Shravan Kokan Rituals: पुराच्या वेढ्यातही नामगजर..! एक्का, सप्ता उत्सवांची रेलचेल ; काय आहेत कोकणातील धार्मिक, सांस्कृतिक परंपरा?
हिंदू संस्कृतीमध्ये भरपूर व्रतवैकल्ये असणारा सर्वांत पवित्र महिना म्हणजे श्रावण, सणांचा राजा श्रावण. नागपंचमी, नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन, मंगळागौर, गोकुळाष्टमी असे विविध सण, प्रथा-परंपरानी मोठ्या उत्साहाने साजरे होतात. यापैकी एक हरीनाम सप्ताह. बहुतांशी मंदिरांमध्ये सात दिवस व काही मंदिरांमध्ये एकदिवसीय हरीनाम जागर सुरू असतो. भजनांमध्ये कोणताही खंड पडत नाही. टोपी घातलेले, पारंपरिक वेशभूषेतले भजनीबुवा, धारकरी, टाळकरी, भाविक मंडळी या सप्ताहात सेवा करतात.
वीणाधारीही यात असतो. कोकणात बहुतांशी गावांमध्ये भगवान श्री शंकर, श्री मारूती, श्री महालक्ष्मी किंवा ग्रामदेवतेच्या मंदिरात अखंड सात दिवस हा उपक्रम चालतो. त्यानिमित्त गावची एकी पाहायला मिळते. प्रत्येक वाडीतील भाविकांना देवळात सेवेची संधी मिळते. त्यामुळे कोकणात या काळात वातावरण भक्तीमय झालेले असते. आजपासून सुरू झालेल्या श्रावणात सारे होऊया भक्तीमय.
- मकरंद पटवर्धन, रत्नागिरी
रत्नेश्वराचा नामगजर
श्रावण हा भगवान शंकराच्या उपासनेचा महिना मानला जातो. त्यामुळे जे लोक श्रावण महिना भक्तीभावाने पाळतात ते या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शंकराची आराधना करून उपवास करतात. रत्नागिरी तालुक्यातील धामणसे येथे ८४ गावांचा कुलस्वामी श्री रत्नेश्वर मंदिरात पहिल्या सोमवारी अखंड २४ तासांचा नामगजर म्हणजेच एक्का आयोजित केला आहे.
ग्रामदेवतेच्या नामगजराच्या निमित्ताने गावातील असणारी सर्व भजन मंडळे एकत्र येऊन टाळ, मृदंग, वीणा घेऊन उभ्याने भजनाच्या वाऱ्या दिलेल्या वेळेमध्ये २-३ तास करतात. पुढील भजनाची वारी दुसऱ्या वाडीकडे तालवाद्य चालू ठेवून हस्तांतरित केली जाते. एक्का कार्यक्रम गेली ६० वर्षे सुरू आहे. या दिवशी कुलस्वामी श्री रत्नेश्वर दर्शनासाठी अनेक भक्त धामणसे गावी येतात.
तृणबिंदूकेश्वर मंदिरात संततधार
रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी, श्री तृणबिंदुकेश्वराच्या मंदिरात तृणबिंदुकेश्वराच्या पिंडीवर संततधार रूद्रानुष्ठानाला श्रावण प्रतिपदेपासून प्रारंभ होतो. ही संततधार श्रावण अमावस्येपर्यंत सतत विनाखंड सुरू असते. पूजा, अभिषेक झाल्यानंतर आरत्या, मंत्रपुष्पांजली होऊन संततधारेला सुरवात होते. अखंड २४ तास रूद्रपठण करण्यात येते. प्रत्येक ब्रह्मवृंदाला एकेक तास देण्यात आला असून, पठण आणि अभिषेक पात्रात पाणी घालण्यासाठी प्रत्येकी एक असे दोन ब्रह्मवृंद येतात. या संततधारेला साधारण १०० वर्षांची परंपरा लाभली आहे. या काळात दररोज बेल, फुले, फळांची सुरेख आरास करण्यात येते. श्रावणात श्री भैरी, तृणबिंदुकेश्वर मंदिरात दर्शन आणि तीर्थासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात.
