चिपळूण ः चिपळूण विधानसभेवर उद्धव सेनेचा दावा

चिपळूण ः चिपळूण विधानसभेवर उद्धव सेनेचा दावा

Published on

चिपळूण विधानसभेवर उद्धव सेनेचा दावा

विनायक राऊत ः गणेश चतुर्थीनंतर जागा वाटपावर निर्णय

चिपळूण, ता. ५ ः आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा अद्याप जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही. गणेश चतुर्थीनंतरच त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघाचाही उमेदवारही अद्याप निश्चित झालेला नाही. या जागेवर उद्धव सेनेकडूनही दावा करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार कोणीही असो तो निवडून येणारच, असा दावाही माजी खासदार विनायक राऊत यांनी केला.
तालुक्यातील अलोरे येथील एका कार्यक्रमासाठी माजी खासदार राऊत गुरुवारी येथे आले होते. या दौऱ्यानिमित्ताने उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी ते म्हणाले, विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत तसतसे भाजपचे नेते व सरकार निवडणुकीपासून दूर पळू लागले आहेत. ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होतील, असे अपेक्षित होते; परंतु आताच्या अंदाजानुसार नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणुका होईपर्यंत भाजपला मोठी गळती लागलेली असेल. एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटालादेखील वाटाण्याच्या अक्षता दाखवून महायुतीतून बाहेर फेकले जाईल. ती वेळ आता आली आहे. गरज सरो आणि वैद्य मरो, अशी परिस्थिती अजित पवार गटाच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीपूर्वीचे मित्रपक्ष शेकाप, बसपा यांना सोबत घेऊन वाटचाल करणार आहे. वंचितची लोकसभा निवडणुकीत मनधरणी करण्यात आली तेव्हा जर ते ऐकले असते तर आजला वंचितचे तीन खासदार विजयी झाले असते, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत प्रायश्चित्त घेण्याऐवजी षड्‌यंत्र असल्याचा आरोप करतात, हे नारायण राणे यांच्यासह तिघांच्याही बुद्धीची कीव करावीशी वाटते. आजच्या घडीला महाराष्ट्राची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. राज्यातील वृद्ध महिला, विद्यार्थिनी सुरक्षित नाहीत. अनेक भागातील महिला या हैवानांना बळी पडत आहेत. देशात महाराष्ट्र महिलांवर अत्याचार करणाऱ्या राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आले असून, हे या सरकारचे अपयश आहे. अशा घटनांमध्ये तीस दिवसांत फाशीचा निर्णय देण्याबाबत कायदा आणण्याची गरज आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा कायदा पारित केला आहे. त्याच धर्तीवर महिलांना सुरक्षा देण्यासाठी या कायद्याची गरज असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.