकीची औषधे दिली व याठिकाणी जंगलात आपल्याला बांधून ठेवल्याची माहिती दिली होती. प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र, प्रकृती अस्वस्थामुळे असंदीग्ध माहिती देत असल्याने पोलिसांसमोर माहिती मिळविण्याचे आव्हान होते.
पोलिस पहाटेच घटनास्थळी रवाना
बांदा पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांच्यासह पोलिस पथक रविवारी पहाटे पाच वाजताच तपासासाठी घटनास्थळी रवाना झाले. हे ठिकाण मुख्य रस्त्यापासून तीन किलोमीटर आतील जंगलात आहे. पोलिसांनी पायपीट करत घटनास्थळ गाठले. महिला ज्याठिकाणी सापडली त्या परिसरात पोलिसांनी कसून तपास केला. तसेच येथून मोबाईलचे लोकेशन घेतले. बांदा पोलिसांचे त्यानंतर महिलेचा जबाब नोंदविण्यासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात रवाना झाले. मात्र, तिची प्रकृती अधिक ढासळल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला अधिक उपचारासाठी गोव्यात हलविण्याचा सल्ला पोलिस प्रशासनाला दिला. त्यानुसार तिला तातडीने पोलिस बंदोबस्तात ‘गोमेकॉ’त हलविले.
मोबाईलमुळे गूढ उलगडणार
घटनास्थळी विदेशी महिलेकडे सॅक, मोबाईल, टॅब व ३१ हजार रुपये रोख सापडले. त्यामुळे ही घटना चोरीच्या उद्देशाने झाली नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला. तिची मोबाईलची बॅटरी उतरल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही. स्थानिक गुन्हे अन्वेक्षण शाखेने सर्व साहित्य जप्त केले असून मोबाईल व टॅब सायबर विभागाकडे वर्ग केला. मोबाईलमधून तिने कोणाकोणाशी संपर्क साधला, हे उघड झाल्यानंतर या घटनेचे गूढ उलगडण्यास मदत होणार आहे.
दहा वर्षांपूर्वी भारतात
जंगलात सापडलेली अमेरिकन महिला ही उच्च शिक्षित असून ती योगाचे पुढील शिक्षण घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी भारतात तामिळनाडू येथे आली होती. त्यापूर्वी ती अमेरिकेत प्रसिद्ध बॅले डान्सर व योग शिक्षक होती. मात्र ती तामिळनाडू येथून रोणापाल येथील जंगलात कशी पोहोचली याचा तपास करण्याचे आव्हान बांदा पोलिसांसमोर आहे.
अमेरिकन दुतावासाची दखल
जंगलात सापडलेली महिला ही अमेरिकन नागरिक असल्याने या घटनेची अमेरिकन दुतावासाने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात भारतीय सरकारशी संपर्क साधून या प्रकरणाची चौकशी जलदगतीने करण्याची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाची दखल घेतल्याने पोलिसांवर तपासाचा दबाव वाढला आहे.
कसून तपास
महिलेकडे सापडलेल्या आधारकार्डवर तामिळनाडू येथील रहिवासी पत्ता असल्याने बांदा पोलिसांचे पथक हे तामिळनाडू येथे तपासासाठी रवाना झाले आहेत. गोव्यात परदेशी पर्यटकांची संख्या अधिक असल्याने गुन्हे अन्वेक्षण शाखेचे पथक हे गोव्यात तपासासाठी आज पाठविण्यात आले. आज गोव्यात अनेक अमेरिकन नागरिकांकडे चौकशी करण्यात आली. मडुरा रेल्वे स्थानक येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, त्या कालावधीत ती महिला निदर्शनास आली नाही. पथकाने गोव्यातील अनेक हॉटेल व लॉजची आज चौकशी केली. मात्र, माहिती मिळाली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.