रत्नदुर्ग किल्ला विजापूरच्या सुभेदाराच्या ताब्यात असताना चिटणीस म्हणून मुळे नामक व्यक्ती काम करत असे. त्यांचे कुलदैवत तृणबिंदूकेश्वर. म्हणून त्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी तृणबिंदूकेश्वराची स्थापना केली. मुळे यांचा मूळ चौथरा फगरवठार येथे आहे. तृणबिंदूकेश्वराची स्थापना केल्यावर ते फगरवठार येथून दररोज सकाळी पुजेला येत असत. याकरिता भैरव मंदिर, खालची आळी, टिळक आळी, जोशी पाळंद, कुंभारवाडी येथून फगरवठार रोड चौथऱ्यापर्यंत चिरेबंदी फरशी बांधलेली होती. मुळे यांच्या वंशजांनी संततधारेची परंपरा आजही सुरू आहे.
काळबादेवीत १५० वर्षांची परंपरा
रत्नागिरी तालुक्यातील खाडी-समुद्राने वेढलेल्या काळबादेवी गावातील श्री रामेश्वर कालिका मंदिरात नामसप्ताह वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मंदिरात पोर्तुगीजकालीन घंटा असून, पेशव्यांनी ती मंदिराला भेट दिली आहे. नामसप्ताहाला जवळपास १५० वर्षांहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. १८८५-८६ सालच्या प्लेगच्या महामारीत सुरू झालेली परंपरा आजही कायम आहे. देव रामेश्वरावर दुग्धअभिषेकाने सप्ताहाला सुरवात होते. पहिला मान कासारवेली ग्रामस्थांचा आणि प्रत्येक सोमवार हा पंचक्रोशीतील बसणी, आरे या गावांना दिला आहे.
गवाणकर कुटुंबीयांकडे असलेला जामदारखाना, देवीचा मुखवटा संध्याकाळी ग्रामस्थ भजन करत मंदिरात आणतात आणि नामसप्ताहाला सुरवात करण्यासाठी बारावाडीचे भक्तजण (पहारेकरी) जमतात ते चार केळींच्या खांबामध्ये चौरंगावर ठेवलेल्या शिवलीलामृत पोतीवर बेलपत्र वाहून शपथ घ्यायला. गावातील १२ भजन मंडळाच्यावतीने मानकरी, कामकरी हा नामसप्ताहाचा निर्विघ्नपणे उत्साहात पार पडावा म्हणून रामेश्वर व आई कालिकेचरणी नारळ देऊन प्रार्थना करतात.
प्लेगची साथ थांबावी म्हणून गावातील लोकांनी देवाला साकडे घातले, मंदिरात कोणी भजन म्हणू लागले, कुणी टाळ आणले, शेट्ये पूर्वजाने मृदुंग आणला आणि लोक भजन करू लागले आणि अशी सुरू झाली नामसप्ताहाची सुरवात. पंचक्रोशीतील गाववालेदेखील यात सहभागी होते. सांगतेच्यावेळी गुलालाने माखलेले सर्व लोक धूपारतीला नमस्कार करून मंदिराच्या बाहेर येतात आणि मंदिराभोवती पाच प्रदिक्षणा पूर्ण करायला दिंडी सुरू होते. ढोल, लेझिम आणि भजनाच्या तालावर देव रामेश्वर पालखीतून पाच प्रदिक्षणा पूर्ण करतात
कुर्धे येथे टिपऱ्यांची परंपरा
कुर्धे (ता. जि. रत्नागिरी) येथील श्री महाविष्णु-सर्वेश्वर मंदिरांत गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या उत्सवाला सुमारे २०५ हून अधिक वर्षांची परंपरा आहे. या उत्सवात टिपऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सुमारे ५५ वर्षांपूर्वी ही परंपरा बंद पडली होती. परंतु ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गोकुळाष्टमी उत्सव श्रावण कृष्ण प्रतिपदा ते नवमी या कालावधीत असतो. सप्तमी, अष्टमी आणि नवमी या दिवशी मुख्य उत्सव असतो. या उत्सवात विष्णुयाग किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन वगैरे गोष्टी असतात. शिवाय दररोज रात्री आरत्या, भोवत्या, भजनादी कार्यक्रमही असतात. टिपऱ्या गावातच तयार केल्या जात असत. त्यांची गाणीही पारंपरिक असत. साधारण ५५ वर्षांपूर्वी टिपऱ्यांच्या खेळाची ही परंपरा खंडित झाली. गावकऱ्यांच्या इच्छेमुळे आणि त्यांनी आनंदाने घेतलेल्या सहभागामुळे ही परंपरा पुन्हा सुरू झाली आहे.
