school going kids
school going kids esakal

Parenting Tips: मुल शाळेत जाण्यास नकार देतंय? आधी जाणून घ्या ३ महत्त्वाची कारणे आणि उपाय

Exploring The Reasons Behind Kids Reluctance To Attend School: शाळेला जाण्यास नकार देणाऱ्या मुलाला कशी मदत करावी ?
Published on

श्रुतिका कोतकुंडे

सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण
sajagclinic@gmail.com


शामलची आई शामलला घेऊन समुपदेशनासाठी आली होती. नऊ वर्षाची शामल शाळेत जाण्यास नकार देत होती. वेगवेगळी कारणे देऊन शाळा चुकवू पाहत होती. कधी पोटदुखी तर कधी मैत्रिणी चिडवतात म्हणून ती शाळेत जाण्यास नकार देई. दोन महिन्यांपासून ती पूर्णतः घरी बसून होती. घरी असताना ती खेळत बसे, तिच्या आईच्या कामाच्या ठिकाणी जाई किंवा टीव्ही बघत बसे. शामलचे बाबा थोडे शांत स्वभावाचे आहेत. त्यांनी आणि तिच्या आईने तिला शाळेत पाठवण्याचे खूप प्रयत्न केले; पण शामल काय बधली नाही.

शामल तिच्या वडिलांसारखी संवेदनशील मुलगी आहे. हल्ली ती लगेच हळवी होई. तिच्या शाळेत एक नवीन शिक्षिका आल्या होत्या आणि शामल त्यांना घाबरत असे. शामलच्या शाळेशी संपर्क साधून तिच्या शिक्षकांशी व वर्गमित्रांशी संवाद वाढवला तेव्हा खरे कारण समजले. त्या दृष्टीने कडक पावले उचलत तो प्रश्न मार्गी लावण्यात आला. त्यामुळे हळूहळू शामल पुन्हा पूर्वीसारखी शाळेत जाऊ लागली. मूल शाळेला जाण्यास नकार देते तेव्हा त्याबाबत योग्य माहिती घेणेही आवश्यक आहे...!

(Child education)

मुलं शाळेत जाण्यास का नकार देतात? (Top 3 Reasons Kids Give For Not Wanting To Go To School )

महत्वाच्या ३ कारणांसाठी मुलं शाळेत जाण्यास नकार देतात

  1. विलगीकरणाची भीती- अशा परिस्थितीत मुलं आई-वडिलांपासून विलग राहण्यास घाबरतात. त्यांना काळजी वाटत असते की, ते त्यांच्या आई-वडिलांपासून दूर झाले तर काहीतरी वाईट घडेल. त्यांच्या आई-वडिलांच्या सुरक्षेची त्यांना काळजी वाटते किंवा त्यांना वाटते की, आई-वडील त्यांना सोडून जातील.

  2. शाळेत काहीतरी अघटित घडेल – मुलाला शाळेत शिक्षा होण्याची किंवा चिडवण्याची भीती वाटू शकत असेल. बऱ्याचदा याबद्दल पालकांना कल्पना असते.

  3. असामाजिक कारण - शाळेची नावड असण्याचं एक कारण म्हणजे काही मुलांना शाळा बुडवून काहीतरी असामाजिक करण्याची उर्मी असते. ते शाळा बुडवतात; पण त्यांच्या पालकांना याबद्दल काहीही माहीत नसते.

school going kids
Child Care Tips: चिमुरडे हरवताहेत, हळूहळू स्वमग्नतेत, पालकांसोबतच्या संवादाचा अभाव प्रमुख कारण

कुठली माहिती महत्वाची

  • समस्या कधी व कशी सुरू झाली. घरची किंवा शाळेतील परिस्थिती बदलली आहे का?

  • मुलांना शारीरिक व्याधीची तक्रार असू शकते; परंतु तपासण्यातून काहीही आजार, व्यंग आढळत नाही. हे लक्षण मानसिक ताणाचे समाजावे.

