pms
pmsesakal

PMS मासिक पाळी येण्यापूर्वीचा प्रीमेन्स्ट्रुअल सिन्ड्रोम काय आहे? कसं करायचं नियंत्रण, जाणून घ्या लक्षणे

PMS Symptoms and Treatment: Tips and Tricks वाढत्या वयानुसार प्रत्येक मुलीत हार्मोनलमध्ये बदल होतात. त्यामुळे प्रीमेन्स्ट्रुअल सिन्ड्रोम (पीएमएस) ची समस्यादेखील वाढते. जवळपास ९० टक्के महिला पीएमएसच्या अनुभवातून जातात तर ४० टक्के महिला या काळात तणावात असतात. २ ते ३ टक्के लोक तणावाचे शिकार होतात. त्याचा परिणाम त्यांच्या सामान्य जीवनशैलीवर होतो.
Published on

डॉ. ज्योती चव्हाण
स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र व वंध्यत्व उपचारतज्ज्ञ

प्रीमेन्स्ट्रअल सिंड्रोम किंवा पीएमएस काय आहे?

मासिक पाळीच्या अगोदर तुम्हालाही हा त्रास होतो का? तर मग वेळ काढून नक्की जाणून घ्या. मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. महिलांच्या आयुष्यातील हा एक महत्वाचा भाग असून जेव्हा मासिक पाळी जवळ येते तेव्हा काही लक्षणे महिलांमध्ये आढळतात. एखाद्या महिलेच्या मासिक पाळीच्या काही दिवस आधी शरीरात भावनात्मक आणि मानसिकरित्या बदल घडतात. जसे स्तन दुखणे, कठीण होणे, पायात गोळे येणे, पेटके येणे, मनःस्थिती बदलणे आणि डोकेदुखी होणे यासारखी लक्षणे दिसतात. हे जर तुमच्यासोबत होत असेल तर हे प्रीमेंस्ट्रुअल सिंड्रोम (PMS) असू शकते.

जर तुम्ही पीएमएस अनुभवत असाल तर यासाठी काही उपायदेखील आहेत. जीवनशैलीतील बदल आणि औषधे घेऊन पीएमएसपासून मुक्त होण्यास मदत होते. पीएमएस असा एक समूह आहे जे अनेक स्तरावर आपल्यावर परिणाम करतं. हे परिणाम शारीरिक, भावनात्मक किंवा स्वाभाविक असू शकतात. पाळी येण्याच्या १ ते २ आठवडे आधी हे बदल घडून येतात. पाळी आल्यानंतर हे बदल दिसणं तत्काळ बंद होतं.

पीएमएस काय आहे?

प्रीमेंस्ट्रुअल स्ट्रेसमध्ये कोणत्याही महिलेला मासिक पाळी सुरू होण्याच्या ४ ते ५ दिवस आधीचा वेळ असतो. या सिन्ड्रोमने त्रस्त महिलेच्या वर्तणुकीत बराच बदल होतो. काही महिलांना काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा होते किंवा खूप राग आणि चिडचिड होते. या विषयी डॉक्टर्स म्हणतात की, महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे पीएमएस होत असल्यास त्यांना शरीरात वेदना होतात खासकरून स्तन किंवा पोटात या वेदना असतात तर अनेक मुलींचे मूड अचानक बदलतात. त्या कधी कधी खूप रागात असतात तर कधी कधी छोट्या गोष्टीवर हसतात.

तुम्हालाही लक्षणे आढळतात का ?

प्रत्येक महिन्याला किमान एक लक्षण तरी पाळी येण्यापूर्वी दिसू शकते; पण, प्रत्येकालाचं हे अनुभव येतील असे नाही. काहीजणींना पाळी येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही अतिशय ओटीपोटात दुखणे, कंबरपाठीत कळा येणे, चक्कर येणे, पाय दुखणे असे प्रकार होतात; पण काहीजणींना फार त्रास जाणवत नाही तर काही स्त्रियांना अजिबात दुखणे होत नाही.

काही लक्षणे वगळता काही स्त्रिया खूप सहजपणे वावरतात किंवा पाळी झाल्यानंतरदेखील त्यांना त्रास होत नाही. जसे आपण मोठे होऊ तसे हे बदल बदलत जातात. कधी भावनिकरित्या काही स्त्रिया मासिक पाळी येण्यापूर्वी निराश होतात. काहीवेळा तणावात असलेल्या दिसतात. हे बदल भावनात्मक पातळीवर होतात; पण, पाळी येण्यापूर्वी अगदी कमी लक्षणे दिसल्यास हे पीएमएस आहे की नाही ओळखणे कठीण जाते.