पुराच्या वेढ्यातही नामगजर सुरू
रत्नागिरी तालुक्यातील तोणदे येथील श्री सांब मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू होतो. २०२२ मध्ये सप्ताहाच्या दुसर्याच दिवशी मुसळधार पावसाने काजळी नदीला पूर आला आणि पुराचे पाणी गाभार्यात, मंदिरात शिरले. सभामंडपात गुडघाभर पाण्यातही ग्रामस्थांनी हरीनाम सप्ताहात भजनसेवा सुरू ठेवली होती. साधारणपणे दरवर्षी सप्ताहाच्या सांगतेप्रसंगी पुराची स्थिती असते. त्यामुळे सप्ताहाची सांगता मंदिराभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा घालून केली जाते. बहुतांशी वेळा प्रदक्षिणा घालण्यासाठी होडीत पालखी ठेवावी लागते एवढे पाणी असते. मंदिराजवळील ६ वाड्यांमधील ग्रामस्थ नामसप्ताहात सहभागी होतात.
कोकण भूमीपूजनाची दीर्घ परंपरा
शस्त्र आणि शास्त्र यावर सारखेच प्रभुत्व असणारे, भृगुकुलोत्पन्न भगवान श्रीपरशुराम कोकण प्रांताचे निर्माते आहेत.आपण दुसऱ्याला दिलेल्या गोष्टीचा परत वापर करायचा नाही या शास्त्राज्ञेने त्यांनी स्वतःच्या निवासासाठी नवीन भूभाग निर्माण करायचे ठरविले.महेंद्र पर्वतावर उभे राहून त्यांनी समुद्राला थोडे मागे हटण्याची केलेली विनंती त्याने अव्हेरली. समुद्रावर संतापून भगवान श्री परशुरामांनी आपल्या बाणाने समुद्राला मागे हटवले. समुद्र आणि सह्याद्रीच्यामध्ये जी जमीन वर आली तीच आपली कोकणभूमी होय. भडोच ते केरळ अशी ही सप्तकोकण भुमी परशुरामांनी तयार केली म्हणूनच तिला ''रामक्षेत्र'' हे नाव पडले. बाण जिथे पडला तिथपर्यंत समुद्र मागे गेला म्हणून ते ''इषुपात क्षेत्र'' झाले. पश्चिमेकडील या भागानंतर पुढे फक्त समुद्रच आहे म्हणून याला ''अपरान्त क्षेत्र'' (अपर-पश्चिम, अपरान्त- पश्चिमेकडील जमीन संपते तो भाग) असेही म्हणतात.
परशुरामांच्या आईचे, रेणुकेचे एक नाव कुंकणा आहे. तिच्या स्मरणार्थ ह्या भूमीला कोंकण असे नाव दिले असे काही अभ्यासकांचे मत आहे. कोकणाच्या निर्मितीचे सर्व काम श्रावण वद्य त्रयोदशीला पूर्ण झाले. त्यादिवशी चिपळूणला श्रीरामेश्वर आणि रामतीर्थ तलावाचे निर्माण कार्य संपन्न झाले. भगवान परशुरामांनी प्रत्येक कोकणवासीयांना श्रावण कृष्ण त्रयोदशीला भूमीपूजन करण्याची आज्ञा केली आहे.या पुजनाने मी आणि भूमाता आम्ही दोघेही प्रसन्न होऊ असे ते सांगतात. ही सर्व कथा विश्वनाथ कविकृत श्रीव्याडेश्वरोदय अर्थात व्याडेश्वर माहात्म्य या ग्रंथात आली आहे.