  • जेव्हा मुलं शाळा बुडवतात तेव्हा ते शाळेच्या वेळेत काय करतात? अभ्यासात घालवतात की, घरकामात घालवतात? त्यांना वेळ हवा तसा घालवण्यास मुभा असते का?

  • मुलाला शाळेत पुन्हा प्रस्थापित करण्यास काय प्रयत्न केले गेले आहेत?

  • शिक्षकांचे सहकार्य लाभले आहे का?

  • मूल शाळेमध्ये घाबरले आहे का?

  • मुलाच्या आईची मानसिक व शारीरिक तब्येत ठीक आहे का? मूल आईच्या आजारपणामुळे तिच्या तब्येतीबद्दल काळजी करत आहे का?

  • मुलाच्या आईचा स्वभाव व समस्येची समज महत्वाची असते. जर आई अतिकाळजी करणारी असेल तर मुलाला शाळेत प्रस्थापित करणे कठीण जाऊ शकते.

  • मुलाच्या शाळेचा याबद्दलचा दृष्टिकोन महत्वाचा ठरतो. काही शाळांमध्ये मुलांनी शाळा बुडवणे खूप गांभीर्याने घेतले जाते तर कधी कधी शाळेत खूप मुलं असल्यास एखादं मूल शाळेत नाही आलं याकडे शिक्षकांचे दुर्लक्ष होऊ शकते.

school going kids
Child Health : लहान मुलांमध्ये वाढतोय 'ब्रेन ट्युमर'चा धोका... तज्ज्ञांकडून जाणून घ्या लक्षणे आणि महत्त्वाच्या गोष्टी

शाळेला जाण्यास नकार देणाऱ्या मुलाला कशी मदत करावी (how to help Kids Refuse To Go To School )

  1. शाळेला जाण्यासाठीचा काय ताण आहे तो समजून घेऊन तो कमी करावा.

  2. ठाम राहावे की, मूल लवकरात लवकर शाळा सुरू करणार आहे. यासाठी शिक्षकांशी, पालकांशी व मुलाशी संवाद करून आराखडा बनवावा.

  3. शाळेशी संवाद साधावा. शाळा मुलाला पुन्हा परत घेण्यास तयार असेल तर मुलाला शाळेत प्रस्थापित होण्यास सोपे जाते.

  4. शिक्षकांची, वर्गमित्रांची मदत घ्यावी. शिक्षकांनी मुलाला प्रेमाने प्रोत्साहन द्यावे जेणेकरून मुलाची भिती कमी होईल. वर्गमित्र मुलासोबत राहून त्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत करू शकतात.

  5. पालकांनी समजून घ्यावे की, मुलाला घरी ठेवणे योग्य नव्हे व त्यांच्या भावनिक गरजांसाठी मुलाला घरी ठेवू नये. मुलांनी शाळा बुडवल्यास शाळेच्या वेळात पालकांनी त्यांना गेम खेळणे किंवा टीव्ही बघण्यावर मज्जाव करावा.

  6. शाळेतील मित्रांना भेटण्यास प्रोत्साहन दावे व भीती कमी करण्याचा प्रयत्न करावा.

  7. मूल जर उदास असेल तर मानसोपचारतज्ज्ञाकडून समुपदेशन करून घ्यावे.

  8. मुलाशी बोलावे व मुलाला समजवावे की, शाळेत परत जाणे खूप महत्वाचे आहे आणि घरी बसणे पर्याय नाही. मुलाची मानसिकता समजून घेऊन त्याला मोकळे होण्यास संधी द्यावी व त्याला समस्या सोडवण्यास मदत करावी.

  9. शिक्षक व पालक यांनी समन्वय साधून शाळेत परत जाण्याची तारीख नक्की करावी व मुलाला शाळेत परतल्यावर आधार मिळेल यासाठी प्रयत्नशील राहावे.

(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...