हे बदल आपल्या आयुष्यात येतात का?

पीएमएसमुळे कामावर किंवा कुटुंबात किंवा मित्रांमध्ये वावरताना अडचणी येतात का? असा प्रश्नही पडतो. जर आपण ''होय'' असे उत्तर दिले तर ते कदाचित पीएमएस असू शकेल. पीएमएस जाणून घेण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे तुमच्या पाळीच्या कालावधीच्या ५ दिवस आधी सलग ३ महिने ही लक्षणे दिसल्यास पीएमएस असेल. पीएमएसच्या अनुभवातून जात असताना अनेकजणी गोड पदार्थ, जसे चॉकलेट वगैरे आणि खारट पदार्थ खातात; पण यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहेत. या काळात अन्य महिलांना भूक लागत नाही किंवा त्यांचे पोट खराब होऊ शकते तसेच सूज येणे किंवा बद्धकोष्ठतासारखे प्रकारदेखील घडू शकतात.

पीएमएसमधून सुटकेसाठी अनेक मार्ग आहेत. तुम्ही तुमच्या आहारात बदल घडवू शकता. पूर्ण झोप आणि व्यायाम करू शकता. तुम्ही तुमचे मन आणि शरीराला आराम देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी या विषयी चर्चादेखील करू शकता.

पीएमएस अनेक पद्धतीने दिसून येते. भावनिक, शारीरिक पातळीवर असे त्याचे स्वरूप असू शकते; परंतु, बहुतांशी महिलांमध्ये याची काहीचं लक्षणे आढळतात. सर्वच लक्षणे आढळत नाहीत. पीएमएसमध्ये पाळी येण्याआधी स्तन कोमल होणे, पायात गोळे येणे, पेटके, मनःस्थिती बदलणे आणि डोकेदुखी अशा गोष्टींचा समावेश आहे. अशावेळी जीवनशैलीत बदल करून आणि योग्य औषधे घेतल्यास पीएमएसपासून सुटका मिळू शकते.

शारीरिक लक्षणे (Physical signs) -

  • पोट फुगणे

  • पेटके येणे

  • स्तन दुखणे

  • भूक लागणे किंवा कमी होणे

  • डोकेदुखी

  • स्नायू वेदना

  • सांधेदुखी

  • हात-पाय सुजणे

  • मुरूम येणे

  • वजन वाढणे

  • बद्धकोष्ठता किंवा अतिसार

भावनिक लक्षणे (Emotional signs) -

  • तणाव किंवा चिंताग्रस्त

  • उदास राहणे

  • रडणे

  • मूडस्विंग्ज

  • झोप न लागणे

  • एकटे राहण्याची इच्छा होणे

  • भावूक होणे

  • संतप्त होणे, राग येणे.

स्वाभाविक बदल (Behavioral signs) -

  • विसराळूपणा

  • लक्ष कमी होणे

  • कंटाळा येणे

ही आहेत कारणे

पीएमएस सामान्य गोष्ट आहे; पण तुम्ही जर या पुढील गोष्टी पाळल्या नाहीत तर पीएमएस अधिक प्रभावी ठरू शकते. यामध्ये धूम्रपान करणे, खूप तणावात असणे, व्यायाम न करणे, पूर्ण झोप न घेणे, खूप मद्यपान करणे, मिठाचा अधिक वापर, लाल मांस वा साखरचे अधिक सेवन करणे या गोष्टींचा समावेश आहे.

तुम्ही यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे करू शकता?

पीएमएस नियंत्रणात आणण्यासाठी अनेक मार्ग आहेत. यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत.

  • ३० मिनिटे व्यायाम करणे

  • सकस आहार घ्यावा. जसे सर्व कडधान्ये, फळे आणि भाज्या

  • अन्नांमधून कॅल्शियम मिळवण्याचा प्रयत्न करा. (डेअरी, हिरव्या पालेभाज्या )

  • मीठ, कॅफिन आणि अल्कोहोल टाळा.

  • धूम्रपान करू नका.

  • भरपूर झोप घ्या.

  • तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करा.

  • आपली मनःस्थिती आणि लक्षणे जाणून घ्या.

  • काही महिला फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी-६, व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियमसह व्हिटॅमिन डी घेतात. जर आपण हे व्हिटॅमिन्स घेत असाल तर आपण आपल्या डॉक्टरांना विचारून सुनिश्चित करा की, हे व्हिटॅमिन्स अथवा सप्लिमेंट किती सुरक्षित आहेत?

(डॉक्टर चिरायु हॉस्पिटल येथे स्त्रीरोग,प्रसूतीशास्त्र व वंध्यत्व उपचार तज्ज्ञआहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...