या ग्रंथात कवी म्हणतो, आजही ही प्रथा सुरू आहे. म्हणजेच या ग्रंथ रचनेपर्यंत ही प्रथा नक्की सुरू होती. या कोकण भूमी पूजनाची प्रथा आजही दापोली तालुक्यातील जालगाव, मुर्डी, आंजर्ला या गावांमध्ये सुरू आहे. या दिवशी गावातील मंडळी श्रीशिवमंदिरात जातात. मंदिराबाहेरील थोडी माती आपापल्या घरी आणतात आणि तिचे शिवलिंग करुन त्याची पूजा करतात. दुसऱ्या दिवशी त्याचे विसर्जन केले जाते. या उत्सवाला भुईल्या, भूईलोबा अशी नावे आहेत. या शब्दातील भुई अर्थात जमीन हा शब्द महत्त्वाचा आहे त्यातूनच ही भूमीपूजन करण्याची रीत आहे हे स्पष्ट होते. गेले बारा वर्षं चिपळूण येथे श्रीरामेश्वर मंदिरात कोकणभूमी पूजन, श्रीरामेश्वर पूजन आणि श्रीरामतिर्थ तलाव पूजन केले जाते. आता याचप्रकारे श्रीक्षेत्र परशुराम, रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथेही हे पूजन मोठ्या उत्साहात केले जाते.
भैरव मंदिराचा १०७ वा नामसप्ताह
मांडवीतील श्री देव भैरव मंदिराच्या नामसप्ताहास यंदा १०७ वर्षे होत आहेत. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार ते दुसरा सोमवार असा नामसप्ताहाचा कालावधी असतो. खोत, पंच मंडळी, प्रतिष्ठित व्यक्ती, ग्रामस्थ जमले की, श्री देव भैरवाची पूजा सुरू होते. नवीन निशाण उभारले जाते. त्यानंतर बेल पत्र देतात. खोताच्या खांद्यावर वीणा दिली जाते. सर्वजण बेलपत्र एकाच वेळी पुजेवर वाहतात, हर हर महादेव असा जयघोष होतो. याला सप्ताह बसला असे म्हणण्याचा प्रघात आहे. एकदा खांद्यावर घेतलेली वीणा आठवडाभर खाली ठेवायची नाही. मांडवी गावातील वरचीवाडी, पिंपळवाडी, भैरववाडी, मायनाकवाडी व सदानंदवाडी या पाच वाड्या प्रत्येकी तीन तास याप्रमाणे भजन करतात.
नामसप्ताहापूर्वी मंदिराप्रमाणेच प्रत्येक घरातूनही स्वच्छता, रंगरंगोटी केली जाते. सप्ताहाच्या काळात मांडवी गावात मद्यप्राशन, मांसाहार यावर पूर्ण बंदी उत्स्फूर्तपणे पाळली जाते. नामसप्ताहाच्या शेवटी श्री भैरवाची सजवलेली पालखी घेऊन मानकरी मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालतात. दुपारी राजिवडा येथे श्री काशिविश्वेश्वराची व श्री देव भैरवाच्या पालख्यांची भेट होते. या वेळी निशाण, अब्दागीर घेऊन मानकरी उपस्थित असतात शिवाय ढोलताशांचा गजर चालू असतो.दोन्ही पालख्यांची भेट झाली की, भाविक जल्लोष साजरा करतात. मंदिराला प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर भैरीबुवांची दिंडी राजीवडा, खडपेवठार, चवंडेवठार, घुडे वठार, श्री दत्त मंदिरमार्गे मांडवी गावाकडे पोहोचते.
राजीवडा येथील स्वयंभू श्री काशीविश्वेश्वर मंदिरात सात दिवस हरीनाम गजर सुरू असतो. पहिल्या सोमवारी सुरू होणारा गजर पुढच्या सोमवारी संपतो. काशीविश्वेश्वर मंदिराला पालखीची तिसरी फेरी चालू असते त्या वेळीच भैरवाची पालखी येते. येथे आठवडाभर भाविकांची प्रचंड गर्दी असते. या मंदिराला मोठी परंपरा लाभली आहे.
सडये पिरंदवणे वाडाजूनची १६४ वर्षांची परंपरा
रत्नागिरी तालुक्यातील सडये-पिरंदवणे - वाडाजून गावात येथील ग्रामदैवत श्री देव सोमेश्वराच्या मंदिरात होणाऱ्या या गोकुळाष्टमी उत्सवाचे यंदा १६४ वे वर्ष आहे. उत्सवाच्या वेळी गोफ, टिपऱ्या यांसारख्या पारंपारिक खेळांसह जुन्या गाण्यांचा वारसा या गावाने जपून ठेवलाय. शारीरिक ऊर्जा, मानसिक प्रसन्नता, एकाग्रता, संघकार्य समन्वय या गुणांचा कस दाखवणारा गोफ विणण्याचा खेळ, टिपऱ्या, त्याला पारंपरिक गाणी, अन् पेटी - तबला यांची सांगड हे या गावातील उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
पहिल्या दिवशी म्हणजे अर्थातच श्रावण कृष्ण षष्ठीला सकाळी श्री देव सोमेश्वर व सुंकाई देवी पुढे श्रीफळ ठेऊन या उत्सवास प्रारंभ होतो. त्यानंतर श्री घाणेकर यांच्याकडून श्री गोपालकृष्णाची मूर्ती वाजत गाजत सोमेश्वर देवालय आणली जाते. रात्री नऊ वाजता पंचारती लावून पारंपारिक पद्धतीने आरत्या, भोवत्या, मंत्रपुष्पांजली व नाचून भजन केले जाते. रात्री टिपऱ्यांचा सराव केला जातो.तिसऱ्या दिवशी काल्याचे किर्तन व त्यानंतर बालगोपाळाचे/सवंगड्यांचे विविध खेळ, फुगड्या, टिपऱ्या, गोफ, बस फुगडी, उंचउड्या, पिंगा, कटवटकाना, कोंबडा असे विविध खेळ पारंपरिक गाण्याच्या तालावर खेळले जातात. दहीहंडी फोडली जाते. रात्री ९ वाजता आरत्या भोवत्या मंत्रपुष्प व नाचून भजन मग स्त्रियांचे विविध खेळ फुगड्या, टिपऱ्या, गोफ, फेर, झिम्मा इत्यादी खेळले जातात. रात्री लळीताचे कीर्तन व श्री चरण दर्शन आणि उत्सव मानवणे झाल्यावर उत्सव संपतो.
रत्नागिरी तालुक्यातील सडये, पिरंदवणे, वाडाजून गावातील १६४ वर्षांची परंपरा असलेल्या श्री देव सोमेश्वराच्या उत्सवाच्या वैभवात ऐक्य, वक्तशीरपणा व काटेकोर नियोजन हे घटकही भर घालतात. साधारण १८६० च्या सुमारास या गावचा पहिला गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला गेला.
प्रशांत घाणेकर, पिरंदवणे
मांडवी गावात श्री देव भैरव मंदिरात १०७ वर्षे नामसप्ताहाचे आयोजन केले जात आहे. वरचीवाडी, पिंपळवाडी, भैरववाडी, मायनाकवाडी, सदानंदवाडी या पाच वाड्यांतील ग्रामस्थ सातत्याने अहोरात्र भजन करतात. या वर्षी पिंपळवाडीकडे व्यवस्थापनाची जबाबदारी आहे.गावात वातावरण भक्तीमय असते.
रुपेंद्र शिवलकर, अध्यक्ष, भैरव मंदिर.
धामणसे येथील श्री रत्नेश्वर मंदिरात एक्का वैशिष्ट्यपूर्ण असतो. या काळात गावची एकी पाहायला मिळते. श्रावण महिन्यात वातावरण भक्तीमय होते. सध्या धामणसे येथील श्री रत्नेश्वर मंदिराचा जीर्णाद्धार सुरू आहे.
अविनाश कुळकर्णी विश्वस्त, रत्नेश्वर ट्रस्ट.
नामसप्ताह हे एक आठ दिवसासाठीचे व्रत आहे. चौरंगावरील ग्रंथाची व विणेची विधीवत पूजा, आरती केली जाते. भटजी हातातील बेल पोथीवर वाहतात आणि शिवनामाचा जयघोष सुरू होतो, ‘शिवहरी रे शिवहरी रे सांब सदाशिव शिवहरी रे’. आठ दिवसांसाठी सर्वजण संगपरित्याग करून शिवचरणी लीन होतात.
- प्रसाद तथा बापू गवाणकर काळबादेवी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.